Nandurbar News : तळोदा तालुक्यातील वनजमिनीवरील अनेक वर्षांपासून रेंगाळत असलेल्या अतिक्रमणाचा प्रश्न सुटण्याची आशा निर्माण झाली आहे. नुकत्याच झालेल्या मंत्रिगटाच्या बैठकीत या विषयावर ऊहापोह करण्यात आला आहे. त्यामुळे हा प्रश्न लवकरच मार्गी लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
याबाबत माहिती देताना सामाजिक कार्यकर्ते डॉ. कांतिलाल टाटिया यांनी सांगितले, की वनजमिनीवरील अतिक्रमणासंदर्भात निर्णय करणाऱ्या मंत्रिगटाची बैठक महसूल, पशुसंवर्धन व दुग्धविकासमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा अध्यक्षतेखाली नुकतीच घेण्यात आली. बैठकीत वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, आदिवासी विकासमंत्री डॉ. विजयकुमार गावित, बंदरे व खनिकर्ममंत्री दादा भुसे आदी उपस्थित होते. बैठकीत वनजमिनीबाबत सकारात्मक चर्चा करण्यात आली.
१९७२-७८ दरम्यानची वनजमिनीवरील अतिक्रमणे नियमानुकूल करण्याचा कायदा पुलोद शासनाने केला होता. मात्र ११ फेब्रुवारी १९८० ला सरकार बरखास्त झाल्याने, कायद्याची अंमलबजावणी थांबली. वनाधिकारी मान्यता कायदा २००६ अन्वये या गावातील अतिक्रमणधारकांनी वनपट्टा मिळावा म्हणून उपजिल्हाधिकारी तळोदा यांच्याकडे दावेही दाखल केले होते.
दरम्यान, तळोदा तालुक्यातील वनजमिनीपैकी कूप नं. ४४६, ४४७, ४४८, ४४९, ४५०, ४५१, ४५२, ४५३, ४५४, ४५५, ४५६, ४५७ व ४३७ चे एकूण क्षेत्र दोन हजार ७०० हेक्टर हे सरदार सरोवरमध्ये विस्थापितांच्या पुनर्वसनासाठी दिले गेले.
ही वनजमीन महसूल जमीन केली गेली. मात्र वरील क्षेत्रात वर निर्दिष्ट गावाच्या अतिक्रमणधारकांनी, सरकारी दडपशाहीला न जुमानता, आपले खेडत असलेल्या जमिनीवरील ताबा सोडला नाही.
उपविभाग स्तरीय समितीकडे या क्षेत्रातील वनदावे फेटाळत, संबंधित दावे महसूल क्षेत्रात येत असल्याने आमच्या अखत्यारीत येत नाहीत, असे स्पष्ट केले. त्यामुळे या क्षेत्रावर ६५९ दावेदार (५५० हेक्टर) वनपट्टे न्यायापासून वंचित होते. यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून मोर्चे, जेलभरो आंदोलन, निवेदने देण्यात आली होती.
दरम्यान, नुकत्याच झालेल्या मंत्रिगटाच्या बैठकीत तळोदा तालुक्यातील अतिक्रमणासंदर्भातील प्रश्नाची सखोल चर्चा होऊन, या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांकडून योग्य अहवाल मागवून, मंत्रिगटातर्फे तो मंत्रिमंडळापुढे ठेवण्यात येणार आहे.
मंत्रिगटातील सर्व मंत्र्यांचे व पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांचे सर्व अतिक्रमणधारकांकडून आभार व्यक्त करण्यात येत असल्याची माहिती डॉ. कांतिलाल टाटिया यांनी दिली.
अतिक्रमणामध्ये या गावांचा समावेश
तळोदा तालुक्यातील कालीबेल, आमोणी, जांभाईपाडा, रानमहू, रोझवाप्लॉट, बुधावल, भवर, वाल्हेरी, डेकाटी या गावांतील अतिक्रमणधारकारांचासुद्धा त्यात समावेश होता.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.