Nifad Market News : लासलगाव बाजार समितीच्या विंचूर उपबाजार आवारात कांद्याला लिलावामध्ये गुरुवारी (ता. १५) रोजी सकाळी पहिल्या सत्रात कमी दर पुकारल्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी लिलाव बंद पाडून सुमारे तासभर आंदोलन केले.
विंचूर उपबाजारात सकाळी शेतकऱ्यांचा उद्रेक पाहायला मिळाला. कांद्याचे लिलाव सुरू झाले. मात्र, कांद्याला लिलावात अवघे २०० ते ५०० रुपये इतका कमी भाव मिळाला. त्यामुळे शेतकरी संतप्त झाले आणि त्यांनी तत्काळ लिलाव बंद पाडले.
त्यानंतर बाजार समिती कार्यालयाला घेराव घातला. बुधवारी (ता. १४) तुलनेत गुरुवारी (ता. १५) ३०० ते ४०० रुपयांची घसरण झाल्याचे लक्षात येताच संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी कांद्याचे लिलाव बंद पाडत बाजार समितीच्या प्रशासनाला वेठीस धरले.
या वेळी बाजार समितीचे संचालक संदीप दरेकर, छबू जाधव, राजेंद्र बोरगुडे, सहायक सचिव प्रकाश कुमावत यांच्यासह लासलगाव पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरिक्षक राहुल वाघ यांनी मध्यस्थी करत कांद्याचे लिलाव पूर्ववत करण्याची मागणी शेतकऱ्यांजवळ केली.
लिलाव झालेल्या वाहनांचे फेर लिलावात कांद्याचे बाजार भाव न सुधारल्यास आपले आंदोलन सुरू ठेवा. मात्र फेर लिलाव एकदा होऊन द्या, या तोडग्यानंतर फेर लिलावामध्ये १०० रुपयांनी वाढून बाजारभाव मिळाला. मात्र संचालक मंडळ गेल्यानंतर कांद्याच्या बाजारभावाची परिस्थिती नंतर ‘जैसे थे’ झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.
हैदराबादेत अधिक दर मग महाराष्ट्रात का नाही?
मिळणाऱ्या बाजारभावातून उत्पादन खर्च तर सोडा वाहतूक आणि मजुरी ही निघत नसल्याची खंत शेतकऱ्यांनी व्यक्त केली.
कांद्याला तेलंगाणा राज्यातील हैदराबाद बाजार समितीत सतराशे ते दोन हजार भाव मिळणार असल्याने हे दर महाराष्ट्र राज्यात पण जाहीर झाले पाहिजे, अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी यावेळी बोलून दाखवली. कांद्याला तीन हजार रुपये हमीभाव द्या.
अतिवृष्टीमुळे कांदा नुकसानीची त्वरित भरपाई खात्यात जमा करा. अल्प दराने विक्री केलेल्या कांद्यास अनुदान द्या, अशा मागण्या आता शेतकरी करत आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.