
Pune News : मराठी साहित्य रसिकांना रानकवितांची भुरळ पाडणारे आणि निसर्गाशी एकरूप झालेले ज्येष्ठ कवी नामदेव धोंडो ऊर्फ ना. धों महानोर (वय ८०) यांचे गुरुवारी (ता. ३) सकाळी पुण्यात निधन झाले.
गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारा दरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात दोन मुले, तीन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. पळसखेड येथे आज (ता. ४) त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत.
महानोर यांनी लिहिलेल्या ‘या नभाने या भुईला दान द्यावे’, ‘मी रात टाकली’, ‘असं एखादं पाखरू वेल्हाळ’, ‘घन ओथंबून येती’ यांसारख्या अनेक कविता आणि गीतांनी मराठी मनावर गारूड केले. ‘गुंतलेले प्राण या रानात माझे’ या त्यांच्या ओळींप्रमाणेच आयुष्यभर त्यांची निसर्गाशी अतूट नाळ जोडलेली होती.
देखण्या निसर्गप्रतिमा आणि बोलीभाषेतील शब्दांचा सहज वापर, हे त्यांच्या कवितेचे वैशिष्ट्य होते. कवितेसह शेतीतही ते तितकेच रमले. पळसखेड या आपल्या गावी त्यांनी शेतीत अनेक प्रयोग केले. विधान परिषदेत राज्यपाल नियुक्त आमदार म्हणून काम करतानाही शेतीविषयक प्रश्नांवर त्यांनी झपाटून काम केले.
महानोर यांचा जन्म पळसखेड (जि. छत्रपती संभाजीनगर) येथील शेतकरी कुटुंबातील. वयाच्या दहाव्या वर्षी पुढील शिक्षणासाठी ते शेंदुर्णीच्या शाळेत दाखल झाले. तेथेच त्यांची कवितेशी सुरुवातीला ओळख झाली आणि त्यांना कवितेची गोडी लागली.
मॅट्रिक झाल्यानंतर ते जळगावच्या मूळजी जेठा महाविद्यालयात कला शाखेत शिक्षण घेण्यासाठी दाखल झाले. परंतु घरातील अडचणींमुळे त्यांना वर्षभरातच शिक्षण सोडून गावी परतावे लागले. महानोरांचे शिक्षण थांबले आणि ते शेतीत रमले. तेथूनच त्यांच्यातील निसर्गकवीला धुमारे फुटले.
निसर्गातील अनुभवांचे अस्सलपण महानोर यांच्या कवितेत उतरले. त्यांचे ‘रानातल्या कविता’, ‘पावसाळी कविता’, ‘वही’, ‘प्रार्थना दयाघना’, ‘तिची कहाणी’, ‘पुन्हा कविता’, ‘अजिंठा’, ‘गांधारी’ आदी साहित्य संपदा प्रसिद्ध आहे. ‘जैत रे जैत’ या चित्रपटासाठी त्यांनी लिहिलेली गीतेही प्रचंड लोकप्रिय झाली.
‘सर्जा’, ‘एक होता विदूषक’, ‘मुक्ता’, ‘दोघी’ आदी चित्रपटांसाठीही त्यांनी गीतलेखन केले. त्यांना केंद्र सरकारचा ‘पद्मश्री पुरस्कार’, ‘साहित्य अकादमी पुरस्कार’, राज्य सरकारचा ‘वि. दा. करंदीकर जीवनगौरव पुरस्कार’ आदी पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.
आज सायंकाळी पाच वाजता अंत्यसंस्कार
महानोर यांच्या पार्थिवावर शुक्रवारी (ता. ४) सायंकाळी ५ वाजता शासकीय इतमामात पळसखेडमध्ये ‘सुलोचना बाग’ या शेतात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
‘ॲग्रोवन’शी अनोखा ऋणानुबंध
ना. धों. महानोर यांचा ‘ॲग्रोवन’शी अनोखा ऋणानुबंध होता. लेखन सहभागासह ‘ॲग्रोवन’च्या विविध उपक्रमात ते सहभागी व्हायचे. २० एप्रिल २००५ रोजी ‘ॲग्रोवन’च्या पहिल्या अंकाच्या प्रकाशन समारंभात ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासह महानोर हे प्रमुख उपस्थित होते. ‘ॲग्रोवन’च्या प्रारंभानिमित्त त्यांनी विशेष लेख लिहिला होता.
त्यात त्यांनी म्हटले होते, की ‘‘जगभराच्या शेतीच्या ज्ञानाचा सांधा, राज्याराज्यांतले नवे प्रयोग व अडचणी, चांगली शेती करणाऱ्यांची धडपड व यशोगाथा मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांसमोर दररोज येणे ही काळाची गरज आहे. आज ‘ॲग्रोवन’चे महत्त्व त्यासाठीच आहे. ही नवी दिवेलागण आहे. ‘ॲग्रोवन’ नव्या प्रकाशाच्या वाटा शोधण्याचं साधन होणार आहे.’’
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.