
Dhule News : ः जामनेर (जि. जळगाव) येथे दाखल गुन्ह्यातील एसएसपी खतसाठा प्रकरणाचे लोण धुळे जिल्ह्यापर्यंत येऊन ठेपले आहे. कापसाच्या पिकास नुकसानकारक ठरणाऱ्या या एसएसपी (सिंगल सुपर फॉस्फेट) खताच्या विक्रीस कृषी यंत्रणेने जिल्ह्यात बंदी घातली असून, सहा नमुने तपासणीसाठी पाठविले आहेत.
जळगाव जिल्ह्यातील जामनेर पोलिस ठाण्यात १७ जुलैला गुजरातमधील संबंधित कंपनीच्या बोगस एसएसपी खतसाठाप्रकरणी कंपनीच्या जबाबदार तीन भागीदारांसह जामनेर परिसर व जळगाव जिल्ह्यातील चार विक्रेते, अशा सात जणांविरुद्ध शेतकरी व शासनाची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल आहे. सरदार अॅग्रो फर्टिलायझर्स अॅण्ड केमिकल्स गुजरातमधील मोरबी येथील कंपनीचे खत नमुने अप्रमाणित निघाले. यामुळे कापसाचे पीक खराब झाल्याचाही मुद्दा समोर आला.
यानंतर धुळ्यातही कृषी यंत्रणेने कार्यवाही हाती घेतली. सावखेडा व कंचनपूर येथून धुळे शहरातील आग्रा रोडवरील एसएल नामक डिस्ट्रिब्यूटरकडे या वादग्रस्त खताचा साठा आल्याची माहिती समोर येत आहे.
त्याने तो अन्य विक्रेत्यांकडे विक्रीसाठी पाठविला. नंतर धुळे तालुक्यातील तरवाडे, हेंकळवाडी, बिलाडी, चांदे, खोरदड, मोरदड तांडा, शिंदखेडा तालुक्यातील वालखेडा, वाघोदे यासह जिल्ह्यात विविध गावांमध्ये विक्रीस गेला.
त्यात संबंधित कंपनीच्या सिंगल सुपर फॉस्फेट झिंकेटेड दाणेदार व पावडर खतामुळे अनेक शेतकऱ्यांच्या कापसाच्या पिकाची वाढ खुंटली, पीक भेंडीच्या पानांसारखे झाले. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी तक्रारी सुरू केल्यावर जिल्हा कृषी यंत्रणेने तपासणीनंतर आत्तापर्यंत वादग्रस्त एसएसपी खताच्या दोन हजारांवर गोण्यांना विक्री बंदचा आदेश दिला आहे.
तक्रारीनंतर गुजरातच्या संबंधित कंपनीला या खत विक्रीस बंदी घातली आहे. धुळे जिल्ह्यातील अशा नुकसानग्रस्त भागात पंचनामे केले जात असून, पीडित शेतकऱ्यांच्या न्यायासाठी, ग्राहक तक्रार न्याय निवारण आयोगाकडे त्यांना दाद मागण्यासाठी जिल्हा कृषी यंत्रणा सहकार्य करेल, असे कृषी अधिकाऱ्यांनी सांगितले.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.