
Jalgaon News : चाळीसगाव तालुक्यातील कृषी विभागात कर्मचाऱ्यांची वनवा असून, तालुक्यात जवळपास ४१ पदे रिक्त आहेत. त्यामुळे उपलब्ध कृषी कर्मचाऱ्यांची मोठी धावपळ उडत आहे.
तालुक्यात चार कृषी मंडळे असून, या मंडळांत सर्वाधिक ३२ कृषी सहायकांची पदे रिक्त आहेत तर तब्बल १३७ गावांचा भार अवघ्या १७ कृषी सहायक सांभाळत आहेत.
यामुळे रिक्त पदांची संख्या भरण्यासाठी शासनाला मुहूर्त मिळणार तरी कधी, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तालुका कृषी विभागात विविध पदे रिक्त असल्याने कृषी विभागाच्या योजनांची माहिती ग्रामस्थांना पोहोचविण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. कृषी विभागात ४१ विविध पदे रिक्त असल्याने शेतकऱ्यांना अडचणी येतात.
दोन मंडळ कृषी अधिकारी यांचे पदच रिक्त असल्याने येथे शेतकऱ्यांसह येथील कार्यालयीन कर्मचाऱ्यांना काम करताना खूपच अडचणी येत आहेत. कृषी विभागात सद्यःस्थितीत १७ कर्मचाऱ्यांवर १३७ गावांचा भार आहे.
पीएम किसान योजना, पीकविमा, दुष्काळी परिस्थितीचे सर्वेक्षण, कीड-रोग सर्वेक्षण, फळबाग लागवड व मस्टर काढणे, शेतीशाळा व कार्यालयीन कामकाजाचा ताण या १७ कृषी सहायकांवर पडत आहे. यामुळे ते देखील ताणतणावात राहत असल्याचे चित्र दिसत आहे.
क्षेत्र मोठे, ताण वाढला
तालुक्याचे एकूण ९१ हजार हेक्टर क्षेत्र आहे. त्यात या वर्षी पन्नास टक्के कपाशी लागवड झाली आहे. मात्र तालुक्यात दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी पुरता हाताश झाला आहे. अशातच बागायती पिके सध्या थोड्याफार पाण्यावर तग धरून आहेत.
मागच्या वर्षी बोंड आळीच्या तडाख्यात सापडलेला शेतकरी अजूनही बोंड आळी येते की काय, या भीतीत जगत आहे. त्यामुळे कृषी विभागाच्या विविध योजना आजही शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचविण्यासाठी तालुका कृषी विभागात मनुष्यबळ कमी आहे. तालुक्यातील कृषी विभागात रिक्त पदे भरण्यासाठी आमदार मंगेश चव्हाण यांनी प्रयत्न करावा, अशी मागणी होत आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.