Nashik News : पूर्व भागात गेल्या दोन आठवड्यांपासून पावसाने दडी मारली होती. जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यात पावसाची संततधार कायम आहे. इगतपुरी, पेठ, त्र्यंबकेश्वर, सुरगाणा तालुक्यांत पावसाचा जोर दिसून आला.
तर मालेगाव शहर व परिसरात तीन आठवड्यांपासून दडी मारलेल्या पावसाने शुक्रवारी (ता. २१) शहरात जोरदार हजेरी लावली. तालुक्यातही वडनेर विभाग वगळता अन्य सर्वत्र हलकासा पाऊस झाला. मात्र शहरात अनेक भाग जलमय झाले होते.
मालेगाव शहरात या हंगामात प्रथमच मुसळधार पाऊस झाला. दुपारी साडेचारला सुरू झालेला पाऊस दीड तास जोरदार कोसळत होता. शनिवारी (ता.२२) रोजी सकाळी ८ वाजेपर्यंत गेल्या २४ तासांत ६४ मिमी पावसाची नोंद झाली.
पावसामुळे शहरातील सर्व गटारी सांडपाण्याने तुडुंब भरून वाहत होत्या. रस्त्यासह उंच सखल भागात पाणी साचले होते. जोरदार पावसामुळे पोलिस कवायत मैदानाला तलावाचे स्वरूप आले.
पुष्प नक्षत्राच्या दुसऱ्या दिवशी वरुणराजाने लावलेल्या हजेरीने पेरणी झालेल्या खरीप पिकांना दिलासा मिळाला आहे. पावसाने ओढ दिल्याने कळवाडी वगळता अन्य भागातील पिके कोमजू लागली होती. या पावसामुळे शिल्लक असलेल्या उर्वरित पेरण्या काही प्रमाणात मार्गी लागतील. पावसामुळे शुक्रवारचा बाजार कोलमडला.
बाजारपेठेतील उघड्यावरील विक्रेते, फळविक्रेते, भाजीपाला विक्रेत्यांची मोठी धांदल उडाली. विक्रेते व नागरिकांनी जागा मिळेल तेथे वाहने लावून आश्रय घेतला. पूर्व-पश्चिम भाग जलमय झाला होता.
टिळकनगर भागातील अपर जिल्हाधिकारी कार्यालयामागील ग्रामीण रुग्णालयाकडे जाणारा रस्ता पाण्याखाली गेला होता. हुतात्मा स्मारक व शिवाजी जिमखान्या समोरील मैदानालाही तलावाचे स्वरूप आले होते.
पेठ महसूल मंडलात अतिवृष्टी
पेठ तालुक्यातील पेठ महसूल मंडलात अतिवृष्टी झाली. येथे ६५.३ मिमी नोंद झाली. सुरगाणा व त्र्यंबकेश्वर तालुक्यातील सर्वच महसूल मंडलांमध्ये मध्यम पाऊस झाला. इगतपुरी तालुक्यातील घोटी व दिंडोरी तालुक्यांतील ननाशी महसूल मंडलात पावसाचा जोर होता.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.