Heavy Rain Crop Damage : अतिवृष्टीचा फटका

Crop Damage Due to Heavy Rain :तीन ते चार दिवसांपासून अतिवृष्टी आणि काही ठिकाणी ढगफुटीसदृश पाऊस झाल्यामुळे अमरावती आणि नागपूर महसूल विभागांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली.
Crop Damage
Crop DamageAgrowon
Published on
Updated on

Nagpur Akola Rain Update : तीन ते चार दिवसांपासून अतिवृष्टी आणि काही ठिकाणी ढगफुटीसदृश पाऊस झाल्यामुळे अमरावती आणि नागपूर महसूल विभागांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली. त्यामुळे खरीप पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. तसेच अनेक नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे.

पावसामुळे अमरावती विभागातील यवतमाळ, अकोला, बुलडाणा, वाशीम जिल्ह्यांत पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तर नागपूर विभागातील चंद्रपूर जिल्हा वगळता इतर जिल्ह्यांत अधिक नुकसान झाले नाही, अशी माहिती कषी विभागाच्या सूत्रांकडून मिळाली आहे.

यवतमाळ जिल्ह्यात सर्वाधिक २ लाख १८ हजार हेक्टर पिकांचे नुकसान झाले आहे. त्यापाठोपाठ बुलडाणा जिल्ह्यातील संग्रामपूर, जळगाव जामोद या तालुक्यांत ७२ हजार हेक्टरला फटका बसला आहे. तसेच अकोला, अमरावती जिल्ह्यांनाही पावसामुळे नुकसानीला सामोरे जावे लागले आहे.

यवतमाळ जिल्ह्यात रविवारी (ता. २३) पावसाने उघडिप देत काहीसा दिलासा दिला असला, तरी शनिवारी (ता. २२) झालेल्या अतिवृष्टीच्या परिणामी सुमारे २ लाख १५ हजार हेक्‍टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. १ हजार ४२६ घरांची पडझड झाली असून, पूर्णतः पडझड झालेल्या घरांची संख्या २३७ आहे.

६ हजार २७५ नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले, तर २८० जणांना बचाव पथकाद्वारे सुरक्षितरीत्या बाहेर काढण्यात आले. यवतमाळ जिल्ह्यात सरासरी ११७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. मात्र विविध मंडळांमध्ये १०० मिलिमीटर म्हणजेच अतिवृष्टीची नोंद झाली.

Crop Damage
Maharashtra Rain Update : चांगल्या पावसाची शक्यता

महागाव तालुक्‍याला याचा सर्वाधिक फटका बसला. आनंदनगर तांडा पुराच्या पाण्याने वेढल्या गेल्याने या गावातील ८० रहिवाशांना बाहेर काढण्यासाठी सैन्य दलाचे हेलिकॉप्टर बोलाविण्यात आले होते. परंतु खराब वातावरण व इतर कारणांमुळे त्याला परत पाठविण्यात आले.

त्याऐवजी बोटीच्या मदतीने ‘एसडीआरएफ’ व ‘एनडीआरएफ’च्या जवानांनी त्यांची सुटका केली. जिल्ह्याचे एकूण खरीप क्षेत्र पावणेनऊ लाख हेक्‍टरच्या घरात आहे. त्यापैकी सुमारे २ लाख १५ हजार हेक्‍टर क्षेत्रावरील पिकांना पावसाचा फटका बसल्याचा अंदाज प्राथमिक अहवालांती नोंदविण्यात आला आहे.

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रमोद लहाळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, यवतमाळ तालुक्‍यात ३० हजार, घाटंजी ४३ हजार, दारव्हा ३८ हजार, राळेगाव ४७००, उमरखेड १५ हजार हेक्‍टर याप्रमाणे पीक नुकसानीची नोंद घेण्यात आली आहे.

जिल्ह्यात पावसाच्या परिणामी तीन व्यक्‍तींचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, खरडून गेलेल्या जमिनीचा स्वतंत्र अहवाल सादर करण्याचे निर्देश मदत व पुनर्वसनमंत्री अनिल पाटील यांनी दिले आहेत. महागाव नंतर जिल्हाधिकारी तसेच मंत्री संजय राठोड यांनी इतरही काही तालुक्यांतील पीक नुकसानीचा आढावा घेतला.

मदत व पुनर्वसनमंत्र्यांची भेट

यवतमाळ जिल्ह्यात शनिवारी (ता. २२) झालेल्या पावसामुळे सर्वदूर हाहाकार उडाला. त्याची दखल घेत मदत व पुनर्वसनमंत्री अनिल पाटील यांनी यवतमाळच्या बाधित गावांचा दौरा केला. आनंदनगर तांडा येथील ग्रामस्थांनी त्यांनी संवाद साधला. संजय राठोड, जिल्हाधिकारी अमोल येडगे यांची या वेळी उपस्थिती होती. पाच हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान व धान्याचे तत्काळ वाटप करून नुकसान अहवाल सादर करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

बुलडाण्यात ७२ हजार हेक्टरला फटका

बुलडाणा जिल्ह्यात संग्रामपूर व जळगाव जामोद या दोन तालुक्यांत झालेल्या अतिवृष्टीमुळे सुमारे ६३ हजार हेक्टरवरील शेतीपिकांचे नुकसान झाले. तर साडेबारा हजार हेक्टर शेती खरडून गेली आहे. जिल्ह्यात शुक्रवारी (ता. २१) रात्री झालेल्या जोरदार अतिवृष्टीमुळे या दोन तालुक्यांमध्ये पाऊस व पुराने हाहाकार उडवला होता. यामध्ये एकट्या संग्रामपूर तालुक्यात सुमारे ३५ हजार हेक्टरपेक्षा अधिक शेतीपिकांचे नुकसान झाले आहे.

Crop Damage
Maharashtra Rain Update : कोकण, मराठवाडा, विदर्भात पावसाचे तांडव

तर जळगाव जामोदमध्येही सुमारे २५००० हेक्टर वरील पिके बाधित झाली आहेत. जळगाव जामोद तालुक्यात साडेसहा हजार हेक्टर शेती खरडून गेली. तर संग्रामपूर तालुक्यात ५३०० हेक्टर शेती खरडून गेल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

जोरदार अतिवृष्टीमुळे या तालुक्यांत पूरपरिस्थिती निर्माण झाल्यामुळे अनेक गावांचा संपर्कही तुटला होता. सलग २४ तासांपर्यंत दळणवळणाची साधने बंद होती. पाऊस ओसरला असला तरीही अद्याप अनेक शेतांमध्ये सखल भागात पिके पाण्याखाली आलेली आहेत. त्यामुळे या पीक नुकसानीचा आकडा आणखी वाढेल.

अतिवृष्टी, पुरामुळे अकोल्यात ४४ हजार हेक्टरचे नुकसान

गेल्या दोन दिवसांत अकोला जिल्ह्यात पावसाने काही तालुक्यांत दाणादाण उडवून दिली. पाऊस कमी झाल्याने पूर ओसरला आहे. मात्र पुराचे पाणी शेतांतून वाहिल्याने हजारो हेक्टरवरील पिके बाधित झाली.

प्राथमिक अंदाजानुसार जिल्ह्यात ४४ हजार ६४३ हेक्टवरील पिकांचे तर १४२१ हेक्टर जमीन खरडून गेल्याने नुकसान झाले. या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याची मागणी केली जात आहे. तर दुसरीकडे बुलडाणा जिल्ह्यात जळगाव जामोद, संग्रामपूर या सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या तालुक्यांना अतिवृष्टीचा फटका बसला आहे.

Crop Damage
Malegaon Rain : मालेगाव शहर परिसरात मुसळधार पावसाची हजेरी

या तालुक्यांमध्येही हजारो हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. जिल्ह्यात आठवडाभरात दुसऱ्यांदा नैसर्गिक आपत्तीने पिकांचे नुकसान केले. १८ जुलैला सुमारे १५ हजार हेक्टरपर्यंत पिके बाधित झाली होती. त्यानंतर आता शनिवारी (ता. २२) पाऊस व पुराने सुमारे ४५ हजार हेक्टरवरील पिके बाधित झाली. यात सोयाबीन, कपाशी, तूर या प्रमुख पिकांचा समावेश आहे.

या आपत्तीचे सर्वाधिक नुकसान अकोला तालुक्यात २१ हजार हेक्टरवर झाले आहे. शिवाय ८६० हेक्टर जमीन खरडली आहे. तेल्हारा तालुक्यात जवळपास १६ हजार हेक्टरवरील पिके बाधित आहेत. याशिवाय बार्शी टाकळी ७८५, मूर्तिजापूर ३५१०, बाळापूर २५०४, अकोट ८९५ असे एकूण ४४६४३ हेक्टरवर नुकसान झाले. जिल्हा बचाव व शोध पथकाने तेल्हारा तालुक्यात पुरात अडकलेल्यांची सुटका केली.

पिके अद्याप पाण्यात

अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यात या पावसाने सर्वाधिक हाहाकार उडवला. पावसाचा जोर कमी झाला तरी सखल भागात हजारो हेक्टरवरील पिके अद्याप पाण्याखाली आहेत. सातपुड्यातून निघणाऱ्या नद्यांनी नागरिकांचा थरकाप उडवला. शेतशिवारांमधून पाणी वाहून गेले.

अनेक ठिकाणी रस्ते व पूल खचल्याने दळणवळणाचा प्रश्‍न बिकट झाला. शनिवारी (ता. २२) दिवसभर रस्ते बंद राहल्याने वाहतुकीला फटका बसला. खारपाण पट्ट्यात जोरदार पावसामुळे शेतांमध्ये पाणी साचलेले आहे. या पावसाने खरिपाचे कोट्यवधींचे नुकसान केले.

पाण्यात वाहून गेल्याने तरुणाचा मृत्यू

अतिवृष्टी व पुरांमुळे जळगाव जामोद, संग्रामपूर तालुक्यांत हाहाकार उडाला. पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने मदन धुळे (रा. एकलारा बानोदा, ता. संग्रामपूर) या तरुणाचा मृत्यू झाला. सांयकाळच्या सुमारास त्यांचा मृतदेह आढळून आला. याच तालुक्यात काथरगावमध्ये पुराच्या पाण्याने वेढलेल्या नागरिकांची प्रशासनाने सुटका करीत निवाऱ्याची व्यवस्थाही केली होती.

धानपट्ट्यात अत्यल्प नुकसान

पूर्व विदर्भातील बहुतांश जिल्हे हे धान उत्पादक जिल्हे म्हणून ओळखले जातात. गोंदिया, गडचिरोली, भंडारा, चंद्रपूर तसेच नागपूरचा काही भाग त्यामध्ये समावेशित आहे. यंदा पाऊस लांबल्याने भात रोवणीची कामे खोळंबली होती. परिणामी, धानपट्ट्यात फारसे नुकसान झाले नाही, अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली. चंद्रपूर जिल्ह्यात ६८१ हेक्टर इतके नुकसान नोंदविण्यात आले,

अशी माहिती चंद्रपूरचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार यांनी दिली. नागपूर जिल्ह्यात नुकसान नसल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र मनोहर यांनी सांगितले. गोंदिया जिल्ह्यात सुरुवातीला पाऊस खोळंबल्याने रोवण्या झाल्या नाही. त्यामुळे इथेही नुकसान नाही, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी हिंदूराव चव्हाण यांनी सांगितले.

अमरावती विभागातील पाच जिल्ह्यांत सरासरी चार लाख हेक्टरचे नुकसान झाले असावे, असा प्राथमिक अंदाज आहे. त्यापैकी सर्वाधिक दोन लाख पंधरा हजार हेक्टर नुकसान एकट्या यवतमाळ जिल्ह्यात नोंदविण्यात आले आहे. बुलडाणा जिल्ह्यातील संग्रामपूर व काही भागांत तसेच वाशीम जिल्ह्यातील कारंजा लाड आणि अकोला, अमरावती जिल्ह्यांत एक लाख ९० हजार ते २ लाख हेक्टर याप्रमाणे पाच जिल्ह्यांत एकूण चार लाख हेक्टर नुकसान झाल्याचा अंदाज आहे.
- किसन मुळे, विभागीय कृषी सहसंचालक, अमरावती

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com