
Akola News : येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून डॉ. शरद गडाख यांनी वर्षभरापूर्वी पदभार स्वीकारला होता. या काळात त्यांनी विद्यापीठाचे उत्पन्न विविध माध्यमातून वाढीसाठी प्रयत्न सुरू केले.
सोबतच विद्यापीठाचे तंत्रज्ञान थेट बांधापर्यंत कसे जाईल यादृष्टीने काही ठोस पाऊलेही उचलली आहेत. शिवाय विद्यापीठाच्या प्रक्षेत्रावर मोठ्या प्रमाणात बदलही दिसू लागले आहेत. सुमारे १६० एकरांपेक्षा अधिक क्षेत्रावर नवीन फलोत्पादन बागाही उभ्या होत आहेत.
डॉ. गडाख यांची १९ सप्टेंबर २०२२ रोजी राज्यपालांनी नियुक्ती केली होती. त्यानंतर काही दिवसांतच त्यांनी कामकाजाची घडी सुरळीत करण्यासाठी काम सुरू केले. सकाळी साडेआठ वाजता कार्यालयात दाखल होणारे कुलगुरू हे दिवसभर कार्यालयीन कामांसह प्रक्षेत्रांनाही नियमितपणे भेटी देतात.
नागपूर शहरात डॉ. पंजाबराव देशमुख आंतरराष्ट्रीय कृषी सेवा सुविधा केंद्र मंजूर झाले असून यासाठी २२७ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. नागपूरच्या कृषी महाविद्यालयाच्या प्रस्तावित नवीन इमारतीला हाय पवार समितीची मान्यता मिळाली आहे.
नागपूर येथे सर्व सुविधायुक्त अतिथी गृहाचे लोकार्पण होऊन अभ्यांगतांचे सोयीत भर पडेल. विदर्भातील महत्त्वाचे असणाऱ्या संत्रा पिकाच्या गुणवत्ता सुधार करिता सुमारे आठ कोटी रुपयांचा प्रकल्प अकोला, नागपूर व काटोल येथे कार्यान्वित झाला आहे. नागपूरच्या लौकिकात भर घालणाऱ्या महाराज बाग येथील सुधारित आराखड्याला ‘सेंट्रल झू अथोरिटी’कडून मान्यता मिळाली आहे.
या कृषी विद्यापीठाद्वारे निर्मित आणि प्रक्रियायुक्त कृषी निविष्ठा सर्वांनाच सहजतेने उपलब्ध व्हाव्यात म्हणून सेल्स काउंटरची संकल्पना पुढे आणली. नागपूर येथे अशा प्रकारच्या सेल काउंटरचे नुकतेच लोकार्पण झाले, नागपूर कृषी महाविद्यालय हेरिटेज वास्तूसाठी सात कोटी ७० लाखांच्या प्रस्तावास कृषी मंत्र्यांनी तत्त्वतः मंजुरी दिली आहे. वर्षभराच्या काळात विद्यापीठाचे विद्यार्थी विविध परीक्षांमध्ये झळकले आहेत.
वनस्पती शास्त्र विभागास ११ कोटी ९० लाख रुपयांचा प्रकल्प महाराष्ट्र शासनाने मंजूर केला आहे. नवीन नोकर भरतीसाठीही विद्यापीठाने प्रक्रिया सुरू केली. आकृतिबंध मंजूर झाले असून शासनाकडे आपला प्रस्ताव देखील सादर केला आहे.
ब्रीडर सीड उत्पादनावर जोर
कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी संशोधित केलेले विविध पीकवाण शेतकऱ्यांना लवकर उपलब्ध झाले पाहिजेत यासाठी पैदासकार बियाणे (ब्रीडर सीड) उत्पादन वाढवण्यावर खास जोर दिला जात आहे. सात हजार क्विंटलवरून हा लक्ष्यांक यंदा १८ हजार क्विंटल एवढा करण्यात आला.
बाह्य निधी मिळवून घेण्यासाठी विविध संस्थांना प्रकल्प सादर करण्यात आले. आयसीएआर तसेच केंद्र शासनाकडे ३२ कोटी रुपयांचे १३ प्रकल्प, महाराष्ट्र शासनाकडे ५८ कोटी रुपयांचे २६ प्रकल्प, आरकेव्हीवाय अंतर्गत १२५ कोटी रुपयांचे ३५ प्रकल्प, राजीव गांधी सायन्स अँड टेक्नॉलॉजीकडे दोन कोटी रुपयांचे २७ प्रकल्प आहेत. असे एकूण २१६ कोटी रुपयांचे एकूण १०३ प्रकल्प प्रस्ताव विविध वित्तीय संस्थांना पाठवण्यात आले आहेत.
विस्तार कार्यावर जोर
विद्यापीठाचे तंत्रज्ञान बांधापर्यंत पोचविण्यासाठी शेतकरी- शास्त्रज्ञ मंचासारखी अभिनव संकल्पना सुरू झाली. सोबतच कृषी विस्तारामध्ये शिवार फेरी, ॲग्रोटेक, महिला मेळावा, खरीपपूर्व कृषी मेळावा, कृषिदिन, आकाशवाणी, दूरदर्शनच्या माध्यमातून विद्यापीठ मागील एका वर्षात शेतकऱ्यांपर्यंत पोचवण्याचे प्रयत्न झालेले आहेत.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.