
परभणी ः परतीच्या पावसामुळे सुगी कामांचा (Crop Harvesting Work) खोळंबा झाला.रब्बीची पेरणी (Rabi Sowing) लांबणीवर पडली. दिवाळीच्या आगमनासोबत पाऊस देखील उघडला. शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळावा. सुगीच्या कामांसाठी परत शेतशिवारे परत गजबजली आहेत. कुणी चिखल पाण्यातील उरल्या सुरल्या सोयाबीनची कापणी (Soybean Harvesting) करतोय, कुठे मळणी सुरू आहे.
कुणी शेतामध्ये तर कुणी घरासमोर उन्हात वाळवत घातलय असे चित्र हिंगोली, परभणी जिल्ह्यांत आहे. सुगीच्या कामांमुळे यंदा शेतकऱ्यांना आनंदाने दिवाळीसाठी उसंत मिळत नाही. पीकहानीमुळे दिवाळी सणातील गोडवा कमी झाला.
खुदनापूर (ता. वसमत) येथील सुभाष आणि वनिता चव्हाण यांच्या एक एकरातील सोयाबीनमधील पाणी महिनाभरापासून हटत नाही. काढणीसाठी मजूर मिळत नाहीत. त्यात दिवाळीसाठी माहेरी घेऊन जाण्यासाठी वनिता यांचे लहान भाऊ अर्जुन जाधव हे आले. परंतु वनिता यांनी सोयाबीनची कापणी करुनच माहेरी जाऊ असे अर्जुन यास सांगितले.
सुभाष यांच्यासोबत रविवारी (ता. २३) सोयाबीन कापणी सुरू केली. अर्ध्याभागात पाणी साचलेले आहे. तर अर्ध्याभागात सततच्या पावसामुळे नुसता चिखल आहे. भिजून काळवंडले उभे सोयाबीन कापताना जमिनीत पाय खोल जात होते. कापणी व्यवस्थित करता येत नव्हती. सुभाष यांना त्यांचे मेहुणे अर्जुन यांची मदत मिळाल्यामुळे सोयाबीनची काढणी लवकर उरकता आली. चिखली (ता. वसमत)येथील ज्ञानोबा काळे हे शेतामध्ये उन्हात वाळवत घातलेले सोयाबीन खालीवर करत होते.
ते म्हणाले, गादी वाफ्यावर लागवड केलेल्या सोयाबीनची गुडघाभर पाण्यात कापणी केली. अनेकदा भिजल्यामुळे माल डागील झालाय. ओलाव्याचे प्रमाण अधिक असल्यास व्यापारी भाव पाडून मागतात. त्यामुळे उन्ह देत आहोत. ज्येष्ठ शेतकरी बालासाहेब काळे म्हणाले, गेल्या दहा वीस वर्षात यंदासारखा पाऊस पडला नाही. रानातल तणकट काढवं कधी अन् पेरणी करावी कधी.
गणपूर (ता. जिंतूर) येथील बाजीराव शेवाळे म्हणाले, सोयाबीनची मळणी राहिली आहे. कापसाची वेचणी रखडली आहे. दोन एकरमध्ये वाफसा नसल्यामुळे पेरणी लांबली आहे. अजूनही पावसाची भीती वाटतेय. त्यामुळे यंदा दिवाळी सणा आनंद कसा मानावा. सिंगणापूर (ता. परभणी) येथील माणिकराव सूर्यवंशी म्हणाले, यंदा पाच महिने पाऊस पडत राहिला. खूप नुकसान झालय. दिवाळीच्या काळात रब्बी पेरणीपूर्व मशागती कामे सुरूआहेत.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.