डॉ. अजयकुमार उपाध्याय, डॉ. आर. जी. सोमकुंवर
Grape Crop : द्राक्ष विभागातील गेल्या आठवड्यातील वातावरणाचा विचार केल्यास बऱ्याच ठिकाणी कमीअधिक प्रमाणात पाऊस झाला व काही ठिकाणी नुसते ढगाळ वातावरण राहिले. ही परिस्थिती आणि त्या आधी झालेल्या पावसामुळे आर्द्रता टिकून राहिली. या वेळी तापमानामध्ये थोडीफार (३६ ते ३७ अंशांपर्यंत) वाढ झाली. यामुळे वेलीच्या वाढीकरिता पोषक वातावरण तयार झाले. पुढील आठवड्याचा विचार करता सध्या उपलब्ध वेगवेगळ्या वाढीच्या अवस्थेत पुढील प्रमाणे उपाययोजना करता येतील.
जुनी बाग
या बागेत काडी परिपक्वतेचा कालावधी सुरू झाला असावा. या वेळी वेलीची वाढ नियंत्रणात असणे गरजेचे असते. असे असल्यास काडी तळापासून वरपर्यंत शक्य तितक्या लवकर परिपक्व होईल. परिपक्व काडी तपासून पाहायची झाल्यास तपकिरी ते दुधाळ या रंगाच्या मध्यभागी काडीवर काप घ्यावा. या काडीमधील पिथ जर पांढरा ते तपकिरी रंगाकडे वळत असल्यास काडी परिपक्व होऊ लागली आहे, असे समजावे. सध्याच्या वातावरणाचा विचार करता वेलीच्या वाढीस पोषक वातावरण आहे. यामुळे फुटीचा शेंडा जोमात वाढेल, त्यामुळे काडीची परिपक्वता लांबणीवर जाण्याची शक्यता जास्त असेल. या वेळी प्रत्येक बागेत जमीन वाफसा स्थितीत नक्कीच असेल. अशा जमिनीत मुळांची वाढ व्यवस्थित होऊन जास्तीत जास्त पांढरी मुळे तयार झालेली असतील.
या परिस्थितीचा फायदा घेऊन काडी परिपक्वतेकरिता पालाशची उपलब्धता फवारणीतून करण्याऐवजी जमिनीतून द्यावे. वाफसा परिस्थिती नसलेल्या बागेत फवारणीच्या माध्यमातून पालाशची उपलब्धता करावी. मागील आठवड्यातील जोमदार पावसामुळे काही बागेत वेलीवर अन्नद्रव्याची कमतरता दिसून येईल. यामध्ये पाने पिवळी पडणे, पाने आकसणे, पानाच्या कडा जळल्यासारखे दिसणे व पानाच्या वाट्या होणे अशी काही लक्षणे दिसून येतील. ही समस्या मुख्यतः चुनखडी जास्त (२० टक्क्यांच्या पुढे) असलेल्या जमिनीत आढळून येते. या वेळी वेलीला काही महत्त्वाच्या अन्नद्रव्याचा पुरवठा (फेरस, मॅग्नेशिअम, पालाश व स्फुरद) होत नसल्यामुळे अशी परिस्थिती ओढवली असेल. बागेत यावेळी फवारणीच्या माध्यमातून ही अन्नद्रव्ये देता येतील. कोणत्याही स्थितीत शिफारशीपेक्षा
जास्त प्रमाण वापरू नये, अन्यथा काडी परिपक्वतेच्या अवस्थेतही पानावर स्कॉर्चिंग येण्याची समस्या
उद्भवू शकते. त्याच प्रमाणे ही फवारणी उन्हात करणे टाळावे. पाने जळल्यासारखी दिसत असल्यास त्यातील हरितद्रव्याचा ऱ्हास होऊन प्रकाश
संश्लेषण होत नाही. म्हणजेच अशा बागेत आवश्यक असलेल्या अन्नद्रव्याची पूर्तता करणे
अशक्य होईल. अशा चुनखडीच्या बागेत बोदामधील ओलाव्याचा फायदा घेऊन सल्फर (७० ते ८० किलो प्रति एकर) जमिनीत व्यवस्थित मिसळून घ्यावे.
या वेळी काडी सबकेनच्या दोन डोळे खालीपर्यंत परिपक्व झालेली असावी. असे असल्यास ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत सबकेनच्या पुढेपर्यंत काडी पूर्ण परिपक्व होईल. परंतु ज्या बागेत ही काडी परिपक्व न होता तळातून खालील फक्त दोन ते तीन डोळे तपकिरी (परिपक्व) होऊन पुढील भाग फक्त दुधाळ झालेला आहे, अशा स्थितीमध्ये येत्या आठवड्यात पाऊस झाल्यास पुन्हा परिपक्वता लांबणीवर जाण्याचा धोका असेल. अशा कच्च्या काडीमध्ये अन्नद्रव्यांचा साठा मुळीच नसल्यामुळे पुढील काळात फळछाटणीनंतर गोळी घड तयार होऊ शकतात. अशा बागेत स्फुरद आणि पालाशयुक्त खतांचा वापर जास्त महत्त्वाचा राहील. शेंडा वाढ नियंत्रणात ठेवण्यासाठी पाण्यावर नियंत्रण व पालाशचा वापर उपयुक्त ठरेल.
बऱ्याचदा बागायतदार वाढ थांबविण्यासाठी क्लोरमेक्वाट क्लोराइड, प्रोपीकोनॅझोल आणि पॅक्लोब्युट्राझोल आदींचा वापर जास्त प्रमाणात करत असल्याचे निदर्शनास आले आहे. या रसायनांचा वापर किमान मात्रेमध्ये केल्यास वाढ नियंत्रणासाठी राहण्यास मदत होऊ शकते, हे खरे असले, तरी क्लोरमेक्वाट क्लोराईड व पॅक्लोब्युट्राझोलचा वापर करण्याची द्राक्ष पिकामध्ये शिफारस नाही. अशा कोणत्याही रसायनाचा वापर करण्याऐवजी शेंडा पिंचिंग करणे, पाण्यावर नियंत्रण ठेवणे आणि पालाशयुक्त खतांचा वापर करणे फायदेशीर ठरेल.
लवकर छाटणी झालेल्या बागेतील व्यवस्थापन
या बागेत सध्या घड बाहेर पडून, तो प्री ब्लूम अवस्थेकडे वळला असेल. सध्याच्या वातावरणाचा विचार करता काही बागेत ही परिस्थिती संवेदनशील असेल. घड बाहेर पडण्याच्या अवस्थेत जर पाऊस झाला किंवा ढगाळ वातावरण अधिक काळ टिकून राहिल्यास वेलीमधील जिबरेलिन्सचे प्रमाण वाढते. त्यामुळे निघत असलेला चांगला घड एकतर बाळीमध्ये किंवा गोळीघडामध्ये रूपांतरित होतो. यावर उपाययोजना म्हणून सायटोकायनीनयुक्त संजीवकांचा वापर महत्त्वाचा राहील. ६ बीए हे १० पीपीएम व ०-०-५० हे खत अर्धा ते एक ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे फवारणी केल्यास परिस्थिती नियंत्रणात येऊ शकते.
खरेतर या वेळी वेल सशक्त असणे गरजेचे असेल. फळछाटणीनंतर एका काडीवर चार ते पाच डोळ्यांवर हायड्रोजन सायनामाइडचे पेस्टिंग केले होते. म्हणजेच आता घड निघाल्यानंतर चार ते पाच पानांची अवस्था असल्यास या वेळी सुद्धा कॅनॉपीची गर्दी वाढलेली असेल. साधारणतः हा १४ ते १७ दिवसांचा कालावधी असतो. या वेळी दमट वातावरणामुळे एकतर घड जिरण्याची समस्या असेल, किंवा पाऊस पडल्यास कुजण्याची व तसेच डाउनी मिल्ड्यू आणि करपा या रोगाच्या प्रादुर्भावाची समस्या असेल. यावर प्रभावी उपाययोजना म्हणून १४ ते १७ दिवसांच्या काळामध्ये फेलफुटी काढून घ्याव्यात. असे केल्यास तयार झालेल्या कॅनॉपीमध्ये हवा खेळती राहून रोगासाठी आवश्यक सूक्ष्म वातावरण तयार होणार नाही. प्री ब्लूम अवस्थेत घडाचा विकास होण्याच्या दृष्टीने संजीवकांचा वापर या वेळी महत्त्वाचा असेल.
पोपटी रंगाच्या अवस्थेत द्राक्षघड असल्यास (साधारणतः १८ ते २० दिवस), १० पीपीएम जीए३ ची फवारणी करून घ्यावी. जीए३ ची दुसरी फवारणी पाच दिवसांनंतर १५ पीपीएमने करावी. संजीवकांची कार्यक्षमता वाढण्यासाठी द्रावणाचा सामू ५.५ ते ६.० असावा. यासाठी युरिया फॉस्फेट किंवा सायट्रिक अॅसिडचा वापर करता येईल. संजीवकांचे चांगले परिणाम मिळण्याकरिता फवारणी ही शक्यतो सायंकाळी ३ ते ५ या काळात करावी. कारण या वेळी पुरेशी ७० टक्क्यांपर्यंत आर्द्रता असल्यामुळे वेलीचे पानेही द्रावण शोषण्यास सक्षम असतात. बागायतदार पावसाचा विचार करता संजीवकांमध्ये बुरशीनाशके मिसळतात. अनेक वेळा त्यांची एकमेकांमध्ये मिसळण्याची क्षमता (कॉम्पॅटिबिलिटी) नसल्यामुळे परिणाम चांगले मिळत नाहीत. तेव्हा शक्यतो संजीवकांसोबत अन्य काही मिसळणे टाळावे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.