Soybean Crop : जांभळीच्या वावरात ३०-३५ हजाराचा फटका

वावरात पाणी वाहू लागल्याने तीन चतुर्थांश भागातील सोयाबीनच्या शेंगा भरल्याच नाहीत. त्या तशाच वाळल्या. या वावरात पाणी असल्याने व दररोज पाऊस हजेरी लावत असल्याने ते सोयाबीन काढता आलेले नाही. Soybean Crop Damage
Soybean Crop Damage
Soybean Crop DamageAgrowon

हे एक एकरचं वावर आमच्या मळ्यातील सर्वात शेवटचे वावर. फक्त याच वावरात भरपूर काळी माती आहे. मात्र ही जमीन खोलगट असल्याने चिबाड आहे. कोरड्या दुष्काळाचं (Drought), कमी पावसाचं (Rain) वर्ष सोडलं तर, या जमिनीला हमखास पाणी लागतं. यावर्षीसारखा पाऊस असेल तर, चक्क वावरातून पाणी वाहतं. सध्या ते वाहतंय. 

या वावराच्या वरची जमीन चढत्या क्रमाची आहे. याच्या डोक्यावर आमची एक आणि शेजारच्या शेतकऱ्यांच्या दोन विहिरी आहेत. आमच्या विहिरीचं पाणी जमीन लेव्हलपेक्षा वर येऊ नये, यासाठी सतत उपसा चालू असतो. या वावराच्या तिन्ही बाजुने कालवे आहेत. तरीही या जमिनीला पाणी लागतंच. उसाच्या मळीमुळे पाणी लागत नाही, असं एका मित्राने म्हटल्याने दोन वर्षांपूर्वी या जमिनीवर भरपूर मळी टाकली. पण त्याचाही उपयोग झाला नाही.

माझ्या बालपणी या वावरात एका बाजूला जांभळीचं झाड होतं. दुष्काळात ते वाळलं. तरीही या वावराला आम्ही जांभळीचं वावर म्हणूनच ओळखतो.

या वावराचा एवढा लांबलचक इतिहास देण्याचं कारण, यावर्षी या एकाच वावराने ३० ते ३५ हजाराचा आर्थिक फटका दिलाय. खरिपाला दरवर्षी इथं सोयाबीनच पेरतो‌. यावर्षीही सोयाबीन पेरलं. तेव्हाच रासायनिक खताचा डोस दिला आणि तणनाशकाची फवारणीही केली. उगवण चांगली झाली. सुरुवातीला वाढही बरी होती. मात्र काही दिवसातच सोयाबीनपेक्षा तणांची वाढ अधिक असल्याचं लक्षात आलं.

इतर वावरांच्या तुलनेत इथं तणनाशकाचा प्रभाव कमी जाणवत होता. जूलै अखेरला या वावराला पाणी लागलं, तेव्हा सोयाबीनला चट्टे लागत होते. दरम्यान एक कोळपणी आणि किटकनाशकाची फवारणीही झाली होती. मध्येच सोयाबीन जागोजागी पिवळं पडू लागलं म्हणून टॉनिकची फवारणीही केली. ऑगस्टच्या सुरूवातीला मी त्या वावरात चक्कर मारली तेव्हा मुख्य पीक तण आणि त्यात सोयाबीन दिसतंय, अशी परिस्थिती होती. 

खरं तर तेव्हाच निर्णय करायला हवा होता की, तणनाशक फवारून सोयाबीनसह तण संपवायचं. पण शेतकरी मन असे निर्णय घेऊ देत नाही. तण काढल्यावर सोयाबीन येईलच की, ही आशा अधिक प्रभावी असते.  

मी बायकोला म्हटलं, जांभळीच्या वावरातील खुरपण प्राधान्याने करणे गरजेचे आहे. त्याप्रमाणे तिनं काम सुरू केलं. दोन बाया आणि ती एक, असं तिघींनी काम सुरू केलं. दोघींनी काढलेलं तण उचलून बंधाऱ्यावर टाकण्याचं काम ती करीत होती. गुत्ते पध्दतीने सगळीकडं खुरपणीची कामे सुरू असल्याने,दुसऱ्या मजूर बायका मिळणं शक्य नव्हतं. तिघींनी बावीस दिवस या एकाच वावरात काम केलं तरी ते उरकेना.शेवटी सहा बायका तीन दिवसांसाठी आल्या आणि हे काम संपवलं... तरीही एक कोपरं राहिलंच. हा सगळा रोजगार २६ हजाराच्या आसपास गेला. तरीही या वावरात पुन्हा तण आलंच. 

वावरात पाणी वाहू लागल्याने तीन चतुर्थांश भागातील सोयाबीनच्या शेंगा भरल्याच नाहीत. त्या तशाच वाळल्या. या वावरात पाणी असल्याने व दररोज पाऊस हजेरी लावत असल्याने ते सोयाबीन काढता आलेले नाही. ते काढले व हाती लागले तर एक-दीड क्विंटल होईल. सुरुवातीची नांगरणी, पाळी, धसकट वेचणी (रब्बीला इथं मका होता..त्याची उलटी पट्टी आली.) पेरणी ,खत, तणनाशकाची एक फवारणी, किटकनाशकाच्या तीन फवारण्या आणि काढणीचे पाच हजार असा सगळा खर्च एकत्र केला तर,तो ३५ ते ३८ हजाराच्या आसपास होतो.

या वावरातील काटेकरेली व इतर गवत शेजाऱ्यांनी त्यांच्या जनावरांसाठी सलग १५ दिवस कापून नेले. त्यांना चांगलं गवत मिळालं. पण त्यांनी हे गवत नेलं नसतं तर, रोजगारात आणखी पाच हजाराची भर पडली असती... शिवाय एवढं सगळं करूनही, या जांभळीच्या वावरात सध्याही भरपूर तण आहे. सोयाबीन तसंच रानावर आहे आणि पाऊस तर थांबायला तयार नाही.

मी आज या एकाच वावराचा लेखाजोखा मांडून बायकोला म्हटलं की, ही असली शेती आपण आणखी किती वर्षे करायची? आपण निसर्गासोबत आनंददायी जगायचं म्हणून शेतीत आलोय. पण ही शेती आपल्या जगण्याच्या प्रयोजनालाच सुरूंग लावू पाहतेय. आता आपण बदलायला हवं. या शेतीची चिंता सोडावी लागेल.शेतीत राहायचं पण असली जोखमीची नि मानसिक, शारीरिक त्रासाची शेती करायची नाही, याचा निर्णय करावा लागेल. यासाठी शेतीकडं वेगळ्या दृष्टीने बघावं लागेल...


मी काही प्रस्ताव तयार करतो. त्यावर सर्वांगीण विचार करून, निर्णय घेऊ. पण कुठल्याही परिस्थितीत हे अनुभव पुढच्या वर्षी घ्यायचे नाहीत. या शेतीत उत्पन्न मिळणं शक्य नाही पण खर्च कमी करणं तर आपल्या हाती आहे....बघू या काय काय करता येतं ते!

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com