Ajit Pawar Meet Sharad Pawar At Y.B Chavan Center : राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन उद्यापासून (१७ जुलै) सुरू होत आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये फुट पडून अजित पवार यांच्यासह नऊ आमदार सत्ताधारी गोटात सामील झाल्यानंतरचे हे पहिलेच अधिवेशन आहे.
या पार्श्वभूमीवर आज अचानक उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रफुल्ल पटेल आणि राष्ट्रवादीच्या सर्व मंत्र्यांनी शरद पवार यांची मुंबईत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
अजित पवार गटाने शरद पवार यांची मनधरणी सुरू केल्यामुळे त्याचे अनेक राजकीय अर्थ काढले जात आहेत. तसेच तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. आमदार अपात्र होण्याच्या भीतीमुळे अजित पवार गटाने आपला पवित्रा बदलला आहे का असा कयास एकीकडे बांधला जात आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादीतील बंडाला शरद पवार यांचाच छुपा आशीर्वाद आहे का, ही चर्चाही पुन्हा नव्याने सुरू झालेली आहे.
राष्ट्रवादीमध्ये फुट पडून अजित पवार यांच्यासह नऊ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेऊन दोन आठवडे झाले. परंतु विधानसभा अध्यक्ष किंवा निवडणूक आयोग यांच्याकडून राष्ट्रवादीमधील फुटीवर अधिकृतरित्या शिक्कामोर्तब झालेले नाही. त्यामुळे विधिमंडळात विचित्र परिस्थिती निर्माण होणार आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी काही आमदार पक्ष सोडून गेले असले तरी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष भाजपबरोबर गेलेला नाही, आपला पक्ष महाविकास आघाडीत कायम राहील, असे वारंवार स्पष्ट केले आहे. जयंत पाटील यांनी आजही त्याचा पुनरूच्चार केला. त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष अधिकृतरित्या विरोधी बाकावर असेल परंतु त्याचवेळी या पक्षाचे नऊ आमदार मात्र मंत्री म्हणून सत्ताधारी बाकावर बसतील.
राष्ट्रवादीतील बंडखोर आमदारांनी शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर प्रफुल्ल पटेल यांनी माध्यमांशी संवाद साधला. “आज आमचे सर्वांचे दैवत, आमचे सर्वांचे नेते आदरणीय शरद पवार साहेबांचा आशीर्वाद घेण्यासाठी अजित दादा पवार, छगन भुजबळ, सुनील तटकरे, धनजंय मुंडे, दिलीप वळसे पाटील यांसह मंत्री महोदय यशवंतराव चव्हाण सेंटरला दाखल झालो. शरद पवार बैठकीसाठी येथे आले असल्याचं आम्हाला समजल्यावर आम्ही त्यांच्या भेटीची वेळ न मागता त्यांच्या भेटीकरता आलो, ” असं प्रफुल्ल पटेल म्हणाले.
पवारांचे पाया पडून आम्ही आशीर्वाद मागितले. आम्ही सर्वांनी साहेबांना विनंतीही केली की आमच्या मनात त्यांच्यासाठी आदर आहेच, पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकसंघ राहू शकतो त्यासाठीही योग्य विचार करावा. आणि येणाऱ्या दिवसांत मार्गदर्शन करावं अशी आम्ही विनंती केली आहे. मात्र शरद पवार यांनी यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही, असे पटेल म्हणाले.
राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून फुटून सत्ताधारी गोटात सामील झाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ आणि राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी शरद पवार यांच्यावर कठोर शब्दांत टीकेची झोड उठवली होती. तसेच शरद पवार यांची राष्ट्रीय अध्यक्षपदावरून उचलबांगडी करून अजित पवार यांची त्या पदावर नेमणूक करण्यात आली होती. परंतु आज मात्र अजित पवार गटाच्या नेत्यांची भाषा आणि देहबोली पूर्णपणे बदललेली दिसत होती.
मी पुस्तक लिहिले तर त्यातून काय काय खुलासे होतील, अशा शब्दांत शरद पवार यांना अप्रत्यक्ष धमकी देणारे प्रफुल्ल पटेल आज आर्जवी भाषेत बोलत होते. सर्वोच्च न्यायालयाने शिवसेनेतील फुटीनंतर दिलेल्या निवाड्यानंतर आमदार अपात्रतेसंदर्भातील चित्र बदलले असून शरद पवार आपल्या भूमिकेवर ठाम राहिले तर अजित पवार यांच्यासह नऊ मंत्री आणि त्यांना पाठिंबा देणारे आमदार अपात्र होऊ शकतात, असे जाणकारांचे मत आहे.
त्यातूनच अजित पवार गटाने यू टर्न घेऊन शरद पवार यांचे मन वळवण्याचा प्रयत्न सुरू केल्याचे बोलले जात आहे. तर पक्षातील फुटीनंतर आपल्याबद्दल जनमानसात उफाळून आलेली नाराजी कमी करून लोकांची सहानुभूती मिळावी यासाठी हे नेते शरद पवारांच्या भेटीला गेले असल्याची शक्यताही नाकारता येत नाही.
काही राजकीय निरीक्षकांच्या म्हणण्यानुसार मात्र अजित पवार यांनी केलेले बंड ही शरद पवार यांचीच खेळी असून ‘अगं अगं म्हशी मला कुठं नेशी' असा पवित्रा घेत शरद पवार पत्ते टाकत आहेत. या रणनितीचा एक भाग म्हणजे आजची ही भेट होती, असे त्यांनी सांगितले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.