

Mumbai News : रानकवी आणि माजी आमदार ना. धों. महानोर यांच्या निधनानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अन्य नेत्यांनी श्रद्धांजली वाहिली. या वेळी ‘मराठी मातीतला ‘रानकवी’ हरपला’ अशी भावना विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी व्यक्त केली.
महानोर यांच्या निधनामुळे मराठी साहित्य क्षेत्राची हानी झाली आहे. महानोर यांनी आपल्या शब्द सामर्थ्याने निसर्गाची, रानावनातील, पानाफुलांतील सौंदर्य अनेकविध रूपे रसिकांसमोर मांडली. त्यांनी ग्रामीण जीवनाच्या अनेक पैलूंवर आपल्या लेखनातून प्रकाश टाकला. शेतातून, साहित्यिक मंच ते विधान परिषद असा त्यांचा प्रवास राहिला. या ठिकाणी महानोर यांनी आपल्या संवेदनशील कवी मनाची अमीट छाप उमटविली.
- एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री
महानोर हे खऱ्या अर्थाने ‘रानकवी’ होते. निसर्गाच्या सान्निध्यात राहून त्यांनी साहित्यसेवा केली. मराठी साहित्याला मातीचा गंध दिला. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचं जीवन, ग्रामीण संस्कृतीचं वैभव मराठी साहित्यात आणलं. त्यांच्या ‘रानातल्या कवितां''नी वाचकांना निसर्गाची सहल घडविली. त्यांनी विधिमंडळात आमदार म्हणूनही प्रतिनिधित्व केलं. त्यांच्या निधनानं महाराष्ट्राच्या सामाजिक, साहित्यिक, सांस्कृतिक क्षेत्राची मोठी हानी झाली आहे.
- अजित पवार, उपमुख्यमंत्री
ना. धों. महानोर यांच्या निधनाने रसिक मनाचे रानाशी मैत्र घडवून देणारा कवी हरपला. त्यांच्या निधनाने मराठी साहित्याला एका वेगळ्या उंचीवर नेणारा महान साहित्यिक आपण गमावला आहे. त्यांनी कवितेला हिरवा शालू नेसवला. निसर्ग आणि स्त्री ही महानोरांच्या कवितेची केंद्रस्थानं आहेत. त्यांच्या कवितेत विविध गंध आहेत, ध्वनी आहेत. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राने एक थोर साहित्यिक गमावला.
देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री
महानोर यांच्या निधनाची वार्ता मनाला चटका लावून जाणारी आहे. त्यांच्या जाण्याने रानावनातील निसर्गकवी हरपला.
- सुधीर मुनगंटीवार, सांस्कृतिक कार्यमंत्री
ना. धों. महानोर हे ग्रामीण भागातील पाणी आणि शेती यांच्याशी नाळ जोडलेले महान व्यक्तिमत्त्व होते. दुष्काळी महाराष्ट्राला दिशा देण्याच्या दृष्टीने त्यांनी आमदार असताना सगळ्यात पहिल्यांदा विधान परिषदेत जलसंधारण हे स्वतंत्र मंत्रालय असावे, अशी मागणी केली होती. तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी ही मागणी मान्य करून स्वतंत्र जलसंधारण मंत्रालय केले.
म्हणून महाराष्ट्रातील जलसंधारणाचे खरे नायक म्हणून महानोर यांच्याकडे पाहिले जाते. तरुणांना माती आणि पाण्याचे महत्त्व आपल्या लेखणीतून तसेच चित्रपट गीतातून सांगणारे ते महान व्यक्तिमत्त्व होते. आजही त्यांचे साहित्य प्रत्येकाच्या मनाला भुरळ घालणारे आहे. त्यांचे वैशिष्ट्य म्हणजे ते शेवटपर्यंत आपल्याच गावी खेड्यात राहिले. ग्रामीण जीवनाची महती सांगणारा साहित्यिक हरवला.
- पोपटराव पवार, कार्याध्यक्ष, आदर्श गाव योजना प्रकल्प व संकल्प समिती
गेल्या आठवड्यात त्यांची भेट झाली. चार पिढींना त्यांनी नवा आयाम दिला. हिरवळ झाडांची पानगळ होते तशी लखलखते चैतन्य निघून गेले आहे. ४० वर्षांचा त्यांचा सहवास लाभला असून वैयक्तिक हानी झाली आहे.
- प्रकाश होळकर, कवी, नाशिक.
महानोर यांनी मराठी कवितेला सर्वसामान्यांपर्यंत नेले. चिंतन गर्भ कवितेमुळे मराठी साहित्य समृद्ध केले. त्यांच्या इतका प्रसिद्ध लोकाभिमुख कवी मराठी साहित्यात निरळाच असतो. त्यांच्या निधनाने मराठी साहित्यात पोकळी निर्माण झाली आहे.
- रावसाहेब कसबे, ज्येष्ठ विचारवंत.
महानोर यांच्या रूपाने एक प्रतिभाशाली आणि आपल्या शब्दांनी रसिकांना समृद्ध करणारा कवी आणि भूमिपुत्र हरपला याचे अतीव दुःख आहे. ‘पाणी आडवा, पाणी जिरवा’ या संकल्पनेचे जनक म्हणून महानोर दादा ओळखले जातात. तसेच शास्त्रीय आणि अत्याधुनिक शेतीचे ते पुरस्कर्ते होते. माझ्या वडिलांचे शब्द साक्षीला आहेत.
ते म्हणाले होते, ‘निसर्ग म्हटला म्हणजे त्यात सुंदरता आहे, अलंकार आहेत, लावण्य आहे; पण त्याबरोबरच नागमोडी पायवाट आहे, दगड-धोंडे आहेत, खळखळणारे झरे आहेत. काटेसुद्धा आहेत, दु:ख आहे, वेदना आहे, व्यथा आहे. बस, असेच चित्रण नामदेवने आपल्या कथा, कादंबऱ्या आणि कवितांमधून केले आहे. तो जसा जगला तसेच त्याने लिहिले. महानोर दादांना आदरपूर्वक भावपूर्ण श्रद्धांजली.
- अशोक जैन, अध्यक्ष, जैन इरिगेशन.
महानोर यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद आहे. हाडाचे शेतकरी असलेल्या महानोर यांनी आपल्या शब्दांतून अनेक पिढ्यांना रानाची, निसर्गाची सफर घडवली.
-छगन भुजबळ, अन्न व नागरी पुरवठामंत्री
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.