
Solapur News : सुरत-चेन्नई ग्रीनफिल्ड एक्स्प्रेस वे साठी संपादित केलेल्या जमिनींपैकी गावाशेजारील जमिनींनाही शेतीचाच दर देण्यात येत असल्याने, शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. लक्ष्याची वाडी (ता.बार्शी) व नागणहळ्ळी व उमरगे (ता.अक्कलकोट) येथील शेतकऱ्यांनी प्रतिचौरस मीटर दर आकारणीचा आग्रह धरला आहे. याच मुद्द्यावरून वैराग येथील ट्रम्पेटला विरोध होत असून, ट्रम्पेट रद्द झाले तर चार तालुक्यांचे नुकसान होणार आहे.
सुरत-चेन्नई एक्स्प्रेस वेच्या भूसंपादनाचे काम ज्या वेगाने झाले, त्याच वेगाने त्याला विरोध होत आहे. अद्याप केवळ बोटावर मोजण्याइतक्याच शेतकऱ्यांनी मोबदला स्वीकारला असून इतर शेतकऱ्यांना मोबदल्याचे दर मान्य नाहीत. अनेक शेतकऱ्यांच्या जमिनीला कवडीमोल दर आल्याने शेतकरी जमिनीचा मोबदला स्वीकारण्यास पुढे येत नाहीत.
असे असताना ज्या गावांच्या शेजारून हा महामार्ग गेला आहे. त्या शेतकऱ्यांच्या जमिनी या गावापासून २०० मीटरच्या आत असल्याने त्यांचा दर चौरस मीटरप्रमाणे आकारावेत, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे. यामध्ये बार्शी तालुक्यातील लक्ष्याची वाडी व अक्कलकोट तालुक्यातील नागणहळ्ळी व उमरगे या गावांचा समावेश आहे.
लक्ष्याचीवाडी तर शहरालगत
बार्शी तालुक्यातील लक्ष्याचीवाडी हे गाव बार्शी-परंडा रस्त्यावरील पहिले गाव आहे. हे गाव बार्शी शहराजवळ असल्याने यापूर्वी या परिसरातील अनेक शेतकऱ्यांच्या जमिनीचे बिगर शेतीकरण होऊन नकाशे तयार झालेले आहेत. यामुळे येथे यापूर्वीच गुंठेवारी सुरू झालेली आहे. मात्र, या एक्स्प्रेस वे साठी संपादित करण्यात आलेल्या जमिनीपैकी ज्या शेतकऱ्यांचे नकाशे तयार नाहीत, त्यांच्या जमिनीला हेक्टरप्रमाणे शेतीचाच दर देऊ करण्यात आला आहे. यामुळे या परिसरातील शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे.
जमिनीचे दर ठरविण्याचा अधिकार मूल्यांकन विभागाचा आहे. मूल्यांकन विभागकडूनच जमिनीचे दर ठरविले जातात. वैराग परिसरात ट्रम्पेटला विरोध होत असला तरी ले आऊटमध्ये बदल केला जाणार नाही. त्याचे अधिकार केंद्र सरकारच्या हातात आहेत.- अभिजित पाटील, उपजिल्हाधिकारी तथा भूसंपादन अधिकारी.
नागणहळ्ळी येथील गट नं.९० मधील काही जमिनीचे सुरत-चेन्नई एक्स्प्रेस वेसाठी संपादन करण्यात आले आहे. ही जमीन गावठाण हद्दीपासून २०० मीटरच्या आत असून हॉटेल, धाबा, पट्रोलपंपसाठी योग्य आहे. त्याचे बिगरशेती रूपांतर झालेले असल्याने चौरस मीटरमध्ये मोबदला मिळणे आवश्यक आहे.- अजीम पिरजादे, नागणहळ्ही ता. अक्कलकोट.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.