Na. Dho. Mahanor : अख्ख्या महाराष्ट्राला लळा लावणारा रानकवी

N. D. Mahanor : महानोरांच्या कवितेला रानाचा लळा होता आणि महानोरांच्या कवितेने अख्ख्या महाराष्ट्राला लळा लावला होता. रानावनातल्या माणसांनाही ही कविता आपली वाटत होती. आणि शहरी मध्यमवर्गीयांनाही ती रम्य वाटत होती.
Na. Dho.  Mahanor
Na. Dho. MahanorAgrowon
Published on
Updated on

इंद्रजित भालेराव

Rankavi N. D. Mahanor : महानोरांच्या कवितेला रानाचा लळा होता आणि महानोरांच्या कवितेने अख्ख्या महाराष्ट्राला लळा लावला होता. रानावनातल्या माणसांनाही ही कविता आपली वाटत होती. आणि शहरी मध्यमवर्गीयांनाही ती रम्य वाटत होती. त्यामुळे महानोरांच्या कवितेचा रसिक चाहता हा रानाडोंगरापासून ते महानगरांपर्यंत पसरलेला होता. त्या काळात महानोरांच्या वाट्याला जे कौतुक आलं ते इतर कुणाही कवीच्या वाट्याला आलं नाही.

१९८०-८२ चा काळ. आमची पिढी नेमकीच वाचायला, लिहायला लागलेली होती. आणि नेमका त्याच काळात महानोर यांच्या कवितेचा डंका वाजत होता. यशवंतराव चव्हाण यांच्यापासून ते लता मंगेशकरांपर्यंत सगळे जण एकसुरात महानोरांच्या कवितेच्या कौतुकाच्या नवबती झडवत होते. ते सगळं कानावर येत होतं. महानोरांचा रानातल्या कविता हा कवितासंग्रह मिळवून, रानामध्येच वाचून आम्हीही त्या कवितेवर बेभान झालेलो होतो. महानोरांच्या कवितेला रानाचा लळा होता आणि महानोरांच्या कवितेने अख्ख्या महाराष्ट्राला लळा लावला होता.

या शेताने लळा लाविला असा असा की
सुखदुःखाला परस्परांशी हसलो रडलो
आता तर हा जीवच अवघा असा जखडला
मी त्याच्या हिरव्या बोलीचा शब्द जाहलो

ही या कविता संग्रहातली महानोरांच्या हस्ताक्षरातली पहिलीच कविता सर्वांना जखडून टाकणारी होती. रानावनातल्या माणसांनाही ती आपली वाटत होती. आणि शहरी मध्यमवर्गीयांनाही ती रम्य वाटत होती. त्यामुळे महानोरांच्या कवितेचा रसिक चाहता हा रानाडोंगरापासून ते महानगरांपर्यंत पसरलेला होता. त्या काळात महानोरांच्या वाट्याला जे कौतुक आलं ते इतर कुणाही कवीच्या वाट्याला आलं नाही.

Na. Dho.  Mahanor
Na Dho Mahanor : मराठी साहित्यातला 'रानकवी' हरपला, ना. धों. महानोर यांचे ८१ व्या वर्षी निधन

१९७८ मध्ये आलेला ‘जैत रे जैत’ चित्रपट आणि त्यातली गाणी सगळ्या महाराष्ट्राच्या दऱ्याखोऱ्यांतून वाजत होती, गाजत होती. ‘जांभूळ पिकल्या झाडाखाली’ या गाण्यासोबत सर्वत्र महानोरांच्याच कवितेचे ढोल वाजत होते. एकापाठोपाठ एक अशा अनेक विक्रमांनी महानोर यांची कविता पुढे पुढे चालली होती. त्या देदीप्यमान यशाकडे आमची पिढी विस्फारीत डोळ्यांनी पाहत होती. त्यापासून प्रेरणा घेत होती. रानातल्या कविता नंतर एकापाठोपाठ एक त्यांचे वही, पावसाळी कविता, पळसखेडची गाणी, प्रार्थना दयाघना असे कवितासंग्रह येत गेले. आम्ही उत्सुकतेने वाट पाहत भारावून वाचत गेलो.

१९८३ मध्ये व्यंकटेश माडगूळकर यांच्या अध्यक्षतेखाली अंबाजोगाईला झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात महानोरांना प्रथम पाहण्याचा योग आला. तिथं त्यांच्या व्यक्तिमत्त्वाने देखील आम्हाला भारावून टाकलेलं होतं. त्यानंतर आम्हाला वसमतच्या बहिर्जी स्मारक महाविद्यालयात मराठी शिकविणाऱ्या प्राध्यापक श्यामलाल अग्रवाल यांच्या राधा या कवितासंग्रहाच्या प्रकाशासाठी महानोर वसमतला आले, तेव्हा त्यांची निवांत आणि सविस्तर भेट झाली.

तेव्हा ते एक मुक्काम वसमतला थांबले होते. तिथून परत जाताना आवर्जून माझ्यासोबत परभणीला माझ्या घरी आले होते. माझ्या आईला आवर्जून भेटले होते. त्या वेळी त्यांच्यासोबत त्यांच्या सहधर्मचारिणी सुलोचनाताई होत्या. त्यांची एक बहीण परभणीच्या कृषी विद्यापीठातील प्रा. शिंदे यांना दिलेली होती. त्यांच्याही घरी आम्ही गेलेलो होतो. माझ्याकडून परत गेल्यावर त्यांनी मला एक उत्स्फूर्त आणि सुंदर पत्र लिहिलं होतं. ते मी कायम काळजाजवळ जपून ठेवलं.

नंतर अनेकदा महानोरांच्या भेटी होत राहिल्या. त्यांच्या एका भाच्यानं मला नंतर कळवलं की माझा पीकपाणी कवितासंग्रह आला तेव्हा आमदार निवासात ते सतत तो कवितासंग्रह वाचताना दिसायचे. मी अनेकदा पळसखेड्यालाही गेलो. एकदा त्यांच्या अमृत महोत्सवानिमित्त साताठ वर्षांपूर्वी पळसखेडला जयराम खेडेकर यांनी एक कार्यक्रम ठेवला होता. तेव्हा त्यांच्या शेतावर माझ्या विद्यार्थ्यांची सहल घेऊन मी गेलो होतो. तेव्हा त्यांच्या कवितेवर प्रेम करणारे, माझे सगळे विद्यार्थी पाहून त्यांना खूप आनंद वाटला होता.

महानोर हाडाचे शेतकरी होते. त्यांनी शेतकरी म्हणून जे अनुभव घेतले त्यातून त्यांची कविता फुलत गेली. पण त्यांना ग्रामीण कवी ही कोटी मान्य नव्हती. ते अस्सल कवी होते. त्यांनी कवितेत निसर्ग आणला. त्यांची कविता रोमॅंटिक होती, पण तिची जातकुळी वेगळी होती. रूढ अर्थाने रोमॅंटिकपणाच्या सगळ्या कक्षा ओलांडून तिने वेगळी उंची गाठलेली होती. त्यांची शब्दकळा विलक्षण चित्रदर्शी होती. निसर्ग हा त्यांच्या जगण्याचा उद्‍गार होता. त्यांच्या कवितेत निसर्ग हा केवळ वर्णनविषय नव्हता, तर त्यांनी शेतकऱ्याचं जगणं, त्याची सुख-दु:खं, दुष्काळ, दारुण अवस्था असं सगळं शेतकरी भावजीवन आपल्या कवितेत आणलं. एक कवी म्हणून ते थोर होते. त्यांना केवळ रानकवी किंवा निसर्गकवी या संबोधनांच्या मर्यादेत अडकवणं त्यांच्या प्रतिभेचा अनादर करण्यासारखं आहे. त्यांचं गद्य लिखाणही त्यांच्या कवितेसारखंच खणखणीत होतं. त्यांनी विधान परिषदेत आमदार म्हणून केलेलं कामही भरभक्कम आहे. फळबाग लागवड योजना आणि जलसंधारण धोरण आखण्यामध्ये महानोरांनी महत्त्वाची भूमिका निभावली.

गेल्या काही दिवसांपासून महानोर आजारी होते. तीन-चार वर्षांपूर्वी सुलोचनाबाई गेल्यानंतर तर ते खचूनच गेले. नंतर त्यांनी उभारी धरलीच नाही. सारखा सुलोचना बाईंचा ध्यास घेतला. त्यांच्या आठवणीचं पुस्तकंही त्यांनी लिहिलं. कारण त्या आठवणींमधून आणि सुलोचनाबाईमधून त्यांचं मन बाहेर पडायला तयारच नव्हतं. त्यांना कोणी भेटायला गेलं तरीही सुलोचनाबाईंच्याच आठवणीत ते रमून जायचे. त्या जिथे बसायच्या तिथे बसायचे. त्याच्या खोलीत आजारी अवस्थेत झोपायच्या तिथे जाऊन झोपायचे. सुलोचनाबाईंच्या जाण्यानं त्यांना फार मोठा धक्का बसलेला होता. त्यातून ते सावरले नाहीत. शेवटी ते सुलोचनाबाईंकडे निघून गेले.

या नभाने या भुईला दान द्यावे,
आणि या मातीतून चैतन्य गावे
कोणती पुण्ये अशी येती फळाला,
जोंधळ्याला चांदणे लगडून जावे...

या नभाने या भुईला दान द्यावे,
आणि माझ्या पापणीला पूर यावे
पाहता सुगंध कांती सांडलेली,
पाखरांशी खेळ मी मांडून गावे !

गुंतलेले प्राण या रानात माझे,
फाटकी ही झोपडी काळीज माझे
मी असा आनंदुन बेहोष होता,
शब्दगंधे तू मला बाहूत घ्यावे...

- ना. धों. महानोर

---------
(लेखक मराठीतील ख्यातनाम कवी आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com