अमरावती ः संत्रा बागायतदार शेतकरी फळधारणेच्या काळात झाडांना आधार देण्यासाठी बांबूचा (Bamboo For Orange Farming) उपयोग करतात. फळ तोडणीनंतर हे बांबू काढून शेतात उघड्यावर ठेवले जातात. त्यामुळे ते खराब होऊन शेतकऱ्यांना नुकसान सोसावे लागते. त्याची दखल घेत संत्रा बागायतदारांना (Orange Grower) बांबू ठेवण्यासाठी ५० टक्के अनुदानावर (Subsidy) पक्के टीनशेड मिळावे, अशी मागणी लेहगाव येथील अरविंद पुरुषोत्तम तट्टे या प्रयोगशील शेतकऱ्याने केली आहे.
कृषिमंत्री अब्दुल सत्तार, कृषी आयुक्त धीरजकुमार, फलोत्पादन संचालक कैलास मोते, विभागीय सहसंचालक किसन मुळे यांना दिलेल्या निवेदनातून ही मागणी करण्यात आली आहे. अमरावती जिल्ह्यात सुमारे एक लाख हेक्टरवर संत्रा लागवड आहे. राज्यात सर्वाधिक संत्रा क्षेत्र याच जिल्ह्यात आहे. आंबिया, मृग बहरात फळांच्या वजनाने फांद्या झुकतात. त्यांना आधार देण्यासाठी बांबूचा वापर केला जातो.
कैची बांधण्यावर शेतकऱ्यांचा भर राहतो. बांबू खरेदीवर दरवर्षी हजारो, लाखो रुपयांचा खर्च होतो. शेतकऱ्यांना दरवर्षी करावा लागणारा हा खर्च वाचावा याकरिता बांबू सुरक्षित ठेवणे गरजेचे आहे. त्याकरिता शेतकऱ्यांना काम संपल्यानंतर बांबू ठेवण्यासाठी टीनशेड उपलब्ध होणे आवश्यक आहे. शेडअभावी शेतकरी उघड्यावरच बांबू ठेवतात. परिणामी, ते खराब होतात. यातून शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होते.
टीनशेड असल्यास हे बांबू खराब होणार नाहीत. बांबूचा आधार दिल्यानंतर रिकाम्या असलेल्या या शेडचा उपयोग हंगामी शेतीमाल साठवणुकीकरीता करणे देखील शक्य होणार आहे. त्यामध्ये उडीद, मूग, सोयाबीन यांसारख्या शेतीमालाचा समावेश आहे. संत्रा आंबिया बहराच्या झाडाला जून-जुलै महिन्यांत बांबू कैची बांधण्यात येतात, तर नोव्हेंबर-डिसेंबर-जानेवारी महिन्यापर्यंत संत्रा झाडावरील आंबिया बहराची फळे खाली केली जातात. या कालावधीत हे शेड रिकामे राहते.
संत्रा बागायतदार १५ ते २० फूट लांबीचे बांबू वापरतात, त्यामुळे शेड हे २० ते २४ फूट रुंद व ३० फूट लांब असावे. विटा, सिमेंट, रेती, लोखंड आणि टीनचा वापर करून ते उभारले पाहिजे. त्याकरिता ५० टक्के अनुदानाची तरतूद व्हावी. संत्रा कैची बांधण्याच्या काळात या शेडचा उपयोग इतर शेतीमाल साठवणुकीसाठी करणे शक्य होणार आहे. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पातूनही याकरिता निधीची तरतूद करता येणार आहे.
- अरविंद पुरुषोत्तम तट्टे, संत्रा उत्पादक शेतकरी, लेहगाव, अमरावती
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.