
Nashik News : पालकमंत्री जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष असतात. त्यांच्या वर्षभराच्या कामकाजात निधी नियोजनावरून अस्वस्थ असलेल्या आमदारांनी शुक्रवारी (ता. १४) जिल्हा नियोजन बैठकीत प्रश्नांची सरबती करीत रान उठवले.
भारतीय जनता पक्षाच्या तिन्ही आमदारांनी महापालिकेकडून ना हरकत दाखलेच मिळण्यात अडवणूक होत असल्याबद्दल धारेवर धरले; तर १५ दिवसांपासून सत्तेत आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी सत्तेत असल्याची जाणीव करून देताना आमदारांना विचारल्याशिवाय काम अंतिम करू नका, असा इशाराच दिला.
हे कमी की काय; पण दस्तुरखुद्द शिवसेनेच्या शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे यांनी पालकमंत्र्यांनी मंजूर केलेल्या कामावर प्रश्न उपस्थित करीत नांदगाव मतदार संघातील ४२ गावांत कामे नसल्याच्या मुद्यावर जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अर्जुन गुंडे यांच्यावर इतके आरोप केले, की गुंडे यांना सभागृहातच भोवळ आली.
पालकमंत्री दादा भुसे यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन भवनात झालेल्या बैठकीला विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, खासदार हेमंत गोडसे, आमदार माणिकराव कोकाटे, नितीन पवार, दिलीप बोरसे, हिरामण खोसकर, राहुल ढिकले, सीमा हिरे, सुहास कांदे, मौलाना मुफ्ती, देवयानी फरांदे, किशोर दराडे, जिल्हाधिकारी गंगाथरण डी., मनपा आयुक्त भाग्यश्री बानायत, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, नियोजन अधिकारी किरण जोशी आदी उपस्थित होते.
सगळेच सत्ताधारी...
शिंदे गटाचे पालकमंत्री दादा भुसे यांच्या मान्यतेने मॉडेल शाळा, प्रशासकीय मान्यतेनंतर रद्द केलेली ३५ कोटींची कामे, मतदार संघनिहाय निधीवाटप आदी मुद्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी पंचनामा करीत, आता आपणही सत्तेत असल्याची जाणीव करून देताना आमदारांना विचारल्याशिवाय कामे करू नये, असा इशारा दिला.
काँग्रेसचे एकमेव आमदार हिरामण खोसकरही यात मागे नव्हते. एकूणच आजच्या बैठकीत, पालकमंत्री वर्षापासून अध्यक्ष असलेल्या जिल्हा नियोजन समितीच्या निधी नियोजनाची खदखद जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत समोर आली.
सत्तेत असल्याची राष्ट्रवादीकडून जाणीव
भुजबळांसोबत सत्तेत आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी निधीवाटपात झालेल्या नाराजीचा सूर आळविताना निधीवाटपात प्रशासकीय मान्यता दिलेली कामे रद्द कशी केली, यावरून जाब विचारला.
मॉडेल स्कूल, वर्गातील साउंड सिस्टिम, फेरनियोजनाचा आग्रह धरताना आमदारांना विचारल्याशिवाय धरलेली कामे रद्द करा, तसेच आमदारांना विचारल्याशिवाय कामे धरू नका, अशी एकमुखी मागणी केली कोकाटे यांनी निधीवाटप, तर झिरवाळ यांनी बांधकामसह विविध विभागांच्या कामांविषयी प्रश्न उपस्थित केले.
लोकप्रतिनिधींच्या समन्वयाने कामांचे नियोजन व्हावे : पालकमंत्री
जिल्हा वार्षिक योजनेतील कामांची निवड करताना स्थानिक लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन व त्यांच्याशी समन्वय ठेवून कामांचे नियोजन करण्यात यावे, असे निर्देश पालकमंत्री दादा भुसे यांनी सर्व अधिकाऱ्यांना दिले.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.