Agrowon Exhibition : 'भविष्यात शेती राखेल तो राजा असेल'

औरंगाबादच्या चिकलठाणा एमआयडीसीमधील ‘कलाग्राम’ परिसरात ‘सकाळ अॅग्रोवन’ने आयोजित केलेल्या चारदिवसीय कृषी प्रदर्शनाचा उद्‍घाटन सोहळा चांगलाच रंगला.
raosaheb Danve
raosaheb DanveAgrowon

औरंगाबाद ः मराठवाड्याच्या समस्याग्रस्त शेतीसाठी ज्ञान तंत्रज्ञानाचे (Agriculture Technology) माहितीपूर्ण उपाय घेऊन आलेल्या ‘अॅग्रोवन’च्या भव्य कृषी प्रदर्शनाने (Agrowon Agriculture Exhibition) शेतकऱ्यांना प्रोत्साहित केलेच; पण उद्‍घाटन सोहळ्याच्या निमित्ताने केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी शेतीमधील जटील समस्या मांडल्या.

विशेषतः त्यांच्या अस्सल मराठवाडी शैलीतील भाषणाला शेतकऱ्यांनी हशा आणि टाळ्यांनी भरभरून दाद दिली.

औरंगाबादच्या चिकलठाणा एमआयडीसीमधील ‘कलाग्राम’ परिसरात ‘सकाळ अॅग्रोवन’ने आयोजित केलेल्या चारदिवसीय कृषी प्रदर्शनाचा उद्‍घाटन सोहळा चांगलाच रंगला.

केंद्रीय रेल्वे, कोळसा व खनिकर्म राज्यमंत्री रावसाहेब दानवे राज्याचे फलोत्पादन, रोहयोमंत्री व औरंगाबादचे पालकमंत्री संदीपान भुमरे, ‘अॅग्रोवन’चे संपादक संचालक आदिनाथ चव्हाण, ‘सकाळ’च्या मराठवाडा आवृत्तीचे निवासी संपादक दयानंद माने, कन्हैया अॅग्रो उद्योग समूहाचे कार्यकारी संचालक मच्छिंद्र लंके, ‘कन्हैया अॅग्रो’चे कार्यकारी संचालक सुरेश पठारे, बी. जी. चितळे डेअरीचे जनसंपर्क अधिकारी चंद्रशेखर कुलकर्णी, ‘तृप्ती हर्बल’चे मच्छिंद्र मुंडे, ‘महाऊर्जा’चे विभागीय महाव्यवस्थापक विकास रोडे, माजी आमदार नरेंद्र पवार आदी मान्यवर उपस्थित होते.

raosaheb Danve
Agrowon Exhibition : शेतीसाठी शास्त्रशुद्ध शहाणपण हवे: रेल्वे राज्यमंत्री दानवे

या प्रदर्शनाचे मुख्य प्रायोजक ‘कन्हैया अॅग्रो’ आहेत. तसेच ‘बसवंत गार्डन’ असोसिएट पार्टनर आहेत. याशिवाय ‘के बी एक्सपोर्टस’, ‘बी. जी. चितळे डेअरी’, ‘एमआयटी औरंगाबाद’, ‘तृप्ती हर्बल’, महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ, ‘मेडा-महाऊर्जा’, ‘आत्मा-औरंगाबाद’ हे को-स्पॉन्सर्स आहेत; तर ‘इफ्को’ हे गिफ्ट स्पॉन्सर्स आहेत.

शेती नफ्यात का नाही आणि ती नफ्यात कशी आणता येईल, अशा दोन्ही मुंद्यांवर श्री. दानवे यांनी परखडपणे मते मांडली. ते म्हणाले, ‘शेतीत असंख्य समस्या आहेत. त्या सरकारने सोडवाव्यात अशी शेतकऱ्यांची अपेक्षा रास्त आहे.

सरकारदेखील त्यासाठी काम करते. पण त्यानंतरही सर्व समस्या सुटत नाहीत. या समस्यांचे मूळ नफ्याच्या विस्कटलेल्या गणितात आहे. मी आणि भुमरे असे दोघेही शेतकरी आहोत. आम्ही नांगर, वखर स्वतः हाकत नाही; मात्र शेतीचे व्यवस्थापन स्वतः बघतो.

आम्ही केवळ कागदावरचे शेतकरी नसून, शेतीत प्रत्यक्ष सारी कामे केलेली आहेत. त्यामुळे आम्ही खरे शेतकरी आहोत. स्वतः संदीपान भुमरे यांनी त्यांची १०० एकरची शेती बघण्यासाठी मला बोलावले.

त्यानंतर मीदेखील माझी १०० एकरची शेती बघण्यासाठी त्यांना निमंत्रित केले. खरे तर सरकारने शेतीत गुंतवणूक करायलाच हवी. तुम्ही कितीही नांगरा, वखरा, कोणतेही पीक लावा, शेवटी सरकारची गुंतवणूक व सहभाग असल्याशिवाय शेती फायद्यात येणार नाही.

ही गुंतवणूक म्हणजेच विविध योजना व त्यासाठी दिल्या जाणाऱ्या अनुदानाची आहे. भुमरे साहेबांनी तशा अनेक योजना दिल्या आहेत.’

raosaheb Danve
Agrowon Exhibition : 'अॅग्रोवन' कृषी प्रदर्शनाला शेतकऱ्यांचा उदंड प्रतिसाद

‘शेतीमध्ये शेततळे असणे काळाची गरज झाली आहे. काळानुसार आता आपल्याला बदलावे लागेल, कारण आता पावसाने आणि मजुरांनीही त्यांच्या वेळा बदलल्या आहेत. पूर्वी पाऊस वेळेत टप्प्याटप्प्याने येत होता.

पण आता पाऊस कमी पडत नसला, तरी केव्हाही पडतो आहे. तसेच मजूर पूर्वी कामे मागण्यासाठी मोठ्या संख्येने शेतकऱ्यांच्या शेतात जमत. आता तसे राहिले नसून मजूर वेळेत मिळत नाहीत.

त्यामुळे हक्काचा पाणीसाठा असल्याशिवाय शेती करता येणार नाही. तसेच शिकलेली माणसे शेतीत आल्याशिवाय शेती सुधारणार नाही’, असे मतही श्री. दानवे यांनी मांडले.

raosaheb Danve
Agrowon Exhibition : अॅग्रोवन कृषी प्रदर्शनास औरंगाबादेत शानदार प्रारंभ

पिकायचे कळते; पण विकायचे कळायला हवे

अनेक शेतकरी ‘अॅग्रोवन’ वाचतात व शेतीमधील समस्या सोडविण्याचा प्रयत्न करतात. शिकलेला आणि तांत्रिक माहिती समजून घेणारा माणूस शेतीत आल्याशिवाय शेती सुधारणार नाही. देशाच्या पंतप्रधानांनी माती परीक्षणाच्या सुविधा दिल्या; मात्र माती तपासणीचा कागद घरात तसाच पडून असतो.

शास्त्रीय माहिती न घेता आपण खतांचा मारा खरतो आणि पीक हिरवे दिसले की खुश होतो. बेसुमार खत वापरणे परवडणार नाही. कारण युरियाच्या एका गोणीमागे सरकारला अडीच हजार रुपये अनुदान मोजावे लागते.

दुसरे म्हणजे आम्हाला पिकवायचे कळते; पण विकायचे कळत नाही. त्यामुळे दलाल फायदा घेतात. किसान रेल सरकारने सुरू केली; मात्र त्यात दलालांचा माल होता, असे श्री. दानवे यांनी नमूद केले.

भविष्यात शेती राखेल तो राजा असेल

‘आमच्या मागे फिरण्यापेक्षा शेतीकडे लक्ष द्या,’ असे स्पष्ट आवाहन शेतकरी कार्यकर्त्यांना करीत श्री. दानवे म्हणाले, ‘मी स्पष्ट बोलतो म्हणून माझ्यावर टीका होते. पण माझ्या भागातील लोकांप्रमाणेच बोलतो. आमच्या मागे फिरण्यापेक्षा शेतीतून फायदा करून घेण्यासाठी ‘अॅग्रोवन’ वाचा.

शेतकऱ्यांनी अभ्यासूपणे शेती केल्यास समृद्ध होता येते. तसेच सरपंचांनी मनावर घेतल्यास गाव आणि गावच्या शेतीचाही विकास होऊ शकतो. मी स्वतः गावचा सरपंच होतो.

चांगली शेती करण्यासाठी वाचन करा, इंटरनेटचा आधार घ्या, यू-ट्यूब बघा. आता अधिक शहाणे झाल्याशिवाय पर्याय नाही; मात्र हे लक्षात ठेवा, की भविष्यात शेती राखेल तोच राजा होणार आहे.’

‘अॅग्रोवन’प्रमाणेच मीदेखील प्रयत्न करतोय ः मंत्री भुमरे

फलोत्पादनमंत्री श्री. भुमरे यांनीही शेतकऱ्यांच्या विकासासाठी चालू असलेल्या प्रयत्नांबाबत कळकळीने मुद्दे मांडले. ‘शेतकऱ्यांच्या विकासासाठी ‘अॅग्रोवन’ जसा काम करतोय; तसेच मीदेखील प्रयत्न करीत आहे. द्राक्ष, डाळिंब, पेरू तसेच इतर पिके आम्ही मनरेगात आणली.

गोठे तयार करणे, शेततळी, अस्तरीकरण, पाणंद रस्ते विकासाच्या योजना आणल्या. लागवडीचे नियम अधिकारी त्यांच्या कार्यालयात बसून ठरवत होते; मात्र अनावश्यक अटी हटवून आम्ही लागवडीचे अंतर स्वातंत्र्य शेतकऱ्यांना दिले.

विहीर खोदाईतील अनावश्यक अटी काढून टाकल्या. विविध योजना राबवून शेतकऱ्यांच्या विकासासाठी कष्टपूर्वक प्रयत्न करतो आहे’, असे श्री. भुमरे म्हणाले.

केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे काय म्हणाले....

- निसर्ग, मजुरांनी वेळा बदलल्या. आता शेतकऱ्यांनी बदलायला हवे. त्यासाठी शेतीचे शास्त्र शिकायला हवे.

- शिकलेली माणसे शेतीत आली तरच शेती सुधारेल.

- सरकारी योजनांमध्ये दलाल घुसलेत; अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांपर्यंत जायला हवे.

- पिकवायचे आम्ही शिकलो; पण दुर्देवाने विकायला शिकलो नाही.

- राशीभविष्य पाहून मी राजकारण करीत नाही. तसे असते तर भविष्य सांगणारे निवडून आले असते.

- शेतकऱ्यांनी शेतीमाल वखारीत ठेवत वखार पावती घ्यावी. पावतीवर कर्ज मिळते. त्याचा लाभ घ्यायला हवा.

- कोणतीही मदत आधी सरकारी कर्मचाऱ्यांकडून वाटली जायची. त्यात घोटाळे व्हायचे. आम्ही थेट शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे टाकून न्याय दिला.

- शेतकऱ्याला अधिक शहाणे करावे लागेल. ते काम ‘अॅग्रोवन’कडून घडते आहे. तुमच्या कृषी प्रदर्शनांमधून ते काम उत्तम घडते आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com