
वाशीम ः गेल्या काही वर्षांत वनोजा येथे संत्र्याची लागवड (Orange Cultivation) वाढली आहे. चांगल्या पद्धतीने उत्पादन (Onion Production) काढले जात आहे.
आता उत्पादन वाढीसोबतच मार्केटिंगच्या (Orange Marketing) अंगाने शेतकऱ्यांनी विचार केला पाहिजे, असे आवाहन डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख (Dr. Sharad Gadakh) यांनी केले.
जिल्ह्यातील वनोजा येथे रविवारी (ता. २९) आयोजित संत्रा फळपीक कार्यशाळेत अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.
श्रीमती साळुंकाबाई राऊत कला व वाणिज्य महाविद्यालय वनोजा व ‘पंदेकृवि’तील अखिल भारतीय समन्वयीत संशोधन प्रकल्प (लिंबूवर्गीय फळे) आणि फळशास्त्र विभागातर्फे या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
वनोजा येथे जवळपास २००० एकर क्षेत्रावर संत्रा फळपिकाची लागवड झाली आहे. लागवडीचे प्रमाण वाढत आहे. मागील तीन वर्षांपासून गावातील उत्पादक मृग बहार घेत असून त्यांना खर्च वजाजाता आर्थिक उत्पन्न मिळत आहे.
मात्र, लागवडीनंतर अन्न द्रव्ये कमतरता, सिला, काळी माशी, कीड, डिंक्या व कोळशी अशा समस्या सुद्धा वाढत आहे. त्यामुळे आधुनिक तंत्रज्ञान अवगत होण्यासाठी त्याचा प्रसार व्हावा यासाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
डॉ. गडाख यांनी शेतकऱ्यांना उत्पादन घेताना विद्यापीठ विकसित तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादन वाढीसोबतच उत्पादित मालाचे मूल्यवर्धन करीत स्वतः त्याचे विपणन करण्यावर भर देण्याचा सल्ला दिला.
वनोजा गावातील शास्त्रोक्त संत्रा लागवड पद्धती, प्रयोगशीलता व सहभागातून साधलेली प्रगती पाहून समाधान व्यक्त केले. विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. विलास खर्चे यांनी नवीन बाग लागवड करताना जमिनीचे पृथ:करण करणे अनिवार्य आहे.
तसेच विद्यापीठांमधील जातिवंत कलमा घेण्याचे आवाहन केले. शिक्षण विस्तार संचालक डॉ. धनराज उंदिरवाडे यांनी गावात कीड-रोग व्यवस्थापन करताना सामूहिक प्रयत्नांची गरज व्यक्त केली. कुलसचिव डॉ. सुरेंद्र काळबांडे यांनी अपारंपरिक भागात संत्रा लागवड वाढत आहे.
ही बाब स्वागतार्ह आहे. या भागात या पिकामुळे समृद्धी येत असल्याचे सांगितले. सेवानिवृत्त कृषी अधिकारी प्रल्हाद शेळके यांनी फळबाग लागवड इंडो - इस्राईल तंत्राने घेतल्या जात असल्याबद्दल समाधान व्यक्त केले.
संत्रा उत्पादकांना तांत्रिक सत्रात विद्यापीठाचे उद्यानविद्या सहयोगी प्रा. डॉ. उज्ज्वल राऊत यांनी मृग बहार नियमित घेण्यासाठी असलेल्या उपाययोजना व अधिक घनता लागवडीबाबत माहिती दिली.
वनस्पती रोग शास्त्रज्ञ डॉ. योगेश इंगळे यांनी डिंक्या, कोळशी व ग्रीनिंग रोगाबाबत सखोल माहिती देऊन रोगांच्या प्रभावी उपाय योजनांबाबत सांगितले. या कार्यशाळेला शेकडोच्या संख्येत संत्रा उत्पादक उपस्थित होते. कार्यक्रमापूर्वी संत्रा बागांची पाहणी करण्यात आली.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.