Forest Fire : गवत वणवे अन् भूजलचा काय संबंध?

Forest Fire News : आपण भूजलासंदर्भात माहिती घेत असतानाच वाढलेल्या तापमानाच्या पार्श्‍वभूमीवर बाष्पीभवन कमी करण्याची प्रथम माहिती घेतली. उन्हाळ्यामध्ये डोंगरांवरील गवतांना आगी व वणवे लागण्याचे प्रमाण वाढते. त्याचा आणि भूजलाचा या लेखामध्ये संबंध पाहू.
Forest Fire
Forest FireAgrowon
Published on
Updated on

सतीश खाडे

Mountain Fire Information : डोंगराला लागणारे वणवे आणि भूजलाचा काय संबंध, असा प्रश्‍न अनेकांना पडू शकतो. मात्र डोंगरावरील गवताला लागणारे वणवे ताबडतोब विझविण्यावर भर दिल्यानंतर भिवघर (जि. रायगड) या गावात उन्हाळ्यातही डोंगरातून झरे वाहू लागल्याची वस्तुस्थिती सारे स्पष्ट करणारी आहे.

२००५ पूर्वी भिवघर हेही अन्य गावांप्रमाणे होते. तेथील डोंगर कधीच बोडका झाला होता. तुरळक आंब्याची आणि तोडणे अगदीच अशक्य असलेली काही झाडे सोडली, तर डोंगर गवतानेच झाकलेला असायचा.

पावसाळ्यात मोहक हिरवा दिसणारा हा डोंगर उन्हाळ्यात गावकऱ्यांना कायम वणव्याच्या धाकामध्ये ठेवायचा. पावसाळ्यात भराभरा वाढणारे गवत उन्हाळ्यात लागलेल्या वणव्यामध्ये मोठा जाळ करत सगळ्या गावाला घाबरून टाकायचे.

त्यात पूर्ण डोंगरासोबत आजूबाजूचीही झाडे होरपळून निघायची. स्वतःचे आणि पाळीव जनावरांचे प्राण वाचविण्यात सर्व जण अर्धमेले व्हायचे. २००४ मध्ये भर दुपारी पेटलेला वणवा काही समजायच्या आतच आदिवासी वाडीत पोहोचला. संपूर्ण वाडी जनावरांसह जळाली.

माणसे कशीबशी वाचली. त्यामुळे गाव हादरले. स्वयंसेवी संस्था, शासन मदत आले खरे, पण या प्रश्‍नाचा आपणच भिडले पाहिजे याची गावातल्या चार-पाच तरुणांनी खूणगाठ बांधली. कायमस्वरूपी उपाय शोधण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू झाले.

Forest Fire
Forest Fire Protection: वणवे रोखण्यासाठी गावोगाव वणवा प्रतिबंधक पथकांची गरज

वणवा येऊ नये यासाठी ‘जाळ रेषा’ मारणे हा सर्वांत खात्रीचा उपाय. डोंगरातील रस्ता, पायवाट ही सीमारेषा धरून त्याच्या बाजूचे दहा-पंधरा फूट रुंदीचे गवत काढून घ्यायचे. खाली राहिलेली बुडखेही पूर्णपणे नियंत्रित पद्धतीने जाळून टाकायची.

या भागात कुठूनही वणवा पेटत आला तरी खाली गवत नसल्याने तिथेच विरून जातो. या पट्ट्यापलीकडे गवताला आग लागत नाही.

केशव पवार, श्याम, पांडू वाघमारे, किशोर पवार यांनी पावसाळा संपल्यावर नोव्हेंबरमध्ये गवत वाळू लागले की ते काढून घेऊन ठिकठिकाणी जाळ रेषा मारून घेतल्या. नोव्हेंबरमध्ये हे काम केल्यानंतर पुढील सहा सात महिने आगीची भीती संपून जाते. पहिल्या वर्षी अनुभव नसल्यामुळे काही अडचणी आल्या.

संकटातून सुटका करण्याच्या नादात संकटच येऊन आदळण्याची स्थिती निर्माण झाली. मात्र दुसऱ्या दिवशीपासून सकाळऐवजी संध्याकाळी जाळ रेषा मारायला सुरू केले. त्याच वेळी हवेची दिशा आणि वेग पाहून विशिष्ट पट्ट्यातील गवत जाळून घेतले. जाळ इतरत्र पांगू नये, यासाठी गोणपाटाच्या फटक्यांनी विझवले.

आठ माणसांनी सुमारे आठ दिवस खपून केलेल्या कामाला यश आल्याचे दोन दिवसांत कळाले. कारण दोन दिवसांतच आलेला वणवा जाळ रेषेमुळे थोपवला गेला होता. सर्वांना हायसे वाटले. पण पुढच्याच आठवड्यात गावातल्याच कुणीतरी गैरसमजातून जाळ पट्ट्याच्या आतील गवत पेटवले अन् वणवा लागलाच.

सर्वांनी धावपळ करून दोन तासात तो विझवला. तेव्हा मात्र सर्व गावानेच मनावर घेतले. जाळ रेषा आखणे, आग न लावणे यांसारखी स्वयंशिस्त पाळण्याचा संकल्प केला. तेव्हापासून आतापर्यंत आता दरवर्षी नोव्हेंबरमध्येच जाळ रेषा मारली जाते.

गवताची मुळे पाणी, माती, मुरूम यात खोल जातात. हळूवार पडणारा भीज पाऊस जमिनीत मुरतोच, पण धो धो पडणारा पाऊसही गवतावरून जमिनीवर हळूवार पोहोचतो. मुळांमुळे जमिनीत अधिकाधिक मुरतो. या मुळांमुळे मुरूम व मातीत भेगा निर्माण होऊन जातात आणि या भेगांमधून पाणी आत जिरण्यास अधिक मदत होते.

गवतांची मुळे वाळून कुजतात, तिथे बारीक पोकळ्या तयार होतात. या पोकळ्या पावसाचे पाणी जिरवण्यात मोठी भूमिका बजावतात. गवतामुळे माती घट्ट धरून ठेवल्याने धो धो पावसातही मातीची धूप होत नाही. पाऊस मुरत असल्यामुळे गाळ साचणे, पूर परिस्थितीला अटकाव होतो. गवताचा उपयोग पशुपालनासाठी होऊन नियमित

उत्पन्नांचे साधन तयार होते. गवतामुळे पक्षी, कीटक आणि वन्य प्राण्याच्या जैवविविधतेलाही आधार मिळतो. शेवटी जैवविविधतेचा फायदा निसर्गातील इतर घटकांबरोबरच माणसालाही मिळतोच ना!

जाळ रेषा दरवर्षी नियमित आखल्यामुळे वणवे लागणे पूर्ण बंद होऊन आता झाडे होरपळत नाहीत. उलट चांगलीच डवरून आणखीही झाडे वाढू लागली. पाच वर्षातच झाडी वाढल्यामुळे भेकरे, रानकोंबडे, ससे, खवले मांजर असे प्राणी एकेक करून दिसायला लागले.

लोकांचाही उत्साह वाढला. आता गवताबरोबरच झाडांचीही काळजी घेऊ लागले. (झाडे आणि भूजलाचा संबंध मागील एका लेखात पाहिलाच आहे.) या झाडांवरील फळांची जोपासना झाल्यामुळे खासगी बागांमध्ये फळांच्या चोऱ्याही थांबल्या. डोंगरावर एकापेक्षा एक गोड फळे मिळाल्यास कोण जातेय खासगी बागांकडे? एका वर्षी पाऊस खूपच जास्त पडला.

डोंगराला भेगा पडल्या. मोठमोठ्या दरडी खाली घसरल्या, तरी त्या मोठ्या झाडांना अडल्याने जीवितहानी आणि घरे दोन्ही वाचली. सर्व गावकऱ्यांना आपल्या गवत आणि झाडे राखण्याच्या कामाचे महत्त्व लख्ख स्पष्ट झाले. आपले काम सूत्रबद्ध करण्यासाठी किशोर पवार आणि मित्रमंडळींनी ‘वन प्रेमी सामाजिक संस्था’ हा नोंदणीकृत सेवाभावी संस्था सुरू केली आहे.

Forest Fire
Forest Fire In Thane : शिकारीसाठी ठाण्यात डोंगरांना आग

या सर्वांचा परिणाम काय झाला असेल? गेल्या दहा वर्षांत गावच्या भूजलाची पातळी जमिनीपासून चक्क पंधरा फुटांपर्यंत वाढत आली आहे. हेच भूजल आता एप्रिलमध्येही डोंगराच्या कपारी, दगडातून पाझरून बाहेर वाहते आहे.

भिवघरच्या अगदी जवळच असलेल्या कातिवडे गावात आजही वणव्यावर नियंत्रण ठेवले जात नाही, तिथे मात्र तीनशे फुटांवरही पाणी लागले नाही. कोकणातील प्रत्येक गावाने भिवघरचा आदर्श घेतला पाहिजे.

त्यातून केवळ जमिनीतील पाणी वाढते असे नाही, तर त्याच गवतावर पशुपालन केल्यास उत्पन्नाचे नवेच झरे बाराही महिने फुटतील. आजवर आगीमध्ये होरपळून जाणारी जंगले व जंगली प्राणीही वाचतील.

असे गटागटाने वाढावे काम

नगर येथील अमित गायकवाड या निसर्गप्रेमीने समविचारी मित्रांचा गट बनवला आहे. तो आसपासच्या गावांमध्ये लागणारे वणवे विझविण्यासाठी धावपळ करतो. केवळ एका व्हॉट्सॲप ग्रुपही बनवला असून, त्याद्वारे बाजूच्या ३०-४० किलोमीटर अंतरावरील गावातील वणवे त्यांनी विझवले आहेत. त्यांच्या डोळ्यासमोर अनेक कामे, उपक्रम आहेत.

उदा. लोकांचे वणव्याबाबत प्रबोधन करणे. दरवर्षी वणवे लागणाऱ्या जागांच्या नोंदी घेणे. तिथे वेळीच प्रतिबंधात्मक उपाय करणे. मुख्य म्हणजे प्रत्येक गावात जाळ रेषा दरवर्षी आखायच्या आहेत.

त्यासाठी त्यांना आवश्यक आहे, ते गमबूट, ग्लोव्हज, ब्लोअर्स यांसारखे वणवे विझविण्याचे साहित्य. त्यासाठी निसर्गप्रेमी संस्थांकडून साह्य मिळाले तर त्या कामाची व्याप्ती वाढेल, असे अमित गायकवाड म्हणतात.

वणवे लागण्याची कारणे :

१) केवळ रस्त्याने जाता-येता गवताचे कुसळ किंवा त्याच्या बिया टोचू नये, यासाठी रस्ता, पायवाटेच्या बाजूचे गवत लोक पेटवून देतात. ते पुढे भडकून वणवे लागतात.

२) गवतामध्ये साप, विंचू, कोल्हे, तरस असे सजीव लपून आपल्यावर हल्ला किंवा इजा करतील, या भीतीने गवत पेटवले जाते.

३) जनावरे खातच नसलेल्या काही गवतांचे क्षेत्र वाढू नये, यासाठी गुराखी अशा गवतांना आगी लावतात. पण बिया आधीच वाऱ्यासोबत पसरलेल्या असल्यामुळे त्यांचा हेतू काही साध्य होत नाही.

४) जनावरांनी खाऊन शिल्लक राहिलेल्या गवतांची बुडखे जाळल्यास दवांच्या थेंबावरही गवत फुटते, या समजातून गवत जाळले जाते.

५) स्वरक्षणासाठी स्थानिक आणि जंगल वाचावे म्हणून वनखाते या दोघांचीही जाळ रेषा मारणे ही जबाबदारी आहे. त्यातही वन खात्याची तर नैतिक व कायदेशीर जबाबदारी आहे. मात्र वणव्यासंदर्भात ते उदासीन असल्याचाच सार्वत्रिक अनुभव आहे.

उलटपक्षी वनखाते चक्क उन्हाळ्यात तापमान वाढीमुळे आग लागल्याचे छातीठोकपणे सांगून मोकळे होते. या विषयातील जाणकारांशी बोलल्यावर त्यातील फोलपणा कळतो. जाणकारांच्या मते, मग खासगी जमिनीत का नाही आग लागत? झोपड्यांच्या पाचटाला कधीतरी आग लागायला पाहिजे ना! त्याच प्रमाणे फांद्या एकमेकावर घासून अग्नी तयार होतो आणि आग लागते, हीही तशी लोणकढीच.

कारण म्हणजे वाळलेले गवत जाळण्यासाठी २५०ते २७० अंश सेल्सिअस तर वृक्षाच्या फांद्या जळण्यासाठी ३०० ते ३५० अंश सेल्सिअस तापमानाची गरज असते. उन्हामुळे गवताचे तापमान इतके नक्कीच वाढत नाही. झाडांच्या फांद्यांच्या घर्षणातूनही आग निर्माण व्हायला, इतकी दाट झाडी तरी आपल्याकडे कुठे आहे. थोडक्यात वणवे नैसर्गिकरित्या लागत नाहीत, हेच खरे.

Forest Fire
Forest Department : मुक्काम आंदोलनाचा वन विभागाने घेतला धसका

प्रचार आणि वास्तव

वणवा लागल्यावर १९६२ या क्रमांकावर फोन करण्यासंदर्भात मोठा प्रचार केला जातो. मात्र त्याबाबत लोकांचा अनुभव फार वेगळाच आहे. १) हा नंबर बऱ्याचदा लागतच नाही. २) लागला तर कोणी उचलत नाही. ३) फोन उचलून माहिती घेतली तरी कोणीही येत नाही.

आले तरी कधी येईल याचा अंदाज नसतो. एका फोनला तर बारा दिवसांनंतर खात्याने प्रतिसाद देऊन माणूस पाठवला होता. ४) फोन केल्यावर कधीकाळी कोणी आलेच, तर त्यांच्याकडे आग विझविण्याचे कोणतेही साहित्य असत नाही. ते फिरायला यावे तशी आग बघायला येतात, अशी सार्वत्रिक तक्रार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com