Cotton Pinkball Worm : कापूस पिकात गुलाबी बोंड अळीचा शिरकाव

Cotton Pest Control : खानदेशात कापूस पिकात गुलाबी बोंड अळीचा शिरकाव झाला आहे. पूर्वहंगामी पिकात अधिकचे नुकसान होत असून, शेतकरी या समस्येमुळे चिंतेत आहेत.
Cotton Pinkball Worm
Cotton Pinkball WormAgrowon
Published on
Updated on

Jalgaon News : खानदेशात कापूस पिकात गुलाबी बोंड अळीचा शिरकाव झाला आहे. पूर्वहंगामी पिकात अधिकचे नुकसान होत असून, शेतकरी या समस्येमुळे चिंतेत आहेत. सुमारे ९० हजार हेक्टर क्षेत्रात ही समस्या दिसत असल्याची माहिती आहे.

कापसासाठी जळगाव किंवा खानदेशात आघाडीवर आहे. जळगाव देशात सर्वाधिक कापूस लागवड करणारा जिल्हा आहे. राज्यात सर्वाधिक साडेपाच ते पाच लाख ७० हजार हेक्टर एवढ्या क्षेत्रात कापसाची एकट्या जळगाव जिल्ह्यात लागवड केली जाते.

धुळे, नंदुरबार व जळगाव जिल्ह्यांत मिळून यंदा साडेआठ लाख हेक्टरवर कापसाची लागवड झाली आहे. जळगावात साडेपाच लाख हेक्टर, धुळ्यात दोन लाख आणि नंदुरबारात सुमारे ९८ हजार हेक्टरवर कापूस पीक आहे. यात मे अखेरीस किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात पूर्वहंगामी कापसाची लागवड झाली असून, ही लागवड खानदेशात एकूण दीड लाख हेक्टरवर आहे.

Cotton Pinkball Worm
Cotton Boll Worm : कापूस पट्ट्यात पुन्हा बोंडअळीचा प्रादुर्भाव

जळगाव जिल्ह्यात सुमारे ९५ हजार हेक्टरवर पूर्वहंगामी कापूस पीक आहे. हे पीक दोन महिने पाच दिवस ते दोन महिन्याचे झाले आहेत. त्यात मागील आठवड्यातच अनेक भागांतील पूर्वहंगामी कापूस पिकात गुलाबी बोंड अळी दिसून आली आहे. याची माहिती शेतकऱ्यांनी स्थानिक कृषी यंत्रणा, कृषी संशोधन केंद्रांना किंवा शास्त्रज्ञांना दिली आहे.

या समस्येमुळे कृषी विभागाचे गुलाबी बोंड अळी नियंत्रणासंबंधीचे कार्यक्रम निरुपयोगी ठरल्याचेही अधोरेखित झाले आहे. याचवेळी कृषी विभागाचा १ जूननंतर कापूस बियाणे विक्री व लागवडीच्या कार्यक्रमाचे अपयशदेखील पुन्हा एकदा समोर आले आहे.

गुलाबी बोंड अळीची समस्या मागील पाच हंगाम कापूस पिकात मोठी हानी करीत आहे. शेतकरी, उद्योगातून गुलाबी बोंड अळी व इतर रोगराईला प्रतिकारक, उत्पादनक्षम वाणाची सातत्याने मागणी केली जात आहे. पण कुणी दखल घेत नसल्याने हानी सुरूच आहे. या अळीमुळे कापसाचा दर्जाही खालावत असून, कोट्यवधींचे नुकसान शेतकरी, उद्योगांचे दरवर्षी होत आहे.

खानदेशात तापी, गिरणा, पांझरा, अनेर, सुसरी, गोमाई, वाघूर नदीकाठी व लाभक्षेत्रात पूर्वहंगामी कापूस पीक अधिक आहे. जळगाव जिल्ह्यात सर्वाधिक लागवड जामनेरात झाली आहे. यापाठोपाठ अमळनेर, पारोळा, जळगाव, चोपडा, यावल, धुळ्यातील शिंदखेडा, शिरपूर, नंदुरबारात नंदुरबार, शहादा, तळोदा भागात कापूस पिकाची लागवड बऱ्यापैकी झाली आहे.

गुलाबी बोंड अळीच्या समस्येने पुढे कैऱ्या उमलण्यासंबंधी अडचण येईल. बोंडे अर्धवट उमलतील. त्यामुळे कापूस काळा, लालसर होऊन त्याचा दर्जाही खराब होईल. परिणामी शेतकऱ्यांसमोर कमी दर कमी उत्पादन व हानी या समस्या पुन्हा एकदा उभ्या ठाकतील. मागील हंगामा कापसाला सरासरी दर साडेसहा हजार रुपये प्रतिक्विंटल एवढाच मिळाला आहे. पुढील दरांचे भवितव्य कसे आहे, हे स्पष्ट नाहीत. त्यात गुलाबी बोंड अळी, सततचा पाऊस आदी नैसर्गिक समस्यांमुळे शेतकऱ्यांचे तोंडचे पाणी पळाले आहे.

Cotton Pinkball Worm
Cotton Boll Worm : तेलंगणामुळे बोंड अळीची भीती

उत्तरेकडे अधिक प्रादुर्भाव

देशात महाराष्ट्र, तेलंगणात कमाल क्षेत्रात कोरडवाहू कापूस असतो. परंतु जेथे पूर्वहंगामी किंवा बागायती कापूस अधिक आहे, तेथे गुलाबी बोंड अळी यंदाही अधिक प्रादुर्भाव झाला आहे.

उत्तर भारतात पंजाब, हरियाणा, राजस्थान यासह गुजरात, मध्य प्रदेशातही पूर्वहंगामी कापूस पिकात गुलाबी बोंड अळीचा यंदाही प्रादुर्भाव अधिक आहे. यामुळे उत्तरेकडे सुमारे १३ लाख हेक्टरवर बागायती कापूस पीक असून, या क्षेत्रात गुलाबी बोंड अळीचा शिरकाव जूनमध्येच झाला होता. तेथे कापूस पीक आता सुमारे साडेतीन ते तीन महिने २० दिवसांचे झाले आहे.

पतंग दिसले आणि खर्च सुरू झाला...

खानदेशात अनेक शेतकरी गुलाबी बोंड अळीसंबंधी सातत्याने निरीक्षण करतात. त्यात शेतात जसे गुलाबी बोंड अळीला पूरक असलेले नरपतंग दिसले, तशी शेतात कामगंध सापळे लावणे, कीटकनाशकांची फवारणी सुरू झाली. एकरी पाच कामगंध सापळे लावले जात आहेत. तसेच प्रतिबंधात्मक फवारण्या शेतकरी घेत आहेत. यासाठी एकरी ११०० ते १२०० रुपये खर्च सुरुवातीलाच आला आहे.

मागील काही हंगामात कापूस पिकात दुसऱ्या किंवा तिसऱ्या वेचणीनंतर गुलाबी बोंड अळीमुळे नुकसान झाल्याचे दिसले आहे. परंतु यंदा सुरुवातीच्याच काळात किंवा पहिल्याच वेचणीला जळगाव जिल्ह्यात गुलाबी बोंड अळीने पिकात हानी होईल, असे दिसत आहे. फरदड कापूस पीक किंवा अगदी एप्रिल, मेपर्यंत शेतात कापसाच्या पऱ्हाटी उभ्या दिसत होत्या. यामुळे गुलाबी बोंड अळीचे जीवनचक्र नष्ट झाले नाही. तिची जीवनसाखळी विकसित होत गेली आणि गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव होत आहे.
- गिरीश चौधरी, कापूस पैदासकार, कापूस संशोधन केंद्र, जळगाव
माझ्या जूनच्या सुरुवातीला लागवड केलेल्या बागायती (पूर्वहंगामी) कापूस पिकात गुलाबी बोंड अळीचा शिरकाव मागील आठवड्यातच दिसला आहे. यामुळे पिकात कीटकनाशकांची फवारणी घेत आहे. कमी दर आणि बोंड अळीची समस्या शेतकऱ्यांसमोर आ वासून उभी आहे. चांगले कापूस वाण शेतकऱ्यांना का मिळत नाहीत, हा प्रश्न आहे. मला वाटते कीडनाशके, संप्रेरके, अन्नघटक उत्पादक आणि सरकार यांचे साटेलोटे आहे. यामुळे चांगले कापूस वाण शेतकऱ्यांना पाच सहा वर्षांपासून मागणी असतानाही मिळालेले नाहीत.
- राजेंद्र भगवान महाजन, चहार्डी, ता. चोपडा, जि. जळगाव

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com