
कोल्हापूर : केंद्राने बिगर बासमती तांदळावर (Basmati Rice) २० टक्के निर्यात शुल्क लावल्याचा फटका यंदा तांदूळ निर्यातीला (Rice Export) बसणार आहे. यंदा २०० लाख टन तांदळाची निर्यात अपेक्षित होती. निर्यात शुल्कामुळे तांदळाची निर्यात १५० ते १७५ लाख टनांपर्यंतच मर्यादित राहण्याचा अंदाज आहे.
भारतातून बिगर बासमती निर्यात होण्यास २०११ पासून सुरुवात झाली. यानंतर आजपर्यंत निर्यातीवर कोणतेच शुल्क लावण्यात आले नव्हते. यामुळे निर्यातीला प्रोत्साहन मिळून हळूहळू निर्यात वाढत गेली. गेल्या वर्षी म्हणजे २०२१-२२ मध्ये तांदळाची १७० लाख टन विक्रमी निर्यात झाली होती. यंदा सुरुवातीला देशभरात पावसाचे प्रमाण कमी होते. यामुळे तांदळाचे उत्पादन कमी होईल, असा अंदाज होता.
परंतु गेल्या दोन महिन्यांत तांदूळ उत्पादक सर्वच राज्यांत पावसाने चांगली हजेरी लावली. काही राज्यांत जादा पावसामुळे नुकसान होणार असले तरी अनेक ठिकाणी चांगला पाऊस फायदेशीर ठरणार आहे. यामुळे सुरुवातीच्या टप्प्यातील उत्पादनाचा अंदाज खोटा ठरण्याची शक्यता आहे. काही राज्यांत अतिरिक्त पावसाने पिकाचे नुकसान झाले असले तरी इतर राज्यांचा विचार करता उत्पादन यंदाही चांगले होण्याची शक्यता आहे. सध्या दर स्थिर असले तरी नवीन तांदळाची आवक सुरू झाल्यानंतरच दराबाबत निश्चित परिस्थिती समजेल, असे व्यापारी सूत्रांनी सांगितले.
भारत मुख्यत्वे इराण, इराक व सौदी अरेबिया या देशांना बासमती तांदळाची निर्यात करतो. तर प्रामुख्याने बांगलादेश, नेपाळ, बेनिन आणि सेनेगल या राष्ट्रांना बिगर बासमती तांदूळ निर्यात करतो. दर्जेदार तांदळामुळे या देशांतून भारतीय तांदळाला नेहमीच मागणी असते.
गेल्या आर्थिक वर्षात बिगर बासमतीची आजपर्यंतची सर्वाधिक विक्रमी निर्यात झाली. त्याचे प्रमुख कारण म्हणजे भारतात चांगले उत्पादन आले. बऱ्याच देशांनी विशेष करून युरोपियन देशांनी गेल्या वर्षी भारताकडून नॉन बासमती तांदूळ आयात केला. एकूण १७० लाख टनांपैकी युरोपियन देशांनी जगात सर्वांत जास्त तांदूळ मागविला होता.
या देशांनी ७० ते ८० लाख टन आयात केला. फिलिपाइन्स २३ लाख टन, चीन २२ लाख टन, सौदी अरब देशांनी १५ लाख टन, इराण व दुबईने प्रत्येकी १२ लाख टन, तर मलेशिया ११ लाख टन बिगर बासमती तांदूळ भारताकडून आयात केला.
गेल्या महिन्यात २० टक्के निर्यात शुल्क लावल्यानंतर मात्र निर्यातीचा वेग कमी झाला. देशभरात यंदाचा नवा तांदूळ ऑक्टोबरच्या शेवटच्या किंवा नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत येण्याची शक्यता आहे. पंजाब, हरियाना, उत्तर प्रदेश येथून पुसा बासमती, उतर प्रदेशातून आंबेमोहरची आवक अपेक्षित आहे. भारताने बिगर बासमती तांदळावर निर्यात शुल्क लावल्याने याचा फटका निर्यात घटण्यावर होऊ शकतो. यामुळे मोठ्या प्रमाणात परकीय चलन ही भारताला मिळण्याची शक्यता कमी आहे.
- राजेश शहा, तांदूळ निर्यातदार
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.