
Jayakwadi Water Storage : माॅन्सूनच्या पावसाने यंदा उशीर केला. त्यातही मराठवाड्यात अपेक्षित पाऊस झाला नाही. शेतकऱ्यांनी खरीपाच्या पेरण्या उरकल्या पण पावसाअभावी पिकांनी माना टाकायला सुरुवात केली आहे. तसेच अनेक जिल्ह्यात पाणी टंचाईची समस्या निर्माण झाली आहे. मराठवाड्याची तहान भागावणाऱ्या जायकवाडी धरणात ३४ टक्केच पाणीसाठी शिल्लक आहे.
मोसमी पावसाचे आगमन लांबल्याने मराठवाडा विभागातील सर्वच जिल्ह्यांची पाण्याची परिस्थिती चिंताजनक बनली आहे. जायकवाडी धरण औरंगाबाद, जालना आणि परभणी जिल्ह्यासाठी वरदान असून शेतीसह पिण्याचे पाणी सुद्धा याच धरणातून वापरले जाते. सध्या धरणात केवळ ३४.११ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. विशेष म्हणजे, गेल्यावर्षी आजच्या दिवशी याच जायकवाडी धरणात ९४.९९ टक्के पाणीसाठा शिल्लक होता. आजवर पाणीबाणी जाणवली नसली, तरी दमदार पाऊस न झाल्यास या जिल्ह्यांमधील परिस्थिती कठिण होऊ शकते. औरंगाबाद विभागात सध्या 57 गाव आणि 22 वाड्यावर 84 टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.
मराठवाड्यात गेल्या महिनाभरापासून पाटबंधारे विभागाकडून पाण्याचे नियोजन करण्यात आले आहे. पण, जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात तीन दिवसांमध्ये दोनवेळा झालेल्या पावसाने मोठा दिलासा मिळाला आहे. पण अपेक्षित पाऊस न झाल्यात मराठवाड्यातील जिल्ह्यातील अनेक धरण आणि तलावांनी तळ गाठला आहे. त्यामुळे अनेक भागात पिण्याच्या पाण्यासह उभी पीकेही संकटात आली होती. औरंगाबाद आणि जालना शहराच्या पाणीपुरवठ्यावरही गेल्या अनेक दिवसांपासून विपरित परिणाम झाला आहे.
या पार्श्वभूमीवर जोरदार पावसाने हजेरी लावल्याने मोठा दिलासा मिळेल. जिल्हा प्रशासनाकडून पाणी नियोजनासाठी उपसा बंदी करण्यात आल्याने नदीकाठची पिके पूर्णत: धोक्यात आली होती. तसेच काही दिवसांत जर जोरदार पाऊस न झाल्यास खरीपाची पेरणी वाया जाण्याची भीती आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट उभं राहण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत आता प्रत्येकाच्या नजरा पावसाकडे लागल्या आहेत.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.