माळेगाव ः ‘‘पीक प्रात्यक्षिक पाहण्यासाठी शिवारात उसळलेली शेतकऱ्यांची गर्दी पाहूनच बारामती-शारदानगरचे कृषिक प्रदर्शन (Krushik Exhibition) दुसऱ्याच दिवशी यशस्वी ठरल्याचे स्पष्ट झाले. त्यामध्ये महिलांची उपस्थितीही लक्षवेधी होती. ‘‘हे प्रदर्शन आमच्या दृष्टीने आश्चर्य आहे,’’ अशा शब्दांत शेतकरी सोपान शिंदे (औरंगाबाद) यांनी भावना व्यक्त केली.
बारामती-शारदानगर येथील कृषिक प्रदर्शनातील नावीन्यपूर्ण ‘स्टार्टअप’विषयीची (Agriculture Startup) माहिती शेतकऱ्यांनी कुतूहलाने जाणून घेतली. जवस, एरंडी, बकव्हीट, हळवी, रब्बी हायब्रीड कांदा, करडईच्या नवीन पीक पद्धती पाहून शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले. प्रदर्शनाच्या दुसऱ्या दिवशी राज्यभरातील शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला.
‘‘भविष्यातील शेतीसाठी शेतकऱ्यांना नेमके काय हवे आहे, ते ‘कृषिक’मध्ये पाहावयास मिळत आहे. शेतकरी कष्टाळू असतात, पण त्यांना शास्त्रशुद्ध शेती करण्यासाठी अधिकचे ज्ञान कृषिक प्रदर्शनात देण्याचा आमचा प्रयत्न आहे,’’ अशी प्रतिक्रिया अॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामतीच्या विश्वस्त सुनंदा पवार दिली.
‘‘महाराष्ट्राची सीमा ओलांडून आलो आणि कृषिक प्रदर्शनातील मिळालेले ज्ञान पुन्हा कर्नाटक राज्यातील शेतकऱ्यांसाठी घेऊन चाललो आहे,’’ अशी भावना कर्नाटकचे माजी ऊर्जामंत्री वीरगोंडा पाटील यांनी व्यक्त केली.
‘‘शेतीच्या जागतिक दर्जाच्या स्टार्टअपसाठी निती आयोगाने निवडलेल्या भारतातील एकमेव बारामती कृषी महाविद्यालयाच्या इनक्युबेशन व इनोव्हेशन सेंटरची उभारणी महत्त्वपूर्ण ठरत आहे.
बारामती कृषी महाविद्यालय आता शेतीतील नावीन्यपूर्ण तंत्रज्ञानाचे जागतिक दर्जाचे केंद्र बनू पाहत आहे. त्याचे उत्तम उदाहरण कृषिक प्रदर्शनातून दिसून आले,’’ असे मत पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे (अकोला) कुलगुरू डॉ. शरद गडाख यांनी व्यक्त केले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.