
Chana Market Update : बंद पडलेली हरभरा खरेदी (Chana Procurement) पुन्हा सुरू करण्याचे आदेश अद्याप आलेले नसल्याने शिल्लक राहिलेल्या शेतकऱ्यांमध्ये रोष निर्माण होऊ लागला आहे. ‘नाफेड’कडून (NAFED) विभागाला मिळालेल्या एकूण लक्ष्यांकापैकी ८१ टक्के हरभरा खरेदी झाला असून उर्वरित १९ टक्के हरभरा खरेदीसाठी मंजुरीची प्रतीक्षा कायम आहे.
अमरावती विभागात यावर्षी ९२.६५ लाख टन हरभऱ्याचे उत्पादन गृहित धरण्यात आले असून त्यातील २५ टक्के म्हणजे २३.१६ लाख टन खरेदीचे लक्ष्यांक देण्यात आले होते.
जिल्हा मार्केटिंग व विदर्भ मार्केटिंग फेडरेशनसह महाएफपीसी, वॅपको अशा संस्थांना हे लक्ष्यांक विभागून देण्यात आले आहे. यापैकी जिल्हा मार्केटिंगचे लक्ष्यांक पूर्ण होत आल्याने खरेदी बंद करण्याच्या सूचना देण्यात आल्या. शनिवारपासून खरेदी थांबविण्यात आली आहे.
विभागातील पाच जिल्ह्यात १३ एप्रिलपर्यंत १८.९४ लाख टन हरभरा खरेदी झाला असून लक्ष्यांक पूर्ण करण्यासाठी ४.२१ लाख टन खरेदी करणे शिल्लक आहे. ११ जूनपर्यंत खरेदीची मुदत असताना १५ एप्रिलपासून खरेदी बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांनी रोष व्यक्त केला आहे.
विशेषतः जिल्हा मार्केटिंगचे केंद्र बंद झाल्याने शेतकरी चिडले आहेत. त्यांनी ही खरेदी पूर्ण करण्याचा आग्रह धरला आहे.
गतवर्षीही हरभरा खरेदी अचानक पोर्टल बंद करून थांबविण्यात आली होती. यंदा पोर्टल चालू असले तरी जिल्हा मार्केटिंगला खरेदी बंद करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
या यंत्रणेकडील शिल्लक लक्ष्यांक इतर यंत्रणांना विभागून देण्यात येण्याची शक्यता असल्याचे जिल्हा मार्केटिंग अधिकारी कल्पना धोपे यांनी सांगितले.
दरम्यान हरभरा खरेदी पुन्हा सुरू करण्यासंदर्भात वरिष्ठ पातळीवर बैठक सुरू असून येत्या एक दोन दिवसांत निर्णय होणार असल्याचेही त्या म्हणाल्या.
विभागाची हरभरा खरेदीची स्थिती (लाख टन)
उत्पादन : ९२.६५
लक्ष्यांक : २३.१६
खरेदी : १८.९४
शिल्लक : ४.२१
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.