
Kadus: खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील डोंगररांगा आगीत जळाल्याने हजारो हेक्टर जंगल क्षेत्र खाक झाले आहे. त्यामुळे वनसंपदेची मोठी हानी झाली आहे.
खेडच्या पश्चिम पट्ट्यातील डोंगरातील जंगलांना उन्हाळ्यात आगी लागण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. यात खासगी क्षेत्रातील डोंगरांना आगी लावण्याचे प्रमाण लक्षणीय आहे.
चासकमान धरण जलशयालगतच्या दोन्ही बाजूंच्या डोंगररांगा, वेताळे, सायगाव, साबुर्डी, साकुर्डी, कहू-कोयाळी, कडूस, कोहिंडे, वाजवणे गावांच्या लगतचे डोंगर वणव्यात जळून गेले आहेत.
डोंगरांना वणवे लावल्यास पावसाळ्यात चांगले नवीन गवत उगवते, हा स्थानिक नागरिकांमध्ये समज असल्याने अनेकवेळा असे वणवे लावले जातात. वन विभागाच्या, तसेच मालकीच्या डोंगरांना वणवे लावण्याचे प्रकार वाढले आहेत.
विशेषतः रात्रीच्या वेळी वणवे लावले जातात. बहुतांश ठिकाणी जाणूनबुजून आगी लावल्या जातात. हाच वणवा वनविभागाच्या हद्दीत जाऊन तालुक्यातील वनक्षेत्र खाक झाले आहे. यात वनसंपदेची मोठी हानी झाली आहे, असे यादवराव शिंदे यांनी सांगितले.
जनजागृती करण्यात वनविभाग अपयशी
जंगले पेटवून देण्याचे प्रमाण वाढले आहे.त्याला अटकाव करण्यासाठी वनविभागाने प्रभावी उपाययोजना करायला हव्यात. आग नियंत्रणात आणण्यासाठी जाळपट्टे वेळेत आणि आवश्यक त्या ठिकाणी काढायला हवेत.
आग न लावण्याबाबत लोकांमध्ये जनजागृती व्हायला हवी. वनकर्मचाऱ्यांचा लोकांशी संपर्क कमी झाला आहे. ग्रामसभेला त्यांची उपस्थिती नसते.
वनकर्मचाऱ्याचे दर्शन दुर्मिळ झाल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. तर स्थानिकांचे सहकार्य व मदत मिळविण्यात वनकर्मचाऱ्यांना अपयश येत आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.