मंचर, जि. पुणे : येथील बसस्थानकावर (Manchar Bus Stand) विद्यार्थ्यांनी अचानकपणे एसटी गाड्या अडवून आंदोलन (Student Protest) केले. आंदोलनाची तीव्रता पाहून मांदळेवाडी मुक्कामी एसटी गाडी सुरू केली. पण रविवारी (ता. ४) पुणे - मंचर- वडगावपीर मुक्कामी गाडी सुरू न करण्याच्या नारायणगाव एसटी आगारप्रमुखांच्या भूमिकेचा निषेध करण्यात आला.
वडगावपीर मुक्कामी एसटी गाडी सुरू न झाल्यास पुन्हा विद्यार्थ्यां समवेत आंदोलन करू, असा इशारा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे युवक नेते सुरेश निघोट यांनी दिला आहे. आबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात वीस गावे व २५ वाड्यावस्त्यांपर्यंत जाण्यासाठी गेल्या ५० वर्षांपासून या दोन्ही एसटी गाड्या सुरू आहेत.
मंचर अवसरी खुर्द परिसरात महाविद्यालय व घोडेगाव येथील आयटीआयमध्ये प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना वडगावपीर गाडीचा उपयोग सकाळी व रात्री परतीच्या मार्गासाठी होतो. ‘‘मांदळेवाडी व वडगावपीर या दोन्ही एसटी गाड्या कधीच नारायणगाव आगारातून वेळेवर सोडल्या जात नाहीत. वेळेवर एसटी गाड्या आल्यास चांगले उत्पन्न मिळते.’’ अशी माहिती राज्यपरिवहन मंडळातील सेवानिवृत्त वाहतूक नियंत्रकाने नाव न छापण्याच्या अटीवर दिली.
ते म्हणाले, ‘‘नियमित व वेळेवर एसटी गाड्या नारायणगाव आगारातून सोडल्या जात नाहीत. त्यामुळे नाइलाजास्तव खासगी वाहनातून प्रवास करावा लागतो. एसटीच्या आर्थिक उत्पन्नावर परिणाम होतो. याला नारायणगाव आगारातील अधिकारी जबाबदार आहेत.’’
जारकरवाडी येथील विद्यार्थ्यांनी अश्विनी भोजणे यांच्या नेतृत्वाखाली मंचर बस स्थानकावर ठाणे ते लोणी एसटी गाडी अडवून आंदोलन केले. विद्यार्थ्यांची भूमिका रास्त असल्याने प्रवाशांनीही विद्यार्थ्यांना पाठिंबा दिला होता. एक तासानंतर मांदळेवाडी मुक्कामी एसटी गाडी सोडल्यानंतर आंदोलन थांबविण्यात आले. यावेळी वाहतूक नियंत्रक मोहम्मद सय्यद यांना वडगावपीर मुक्कामी एसटी गाडी सुरू करण्याबाबत निवेदन दिले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.