Onion Market : कांद्याचे कमाल दर दाखवून शेतकऱ्यांची दिशाभूल

Kanda Bajarbhav : उन्हाळ कांद्याला मिळत असलेल्या सध्याच्या दरामुळे शेतकऱ्यांची मोठी आर्थिक कोंडी झाली आहे.
Onion Market
Onion MarketAgrowon
Published on
Updated on

Nashik News : उन्हाळ कांद्याला मिळत असलेल्या सध्याच्या दरामुळे शेतकऱ्यांची मोठी आर्थिक कोंडी झाली आहे. सप्ताहात प्रतिक्विंटल किमान १०० रुपयांपासून ३ हजार रुपयांपर्यंत दर निघाले. मात्र प्रत्यक्षात ५०० ते ८०० रुपये शेतकऱ्यांच्या पदरी पडले. उत्पादन खर्चाच्या खाली खरेदी सुरू असताना कमाल दर दाखवून शेतकऱ्यांची दिशाभूल करण्याचा प्रकार बाजार समित्यांकडून होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संताप आहे.

जिल्ह्यात प्रामुख्याने पिंपळगाव बसवंत, लासलगाव, विंचूर उपबाजार आवार, सटाणा, चांदवड, नांदगाव, नामपूर, उमराणे, मुंगसे उपबाजार, येवला, कळवण येथे कांद्याची मोठी आवक होते. या बाजार समित्यांमध्ये खुल्या पद्धतीने होणाऱ्या लिलावांमध्ये कांद्याला अपेक्षित तर मिळत नसल्याची स्थिती आहे. कांदा उत्पादक नैसर्गिक आपत्तीमुळे संकटात आहे. त्यात २ ते ३ हजार रुपये कमाल दर दाखविला जातो. मात्र खरेदी एक हजार रुपयांच्या खाली होत आहे.

Onion Market
Onion Rate : कमी दराच्या मुद्द्यावर विंचूरला कांदा लिलाव पाडले बंद

कांदा लिलावात बोली लावताना काही बाजार समित्यांमध्ये व्यापारी मनमानी करत असल्याबाबत नुकताच सटाणा बाजार समितीमधील व्हिडिओ शेतकऱ्याने शेअर करत आक्रोश मांडला. तर मुंगसे उपबाजार आवारात योग्य बोली न लागल्याने शेतकऱ्याने समोरच मुंबई-आग्रा महामार्गावर कांदा ओतून संताप व्यक्त केला.

Onion Market
Onion Market : महाराष्ट्रातला कांदा का चालला तेलंगणाला?

तर दोनच दिवसांपूर्वी विंचूर उपबाजार आवारात कांद्याला अवघा २०० ते ३०० रुपये दर मिळाल्याने शेतकऱ्यांनी लिलाव बंद पाडून बाजार समिती कार्यालयाला घेराव घातला होता. संतापाची लाट उसळत असताना बाजार समिती व्यवस्थापन, पणन विभाग व जिल्हा उपनिबंधक कार्यालय याकडे गांभीर्याने कधी पाहणार, हा खरा प्रश्‍न आहे.

पिंपळगाव बाजार समितीमध्ये कांद्याची मोठी आवक होत आहे. या ठिकाणी सोमवारी (ता.१२) २३०० रुपये कमाल दर निघाला. मात्र त्यात घसरण होऊन शनिवारी (ता.१७) हेच कमाल दर पुन्हा १,६१७ रुपयांवर आले आहेत. त्यामुळे ६८३ रुपयांची घसरण पाहायला मिळाली.

सरासरी दर स्थिती (प्रतिक्विंटल)

बाजार समिती...१५ जून...१६ जून...१७ जून

पिंपळगाव बसवंत...९५०...९००...८५०

लासलगाव...८७०...९००...१०००

येवला...७५०...७५०...७००

मनमाड...८२०...८००...७००

कळवण...८००...७०१...बंद

सिन्नर...६७५...६००...बंद

देवळा...८५०...८००...बंद

चांदवड...६५०...७००...बंद

नामपूर...८००...८००...बंद

कमाल दराचे फुगवलेले आकडे

शेतकऱ्यांच्या हातात प्रत्यक्ष ५०० ते ८०० रुपये प्रतिक्विंटल दरानेच पैसे येत आहेत. असे असताना पिंपळगाव बसवंत येथे ३ हजार रुपये प्रतिक्विंटल दर पुकारण्यात आला. तर तिसऱ्याच दिवशी हाच कमाल दर निम्म्यावर आला. त्यामुळे कमाल दराचे फुगवलेले आकडे दाखवून आवक वाढविण्याचा प्रकार वारंवार समोर येत आहे.

बाजार समित्यांमध्ये मालाची गुणवत्ता व प्रतवारी असताना देखील मातीमोल दराने खरेदी सुरू आहे. बाजार समिती प्रशासन, पणन विभाग याकडे कधी गांभीर्याने पाहणार? शेतकऱ्याची लूट सुरू असताना व्यवस्था; मात्र मूग गिळून शांत आहे.
- मधुकर मोरे, कांदा उत्पादक, मोरेनगर, ता. सटाणा
चांगल्या मालाला दर टिकून आहेत. मात्र आवक टिकून राहिल्याने दरात चढ-उतार होत आहेत. कांदा टिकवणक्षमता कमी आल्याने शेतकरी माल बाजारात आणत असल्याने ही स्थिती आहे.
- मनोज जैन, कांदा व्यापारी, लासलगाव, जि. नाशिक
नेमक्या कोणत्या बाजार समितीत कांदा विक्रीला घेऊन जायचा याबाबत शेतकऱ्यांमध्ये गोंधळाची स्थिती आहे. बाजारभावात दाखविलेले दर व प्रत्यक्षात शेतकऱ्याला मिळणारे दर यामध्ये तफावत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची फसवणूक होत आहे. बाजार समित्यांवर कोणाचाच वचक राहिलेला नाही.
- भारत दिघोळे, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com