
ॲग्रोवन वृत्तसेवा
अकोला ः एकीकडे कापसाला यंदाच्या हंगामातही चांगला दर (Cotton Rate) मिळण्याची शक्यता वर्तवली जात असल्याचा आनंद तर दुसरीकडे मात्र हेच पीक सध्या बोंडअळी (Cotton Boll Worm) पोखरत असल्याने निर्माण झालेली चिंता, अशा विचित्र स्थितीत शेतकरी अडकला आहे. जिल्ह्यात जूनच्या प्रारंभी लागवड असलेल्या कपाशीला बोंड लागलेले असून त्यामध्ये अळी दिसून येत आहे. बोंडअळी कापूस पट्ट्यात उद्रेक करीत आहे.
मागील हंगामात कापसाला १० हजारांवर प्रतिक्विंटल भाव मिळाल्याने यावर्षी शेतकऱ्यांनी कपाशीला पसंती दिली. बोंडअळीचा प्रादुर्भाव होवू नये यासाठी मॉन्सूनपूर्व लागवडीवर प्रतिबंध घालण्यात आलेला असल्याने शेतकऱ्यांनी जून महिन्यात कपाशीची लागवड केली. परंतु याही क्षेत्रात बोंडअळीने हल्ला चढवला आहे. सातत्याने अळीला पोषक वातावरण मिळत असल्याने अळीचा प्रादुर्भाव वाढत आहे.
तेल्हारा येथील गोपाल खोपाले यांच्या वाडी अदमपूर शिवारातील शेतात बोंडअळी आढळून आली. कपाशीच्या झाडांवर फूल पात्या लागलेल्या असून बोंडअळीही दिसून येत आहे. गेल्या काही हंगामापासून कपाशीचे पीक हे अतिशय खर्चिक झालेले आहे. कीड-रोगांच्या प्रादुर्भावामुळे उत्पादन खर्चात मोठी वाढ झालेली आहे. मागील काही दिवस जोराचा पाऊस नसला तरी ढगाळ वातावरण बनलेले आहे. ढगाळ वातावरणामुळे वेगवेगळ्या किडीचा प्रादुर्भाव वाढत आहे.
प्रतिक्रिया..
दोन एकरांतील कपाशी पिकात बोंडअळीचे आक्रमण झाले आहे. फवारणी करूनही कीड नियंत्रणात आलेली नाही. उपाययोजनांसह योग्य मार्गदर्शनाची शेतकऱ्यांना गरज आहे.
- गोपाल खोपाले, कापूस उत्पादक, तेल्हारा, जि. अकोला
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.