
मुंबई : मागील वर्षी लांबलेला ऊस गाळप हंगाम (Sugarcane Crushing Season) लक्षात घेता यंदा १ ऑक्टोबरपासून हंगाम सुरू करण्यासाठी सोमवारी (ता. १८) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिसमितीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. सह्याद्री अतिथिगृहावर दुपारी एक वाजता ही बैठक होईल. गाळप हंगामाची वाट बिकट असल्याने यातून नेमका काय मार्ग काढणार? याकडे कारखानदारांचे लक्ष लागले आहे.
राज्यात मागील वर्षी प्रदीर्घ काळानंतर सर्वाधिक काळ हंगाम लांबला. त्यामुळे सरकारला वाहतुकीवर आणि प्रतिटन उसावर अनुदान द्यावे लागले. हा अनुभव पाठीशी असल्याने प्रशासनाने यंदा लवकर हंगाम सुरू करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही पावसाळी अधिवेशनात हंगाम लवकर सुरू केला, तरच वेळेत ऊस गाळप होईल. मागील वर्षी १२ लाख ३२ हजार हेक्टरवर उसाची लागवड होती. तर यंदा ती वाढून १४ लाख ८७ हजारांवर गेली आहे. त्यामुळे मागील वर्षीच्या तुलनेत यंदा गाळप हंगाम लवकर सुरू करणे गरजेचे आहे, असे स्पष्ट केले होते.
सप्टेंबर महिना निम्मा झाला तरी पावसाने उसंत दिलेली नाही. त्यामुळे प्रशासनाने कितीही तयारी केली तरी ऊस वाहतुकीस रस्ते नसल्याने साखर कारखाने पूर्ण क्षमतेने चालतील की नाही, या बाबत शंका आहे. राज्यात लम्पी स्कीनचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. ऊस तोडणीसाठी बैलगाडी मालक आंतरजिल्ह्यात स्थलांतर होत असल्याने त्याबाबत काय उपाययोजना राबविणार, या बाबत स्पष्टता नाही.
गाळप हंगाम दृष्टिक्षेपात
लागवड स्थिती २०२१-२२ २०२२-२३
ऊस लागवड क्षेत्र (लाख हेक्टर) १२.३२ १४.८७
ऊस उत्पादकता (प्रतिहेक्टर) ९७ टन ९५ टन
ऊसगाळप (लाख टन) १०.९६ १४. ४३
साखर उत्पादन (लाख टन) ११२ १३८
इथेनॉलमुळे कमी उत्पादन होणारी साखर १० लाख टन १२ लाख टन
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.