
नगर : संगमनेर शहरानजीकच्या गुंजाळवाडीमधील देशमुखनगर परिसरातील एका घराच्या पोर्चमधून चार वर्षे वयाच्या मुलाला बिबट्याने (Leopard Attack) उचलून नेल्याची घटना शनिवारी (ता. १४) सायंकाळी सातच्या सुमारास घडली. आईने जिवावर उदार होऊन पोटच्या गोळ्याला मृत्यूच्या दाढेतून खेचले.
गेल्या काही दिवसांपासून गुंजाळवाडी परिसरातील रहिवासी वस्तीत बिबट्याचा वावर वाढला आहे. सायंकाळी या परिसरातील सिमेंट पोल फॅक्टरीच्या परिसरातील कृष्णाई बिल्डिंगच्या पाठीमागील भागात मोठ्या प्रमाणात बाभळींचे रान माजले आहे.
संभाजी पवार यांच्या राहत्या घराजवळ खेळणाऱ्या शिवमवर (वय ४) बिबट्याने अचानक हल्ला केला. त्याच्या मानेला पकडून ओढत समोरच्या मोकळ्या प्लॉटमध्ये नेले. या वेळी जवळच त्याची आजी व चुलती बसलेली होती.
त्यांनी आरडाओरडा केल्याने, त्याची आई रत्नश्री हिने बिबट्याच्या पाठीमागे धाव घेऊन, मुलाला त्याच्या तोंडातून ओढून काढले. या घटनेत मुलाच्या हनुवटीजवळ जखम झाली, तसेच त्याच्या छातीला बिबट्याच्या पंजामुळे जखमा झाल्या.
कुटुंबीयांनी त्याला तातडीने जवळच्या खासगी दवाखान्यात प्रथमोपचारासाठी नेले, तसेच घुलेवाडीच्या ग्रामीण आरोग्य केंद्रात हलवले.
घटनास्थळी दाखल झालेल्या वन विभागाच्या पथकाने शोध घेतला असता, झुडपात लपलेला बिबट्या दिसला, मात्र संतप्त झालेल्या परिसरातील नागरिकांनी जेसीबी घातल्याने त्याने पळ काढला.
जखमी शिवमच्या हनुवटीला सात ते आठ टाके पडले आहेत. रात्री उशिरापर्यंत वन विभागाच्या पथकाने बिबट्याच्या शोधार्थ परिसर पिंजून काढला. या हल्ल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.