Sharad Joshi: शरद जोशी- अंगारमळ्यातला योध्दा शेतकरी

शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शरद जोशी यांना जाऊन आज सात वर्षे झाली. त्यांचा आज स्मृतिदिन. कोटी कोटी शेतकऱ्यांचे पंचप्राण असे शरद जोशींना संबोधतच शेतकरी संघटनेच्या सभेतील वक्‍त्यांच्या भाषणाची सुरवात होत असे. ही उपाधी म्हणजे शब्दांचा फुलोरा नव्हता. शेतकऱ्यांना व्यवस्थेच्या विरोधात ताठ मानेने लढायचे आत्मभान देणाऱ्या द्रष्ट्या नेतृत्वाला दिलेली ती दाद होती.
Sharad Joshi
Sharad JoshiAgrowon
Published on
Updated on

शरद जोशींनी (Sharad Joshi) भारतातल्या दारिद्य्राची नवी मीमांसा केली. कामगारांच्या (श्रम) शोषणातून (Labor Exploitation) औद्योगीकरणाची प्रक्रिया (Industrialization) घडते, त्या शोषणाच्या वरकड मूल्यातूनच भांडवलनिर्मिती होते, हे मार्क्‍सचे मत त्यांना मान्य नव्हते. ""समाजाचा इतिहास हा शेतीतील शोषणाच्या वेगवेगळ्या पद्धतींचा इतिहास आहे.

Sharad Joshi
Indian Agriculture : शेती शिक्षणात शेती शोषणाचा इतिहास मांडला जातो का ?

लूट, महसूल, गुलामगिरी, वेठबिगारी, सामंतशाही व्यवस्था, धर्मव्यवस्था या साऱ्या त्या पद्धती होत. त्यातील शेवटची पद्धती म्हणजे शेतीमालाला उत्पादन खर्चानुसार रास्त भाव देण्यास नकार व त्यायोगे केले जाणारे शेतकऱ्यांचे शोषण ही होय,'' अशी मांडणी त्यांनी केली. निरक्षरता, रुढी- परंपरा, जमीनदारी इत्यादी घटक शेतकऱ्यांच्या दुरवस्थेला जबाबदार असल्याच्या मांडणीला त्यांनी आव्हान दिले. शेतकऱ्यांची लूट हेच सरकारचे अधिकृत धोरण आहे, अशी सुस्पष्ट मांडणी त्यांनी केली.

Sharad Joshi
Indian Agriculture : शेतकऱ्यांप्रती असंवेदनशील कर्मचाऱ्यांचे कापणार वेतन

शेतमालाच्या किमती पाडून शेतीतील वरकड उत्पन्न शहराकडे वळवणे हा समाजवादी कार्यक्रम असल्याची टीका करत शरद जोशींनी "भारत विरुद्ध इंडिया' अशी मांडणी केली. इंग्रज निघून गेल्यावर त्यांच्या वसाहतवादी शोषणव्यवस्थेचा वारसा देशातील ज्या आर्थिक क्षेत्राला, ज्या लोकांना मिळाला तो "इंडिया' आणि ज्यांचे शोषण नवीन व्यवस्थेखाली, नववसाहतवादाखाली चालू राहिले त्यांचा समाज म्हणजे "भारत' अशी व्याख्या त्यांनी केली.

Sharad Joshi
Indian Agriculture : आपल्याला तारणारी शेती पद्धती

रोझा लॅक्‍झेम्बुर्गने "टाऊन अँड कन्ट्री' अशी मांडणी केली होती, त्याचे हे विकसित आणि स्वतंत्र रूप होते. शेतकऱ्यांच्या आर्थिक प्रतिष्ठेचा, स्वातंत्र्याचा प्रश्न ऐरणीवर आणणारा शरद जोशी हा पहिला नेता. त्यांचा विचार स्वच्छ आणि पक्का होता. त्यामुळे जात, राजकीय घराणे, आर्थिक ताकद यापैकी काहीही नसताना आणि लांगूलचालन- अनुनय हे मार्ग न चोखाळताही त्यांनी लाखो शेतकऱ्यांना संघटनेच्या झेंड्याखाली आणले. ही गर्दी याचकांची नव्हे, तर सैनिकांची होती.

प्रत्यक्ष निवडणुकीत न उतरता त्या प्रक्रियेतून आपल्या मागण्या मान्य करून घेण्याइतका दबाव गट निर्माण करणे ही त्यांची सुरवातीची राजकीय भूमिका राहिली. नंतरच्या काळात प्रत्यक्ष निवडणुकीच्या राजकारणात त्यांनी उडी घेतली, तिथे सपाटून अपयश आले. आंबेडकरांनी दलितांमध्ये राजकीय ध्रुवीकरण केले, त्या प्रमाणात आपण शेतकऱ्यांमध्ये ते करू शकलो नाही, अशी कबुली शरद जोशींनी दिली आहे; परंतु तरीही त्यांचे महत्त्व कमी होत नाही.

ते काळाच्या पुढे पाहत होते आणि शेतकरी संघटनेचा वेग नेहमीच शेतकरी समाजापेक्षा अधिक राहिला, त्यामुळे लौकिक अर्थाने यश दिसत नसेल; परंतु शेतकऱ्यांच्या शोषणाचे गतिशास्त्र राजकीय अजेंड्यावर नेण्यात ते यशस्वी ठरले, ही त्यांची सर्वांत मोठी उपलब्धी ठरेल. बाजारपेठेच्या शक्ती मोकळ्या करण्यासाठी ते आग्रही होते. खुल्या अर्थव्यवस्थेत ते शेतकऱ्यांचे स्वातंत्र्य पाहत होते. शेती, शेतीची बाजारपेठ यांत संरचनात्मक बदल करण्याची गरज ते मांडत होते.

व्ही. पी. सिंहांपासून ते नरेंद्र मोदींपर्यंत सगळीच सरकारे त्या दिशेनेच पावले टाकत आहेत, हे लक्षात घेतले पाहिजे. त्यांनी शेतकऱ्यांच्या स्वाभिमानाचा लढा पुकारला. जबरदस्त महिला संघटन उभे करून स्त्री-पुरुषांच्या एकत्र मुक्तीचा विचार मांडला. शेतकऱ्यांसमोर नवा आर्थिक विचार, नवे विश्‍लेषण मांडले.

स्वातंत्र्य हे सर्वांत मोठे मूल्य आहे, यावर त्यांची गाढ श्रद्धा होती. स्वातंत्र्याचा विचार इथल्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यात ते यशस्वी ठरले. त्या अर्थाने त्यांचे जीवितकार्य पूर्ण झाले होते. शरद जोशी यांच्या आंबेठाणच्या शेताचे नाव अंगारमळा होते. त्यांची एकूण जीवनदृष्टी आणि संघर्षाचे ते प्रतीक मानता येईल. आता हा अंगार निमाला असला तरी त्यांनी चेतवलेले स्फुल्लिंग काळाला पुरून उरणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com