
Parbhani News : परभणी व हिंगोली जिल्ह्यांतील खरीप ज्वारी तसेच बाजरी, मका या अन्नधान्य व चारा पिकांच्या क्षेत्रात गेल्या काही वर्षांत मोठी घट झाली आहे. यंदा (२०२३) या दोन जिल्ह्यांतील खरीप ज्वारीच्या पेरणी क्षेत्रात यंदा १ हजार ४७१ हेक्टरने घट झाली आहे.
पावसाच्या खंडामुळे या पिकांची वाढ खुंटली आहे. धान्य व चारा उत्पादनात मोठी घट होण्याची चिन्हे दिसत आहेत. येत्या काळात चाऱ्याची उपलब्धता कमी राहू शकते. परिणामी, चाराटंचाई उद्भवण्याची शक्यता आहे.
या दोन जिल्ह्यांतील शेतकऱ्यांचा कल खरिपातील सोयाबीन, कपाशी, तूर या पिकांकडे वाढला आहे. ज्वारी, बाजरी, मका या पिकांना मिळणारे कमी बाजारभाव, सुगीसाठी मजुरांची समस्या यासह जनावरांची कमी झालेली संख्या आदी या मागणीची कारणे आहेत. गतवर्षी (२०२२) खरिपात परभणी जिल्ह्यात ज्वारी २ हजार ६५४ हेक्टर, बाजरी २२३ हेक्टर, मका ९९० हेक्टरवर पेरणी झाली होती.
यंदा ज्वारीची २ हजार २२८ हेक्टर, बाजरीची ५२८ हेक्टर, मक्याची ८४२ हेक्टर पेरणी झाली आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा ज्वारीचा पेरा ४२६ हेक्टरने तर मक्याच्या पेऱ्यात १६६ हेक्टरने घट झाली, पण बाजरीचे क्षेत्र ३०५ हेक्टरने वाढले आहे. हिंगोली जिल्ह्यात गतवर्षी (२०२२) खरिपात ज्वारीची ४ हजार १६७ हेक्टर, बाजरीची २५२ हेक्टर, मका ५२९ हेक्टरवर पेरणी झाली होती.
यंदा (२०२३) ज्वारी ३ हजार १२२ हेक्टर, बाजरी ११२ हेक्टर, मका ५९३ हेक्टरवर पेरणी झाली आहे. यंदा ज्वारीच्या पेऱ्यात १ हजार ४५ हेक्टरने, बाजरीच्या पेऱ्यात १४० हेक्टरने, तर मक्याच्या पेऱ्यात ९४ हेक्टरने वाढ झाली आहे.
या दोन जिल्ह्यांत यंदा पावसाचे आगमन उशिरा झाल्यामुळे तृणधान्ये पिकांचे क्षेत्र कमी झाले. जुलै - ऑगस्ट महिन्यांत पावसाचा दीर्घ खंड पडला आहे. त्यामुळे वाढीच्या अवस्थेतील पिकांना ताण बसला. डोंगराळ भागातील तसेच हलक्या जमिनीवरील पिके सुकून गेली आहेत.
परभणी हिंगोली जिल्हा यंदा (२०२३) अन्नधान्ये पेरणी स्थिती (हेक्टरमध्ये)
तालुका ज्वारी बाजरी मका
परभणी ६३ ०० २०७
जिंतूर ३८ ९.५ ००
सेलू ४० ८६ ४६
मानवत १३४ ८२ १४९
पाथरी ९ ५७ ७५
सोनपेठ ९९ ६६ १०८
गंगाखेड ७९८ ८८ ६२
पालम ८८० ९८ १४८
पूर्णा १६१ ४१.५ ४६
हिंगोली ३०५ ०० १५२
कळमनुरी ५२० ०० १२१
वसमत ७७३ १०३ १४६
औंढा नागनाथ १३०० ०० ४०
सेनगाव २०६ ९ १३४
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.