केडगाव, ता. दौंड ः ‘‘शेतकऱ्यांच्या कांद्याला भाव (Onion Rate) नाही. मुख्यमंत्री शेतकऱ्यांच्या बांधावर गेले असते तर आम्हाला आनंद झाला असता. मात्र ते पक्ष मेळाव्यासाठी (Dasara Melava) शक्तिप्रदर्शन करण्यासाठी फिरत आहेत. राज्यात गुंडाबाजी चालू असल्याने हे सरकार फार दिवस टिकणार नाही,’’ अशी टीका खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी देऊळगाव गाडा (ता. दौंड) येथे केली. खासदार सुळे यांचा ‘गावभेट दौरा’ आयोजित केला होता. त्या वेळी त्या बोलत होत्या.
या वेळी माजी आमदार रमेश थोरात, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अप्पासाहेब पवार, पांडुरंग मेरगळ, वैशाली नागवडे, रामभाऊ टुले, डॉ. वंदना मोहिते, योगिनी दिवेकर, सुशांत दरेकर, अजित शितोळे, विकास खळदकर, सरपंच वैशाली बारवकर, उपसरपंच प्रमिला वाघापुरे आदी उपस्थित होते.
खासदार सुळे म्हणाल्या, ‘‘पक्षाच्या मेळाव्यासाठी शक्तिप्रदर्शन करण्यासाठी मुख्यमंत्री राज्यात फिरत आहेत. शेतकऱ्यांच्या कांद्याला भाव नाही. मुख्यमंत्री शेतकऱ्यांच्या बांधावर गेले असते तर आम्हाला आनंद झाला असता. राज्यात हाणामारी, पिस्तूल दाखविण्यात दिवस चालले आहेत, ही महाराष्ट्राची संस्कृती नाही.
राज्यात सध्या जे चित्र पाहायला मिळत आहे ते विकासाच्या दृष्टीने हानिकारक आहे. विकासाचे कुणाला काही देणे-घेणे राहिले नाही. महाविकास आघाडी सरकारच्या काळात जो विकास झाला तो लोकांपर्यंत पोहोचवा. विकासकामांचा पाठपुरावा करत राहू. आपण सुचविलेल्या कामांबाबत मी नवीन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेणार आहे,’’ असेही त्या म्हणाल्या.
या वेळी टेस्टीबाइट व केव्हीकेने बांधलेल्या बंधाऱ्याचे खासदार सुळे यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. सरपंच वैशाली बारवकर यांनी विविध मागण्यांचे निवेदन सुळे यांना दिले. देऊळगाव गाडा येथील शीतल राजेंद्र पवार यांची पोलिस उपअधीक्षकपदी निवड झाल्याबद्दल त्यांच्या कुटुंबीयांचा सत्कार करण्यात आला. ग्रामपंचायत सदस्य राजवर्धन जगताप यांनी प्रास्ताविकात विकासकामांचा आढावा घेतला.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.