कोल्हापूर : आंतरराष्ट्रीय बाजारात (International Market) गेल्या पंधरा दिवसांपासून भारतीय पांढऱ्या साखरेची (White Sugar) मागणी वाढली आहे. या तुलनेत कच्च्या साखरेस मागणी नसल्याचे चित्र आहे. दरही स्थिर नसल्याची स्थिती आहे. गेल्या पंधरवड्यापासून जागतिक बाजारातील व्यापारी पांढऱ्या साखरेला शुद्ध पांढऱ्या साखरे ऐवजी पर्याय म्हणून पसंती देत आहेत.
त्यामुळे महाराष्ट्रातील साखर कारखाने ३३००० ते ३४५०० रुपये प्रतिटन एक्स मिल या दरात साखर निर्यातीचे करार करत आहेत. ३० सप्टेंबरला लंडन डिसेंबर वायदे बाजारात शुद्ध पांढऱ्या साखरेचे दर ५२८.७० डॉलर प्रतिटन इतके होते. तसेच न्यू यॉर्क रॉ शुगर वायदे बाजारात कच्च्या साखरेचे दर १७. ६८ पौंड प्रति सेंट होते.
म्हणजेच भारतीय रुपयांमध्ये लंडन वायदे बाजारात शुद्ध पांढऱ्या साखरेचे जहाजावर पोहोच दर ४३२०० रुपये प्रतिटन असे आहेत. न्यू यॉर्क रॉ शुगर मार्च वायदे बाजारात कच्च्या साखरेचे जहाजावर पोहोच दर ३३३०० रुपये प्रतिटन आहेत. न्यू यॉर्क वायदे बाजारचा विचार करता कच्च्या साखरेचे वास्तविक दर ३१००० रुपये प्रतिटन एक्स मिल इतके आहेत.
निर्यातदार सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नोव्हेंबर २२ ते मार्च मे २३ या कालावधीत जागतिक बाजारात कच्च्या साखरेची मोठ्या प्रमाणात मागणी राहणार आहे. केंद्राकडून साखर निर्यात धोरण जाहीर झाल्यानंतर कच्च्या
साखरेची मागणी वाढून भविष्यात कच्च्या साखरेला चांगला दर अपेक्षित आहे. परंतु, निर्यात धोरणातील अस्पष्टतेमुळे तसेच विलंबामुळे आर्थिक उपलब्धतेसाठी (कॅश फ्लोसाठी) साखर कारखानदार कारखाने सुरू झाल्यानंतर देशांतर्गत बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात त्यांच्या मासिक कोट्यापेक्षा जादा साखर विकण्याची शक्यता आहे.
...तर दरात घसरण होण्याची शक्यता
देशांतर्गत बाजारपेठेत साखरेचे भाव कमी होण्याची शक्यता आहे. जर केंद्र सरकारने कारखानानिहाय कोटा पद्धत निर्यात प्रणाली व कोटा ट्रान्स्फर असे निर्यात धोरण जाहीर केले, तर देशांतर्गत बाजारपेठेत साखरेच्या दरात घसरण होईल. कोटा ट्रान्स्फरमध्ये कोटा असलेल्या कारखान्याला त्याच्या कोट्याचा मोबदला (प्रीमियम) द्यावा लागेल. त्यामुळे कारखानदारांना प्रीमियमचा विचार करून थर्ड पार्टी निर्यातीसाठी कमी दरात साखर द्यावी लागेल. थर्ड पार्टी निर्यातीसाठी निर्यातदार कच्ची साखर ३० हजार रुपये व पांढरी साखर ३१००० प्रतिटन एक्स मिल या दराने मागणी करत आहेत.
भविष्यात शुद्ध साखरेचे दर कमी आहेत, याचा विचार करून सध्या जो पांढऱ्या साखरेला दर मिळत आहे, त्या प्रमाणे म्हणजे ३४००० ते ३४५०० रुपये प्रति टन एक्स मिल या दराने कारखानदारांनी निर्यात करार करणे उचित राहील.
- अभिजित घोरपडे, साखर निर्यातदार
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.