
Solapur News : नवी दिल्ली येथे नुकत्याच पार पडलेल्या जी-२० शिखर परिषदेच्या निमित्ताने आयोजित पौष्टिक तृणधान्य प्रदर्शनामध्ये सोलापुरातील बोरामणीच्या यशस्विनी अॅग्रो फार्मर प्रोड्यूसर कंपनीला सहभागाची संधी मिळाली.
यात कंपनीच्या अध्यक्षा अनिता माळगे यांनी मिलेट्सच्या विविध पदार्थांची मांडणी केली. विविध देशाच्या पंतप्रधानांनी सपत्नीक या प्रदर्शनाला भेट देऊन ज्वारी, नाचणीच्या विविध उत्पादनांची माहिती घेताना या पदार्थांचे खास कौतुकही केले.
नवी दिल्ली येथील इंडियन रिसर्च सेंटर येथे हे प्रदर्शन आयोजिण्यात आले होते. केंद्रीय मसाला पिके संशोधन संस्था, राष्ट्रीय दूध विकास संस्था, कर्नाटक, राष्ट्रीय पुष्प उत्पादन संस्था, पुणे व भारतीय कृषी संशोधन संस्था, अशा राष्ट्रीय पातळीवरील विविध संस्था यामध्ये सहभागी झाल्या होत्या.
महाराष्ट्रातून सोलापूर आणि रायगड जिल्ह्यांतील शेतकरी कंपनी आणि महिला गटाला यामध्ये सहभागाची संधी मिळाली. सोलापुरातून बोरामणीच्या महिला शेतकरी कंपनीच्या अध्यक्ष असणाऱ्या अनिता माळगे यांनी सहभाग घेतला. सौ. माळगे यांनी या प्रदर्शनात प्रामुख्याने मिलेटसच्या वस्तू आणि पदार्थांची मांडणी केली.
त्यात ज्वारीची भाकरी, बिस्किट, शेवया, केक, चकली, कुकीज, पापड, पोहे आणि रवा यासारखी ३५ उत्पादने ठेवली होती. या मांडणीसह हे पदार्थ शरीरासाठी किती पौष्टिक आणि आरोग्यदायी आहेत, याची माहितीही त्यांनी प्रदर्शनासाठी आलेल्या विदेशी पाहुण्यांना दिली. तर रायगडच्या बचतगटाने नाचणीच्या पदार्थांची मांडणी यामध्ये केली होती. भारती कातकरी यांनी त्याविषयीची माहिती दिली.
या प्रदर्शनात सहभागासाठी राज्याचे अपर मुख्य सचिव अनूप कुमार, कृषी आयुक्त सुनील चव्हाण, विस्तार संचालक विकास पाटील, आत्माचे संचालक दशरथ तांभाळे, विभागीय कृषी सहसंचालक रफिक नाईकवाडी, सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, रायगडचे जिल्हाधिकारी डॉ .योगेश म्हसे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने यांचे साह्य त्यांना मिळाले.
उत्पादनांचे कौतुक करताना चवही चाखली
प्रामुख्याने ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक त्यांच्या पत्नीसह, इटलीचे पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी, साऊथ कोरियाच्या पंतप्रधानांच्या पत्नी युनसिक, फ्रान्सचे पंतप्रधान इम्यानुल मॅक्रॅान यांच्या पत्नींने यामध्ये भेट देऊन प्रदर्शनातील उत्पादनांची माहिती घेतलीच, पण पदार्थांची चवही चाखली.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.