
बहे, जि. सांगली ः कृष्णाकाठावरील गावांमधील शिवारात बिबट्याच्या (Leopard) वावरामुळे लोक दहशतीखाली (Leopard Terror) आहेत. बिबट्याचा वावर, त्यातच बिबट्याचा शेतकऱ्यांवर हल्ल्याचा प्रयत्नांमुळे लोक शेतात जायला घाबरत आहेत. त्याचबरोबर ऊस तोडणी मजुरांनीही याची धास्ती घेतली आहे.
कृष्णाकाठावरील बहे, हुबालवाडी, खरातवाडी, तांबवे आदी कृष्णा नदीकाठच्या शेत-शिवारात वरचेवर बिबट्याचे दर्शन होत आहे. मागील दीड-दोन महिन्यात बिबट्याने शेतकऱ्यांवर हल्ल्याचा प्रयत्न केला होता. आधी हुबालवाडी येथील शेतकऱ्यावर, त्यानंतर तांबवे येथील शेतकऱ्यावर हल्ल्याचा प्रयत्न केला होता. तीन महिन्यापूर्वी तांबवे येथे बिबट्याच्या हल्ल्यात दोन शेळ्या ठार झाल्या होत्या.
दरम्यान, बहे-बोरगाव रस्त्यावर फार्णेवाडी जवळ बहेच्या शिवेवर शुक्रवारी दुपारी बिबट्याच्या तीन बछड्यांचे दर्शन झाले होते. त्यानंतर त्याच रात्री बछड्यांच्या शोधात असलेला बिबट्या लोकांना दिसला. अधून-मधून काही ठिकाणी बिबट्या दिसल्याच्या चर्चा आहेतच. कृष्णाकाठाला आधीच सापांची भीती होती. आणि आता बहे परिसरात बिबट्याचा वावर यामुळे शेतकरी तसेच मजूरवर्ग शेतात जायला धजावत नाही.
कृष्णाकाठाला सध्या मोठ्या प्रमाणात ऊसतोडी सुरू आहेत.बिबट्याच्या वावराची ऊस तोडणी मजुरांनाही चांगलीच धास्ती घेतली आहे.परिसरात ऊस तोडणी मजुरांच्या टोळ्या आल्या आहेत.पण, बिबट्याच्या भीतीने या टोळ्या रानामाळात राहायला तयार नाहीत.गावाशेजारीच आमची राहण्याची आमची सोय करा आणि त्याठिकाणी पुरेशा विजेची सोय करा,अशी मागणी ऊस तोडणी मजूर करताना दिसत आहेत.
ऊसपट्ट्यातच बिबट्याचा वावर असल्याने शेतकरी व ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. पिकांना पाणी पाजण्यासाठी रात्री-अपरात्री शेतात जावे लागत आहे. बिबट्याच्या वावराच्या चर्चेने शेतकऱ्यांना जीव मुठीत घेऊन शेतात जावे लागत आहे. बिबट्याने पाळीव जनावरांसह लोकांवरही हल्ला करण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये बिबट्याची दहशत पसरली आहे. त्यामुळे बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांतून होत आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.