Humani : हुमणी’चा प्रादुर्भाव सुरू

अवकाळी आणि वळवाच्या पावसानंतर हुमणीचा प्रादुर्भाव दिसू लागला आहे. सध्याचे हवामान हुमणी विस्ताराला पोषक आहे. हुमणीचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर होणारे मोठे नुकसान नियंत्रणाबाहेरचे असते.
Humani
HumaniAgrowon
Published on
Updated on

औरंगाबाद : अवकाळी आणि वळवाच्या पावसानंतर हुमणीचा प्रादुर्भाव (Humani Outbreak) दिसू लागला आहे. सध्याचे हवामान हुमणी विस्ताराला पोषक आहे. हुमणीचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर होणारे मोठे नुकसान नियंत्रणाबाहेरचे असते. त्यामुळे शेतकऱ्यांनी सामुहिक पद्धतीने एकात्मिक व्यवस्थापनाला (Integrated Pest Management) प्राधान्य द्यावे, असा सल्ला वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी दिला आहे.

Humani
सामुदायिकरीत्या करा हुमणी किडीचे एकात्मिक व्यवस्थापन

प्रादुर्भावाबाबत कीटकशास्त्र विभागातील तज्ज्ञांनी सांगितले की, हुमणीचे प्रौढ भुंगेरे जमिनीत सुप्तावस्थेत राहून मे, जून, जुलै काळात बाहेर पडतात. ऑगस्ट ते सप्टेंबर दरम्यान हुमणी अळी विविध पिकांची मुळे कुरतडून उपजीविका करते. नोव्हेंबरमध्ये जमिनीत कोषावस्थेत जाते. नोव्हेंबर ते डिसेंबर दरम्यान कोशातून प्रौढ भुंगे बाहेर निघतात. जानेवारी ते मे या काळात प्रौढ भुंगेरे परत जमिनीत सुप्तावस्थेत जातात.

Humani
हुमणी रोखण्यासाठी लौकी येथे प्रात्यक्षिक

औरंगाबाद येथील कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ. किशोर झाडे म्हणाले, ‘‘महाराष्ट्रात हुमणीचा प्रादुर्भाव २०१२ तसेच २०१७ मध्ये मोठ्या प्रमाणावर होऊन सोयाबीन, कापूस, तूर, ऊस, फळबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. कोल्हापूर, परभणी, हिंगोली, लातूर, पुणे, औंरगाबाद, जालना या जिल्ह्यांत नुकसानीची तीव्रता अधिक होती. जोराचा पाऊस ज्या भागात होत नाही, तेथे हुमणीचा प्रादुर्भाव वाढतो, हा अनुभव आहे. प्रादुर्भाव झाल्यानंतर उपाययोजना करणे खूप खर्चिक आहे. यासाठी प्राथमिक उपाय योजनांवर भर देणे फायदेशीर ठरते.’’

तज्ज्ञांनी सुचविलेल्या उपाययोजना ः

असा होतो प्रादुर्भाव ः

- हुमणी अळी पिकाची मुळे कुरतडून खाते. त्यामुळे रोप सुरूवातीला पिवळे पडते आणि नंतर वाळून जाते. अशी नुकसानग्रस्त रोपे सहज उपटली जातात. अळीचा प्रादूर्भाव प्रामुख्याने एका रेषेत असतो.

- एका झाडावर सरासरी २० किंवा त्यापेक्षा जास्त भुंगेरे असणे ही या अळीची आर्थिक नुकसान पातळी असते.

नियंत्रणाचे उपाय ः

- सध्या कडुनिंब, बाभूळ, बोर आदी झाडांवरील भुंगेरे रात्री ७ ते ९ वाजेदरम्यान काठीच्या साहाय्याने फांद्या हलवून खाली पाडून जमा करावेत. हे भुंगेरे रॉकेल मिश्रित पाण्यात टाकून त्यांचा नाश करावा.

- सामूहिकरीत्या भुंगेरे गोळा करण्यासाठी एक हेक्‍टर क्षेत्रात एक प्रकाश सापळा लावावा.

- अळीच्या नियंत्रणासाठी परोपजीवी बुरशी ‘मेटारायझियम ऍनिसोपली’चा १० किलो प्रतिहेक्‍टरी या प्रमाणात जमिनीतून वापर करावा. निंदणी करताना अळ्या वेचून नष्ट कराव्यात.

- झाडावर २० किंवा त्यापेक्षा जास्त भुंगेरे आढळल्यास क्‍लोरपारीफॉस (२० टक्‍के प्रवाही) २५ ते ३० मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून झाडावर फवारणी करावी. १५ दिवस जनावरांना फवारणी केलेल्या झाडांची पाने खाद्यामध्ये देवू नयेत.

- फिप्रोनील (०.३ टक्‍के दाणेदार) २५ किलो प्रति हेक्‍टरी या प्रमाणात जमिनीत ओल असताना द्यावे.

- फिप्रोनील (४० टक्‍के) अधिक इमिडाक्‍लोप्रीड (४० टक्के) हे ‍के संयुक्‍त कीटकनाशक ४ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून उसामध्ये आळवणी करावी.

- शेतकऱ्यांनी सामूहिकपणे २ ते ३ वर्ष हुमणीचे एकात्मिक व्यवस्थापन करणे अत्यंत आवश्‍यक.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com