हुमणीचा प्रौढ वगळता बहुतांश जीवनकाळ हा मातीमध्ये जात असल्याने प्रादुर्भाव लक्षात येणे आणि नियंत्रण करण्यामध्ये अडचणी येतात. सध्या मोसमी पावसाला सुरुवात होत असून, या काळात परिसरातील लिंब, बाभूळ किंवा बोर झाडावर मिलनासाठी प्रौढ भुंगेरे एकत्र येतात. ते सामुदायिकरीत्या गोळा करून नष्ट करणे, हा तुलनेने सोपा व सर्वांत कार्यक्षम उपाय ठरतो. हुमणी ही अतिशय हानिकारक आणि सर्वत्र पसरलेली कीड आहे. या किडीची अळी ऊस, बाजरी, भुईमूग, ज्वारी यासह विविध फळे आणि भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान करते. हुमणी अळी पिकाची मुळे कुरतडून खात असल्यामुळे उसाची बेटे वाळून जातात. बहुतांश पिकांमध्ये पाने पिवळी होऊन कालांतराने वाळतात. नंतर रोप किंवा झाड वाळून जाते. जीवनक्रम
नुकसानीचा प्रकार या किडीची अळी उसाबरोबरच भुईमूग, बाजरी, ज्वारी तसेच फळे आणि भाजीपाला पिकांना खूप उपद्रव पोहोचविते. अळीचा कालावधी ५ ते ८ महिन्यांचा असतो. अळी पिकांची मुळे कुरतडून किंवा खाऊन टाकते. परिणामी, रोपांना अन्न आणि पाणी मिळत नाही. पाने पिवळी पडून कालांतराने संपूर्ण झाड किंवा बेट वाळून जाते. जास्त प्रादुर्भाव झालेल्या उसाचे बेट उपटले असता सहजपणे उपटून येते. पिकाचे मोठे नुकसान होते. अळीप्रमाणेच प्रौढ भुंगेरेही पिकाला हानिकारक ठरतात. ते पिकाची पाने अर्धचंद्राकृती कुरतडतात. एकात्मिक पद्धतीने व्यवस्थापन जमिनीच्या आतमध्ये बहुतांश वास्तव्य आणि गुंतागुंती जीवनसाखळी यामुळे या किडीचे नियंत्रण करणे अवघड जाते. त्यामुळे कोणत्याही एका पद्धतीवर अवलंबून राहण्यापेक्षा एकात्मिक कीड व्यवस्थापन तंत्राचा वापर करावा.
प्रकाश सापळा भारतीय ऊस संशोधन संस्थेद्वारे शिफारस केलेल्या प्रकाश सापळ्याचा ( काॅम्बो लाईट ट्रॅप) वापर सायंकाळच्या वेळी ७ ते १० या वेळेत करावा. या सापळ्याद्वारे हुमणीचे भुंगेरे एकत्रित गोळा करून नष्ट करावेत. एक हेक्टर क्षेत्रासाठी एक सापळा पुरेसा होतो. घरगुती पद्धतीने तयार केलेल्या प्रकाश सापळ्याचा वापरही शेतकरी करू शकतात. जैविक कीडनियंत्रण पद्धती मेटारायझिम अँनीसोप्ली ही जैविक बुरशी २ लिटर प्रति एकरी या प्रमाणात शेणखत किंवा अन्य सेंद्रिय खतांमध्ये मिसळून जमिनीत टाकावी. पिकाला हलके पाणी द्यावे. मेटारायझियम ॲनीसोप्ली ही जैविक बुरशी द्रावण एकरी २ लिटर या प्रमाणात ठिबकद्वारेही सोडता येते. ही बुरशी हुमणी अळ्यांना रोगग्रस्त करते. त्यात ६ ते ८ दिवसांत मरून पडतात. रासायनिक नियंत्रण पद्धती जून-जुलै महिन्यांत जमिनीमध्ये फिप्रोनिल (०.३ टक्के दाणेदार) १० किलो प्रति एकरी टाकावे आणि पिकाला पाणी द्यावे. हुमणीचा प्रादुर्भाव जास्त वाढल्यास , इमिडाक्लोप्रिड (४० टक्के) अधिक फिप्रोनिल (४० टक्के) (संयुक्त कीटकनाशक) १५० ग्रॅम प्रति एकरी द्यावे. किंवा क्लोरपायरीफाॅस (२० टक्के) २ लिटर प्रति ३०० लिटर पाण्यात मिसळून प्रति एकरी ड्रीपमधून अगर ड्रेचिंगद्वारे शेतजमिनीत पिकाच्या मुळाजवळ सर्व बाजूंनी पडेल अशा पद्धतीने सोडावे. - भरत दवंगे, ९९२३६५४५४५ (प्रमुख-पीक संरक्षण विभाग, कृषी विज्ञान केंद्र, बाभळेश्वर जि. नगर)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.