Crop Damage : संमदच मातीत गेलय, सालभर कसं धकवायचं

लहान असू की मोठा शेतकऱ्यांचं काही खर नाही. सत्य सांगतो, पेरलं तवापासून पाऊस वावरात जाऊ देईना. परिस्थिती लई बिकट झालीय साहेब. आता तुम्हाला सांगून फायदा नाही. सोयाबीन, कपाशी हाती लागली असती तर दणाणून दिवाळी झाली असती.
Crop Damage
Crop DamageAgrowon
Published on
Updated on

हिंगोली ः ‘‘लहान असू की मोठा शेतकऱ्यांचं काही खर नाही. सत्य सांगतो, पेरलं तवापासून पाऊस वावरात जाऊ देईना. परिस्थिती लई बिकट झालीय साहेब. आता तुम्हाला सांगून फायदा नाही. सोयाबीन (Soybean), कपाशी (Cotton) हाती लागली असती तर दणाणून दिवाळी झाली असती. वावरातलं नुकसान (Crop Damage) पाहून दुखणं आलय. संमदच मातीत गेलय. तुम्हीच सांगा साहेब, आता सालभर कसं धकवायच,’’ अशी व्यथा हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मांडल्या.

हिंगोली जिल्ह्यात यंदा पावसाने कहर केला आहे. एक हजार मिलिमीटरचा टप्पा पावसाने पार केला. त्यात शुक्रवारी (ता.२१) पहाटे झालेल्या ढगफुटीने अनेक शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिसकावून घेतला. दिवाळी सणांच्या आनंदावर काळे ढग आले. औंढा नागनाथ, वसमत तालुक्यांतील अनेक मंडलांत अतिवृष्टी झाली. आसना नदीला मोठा पूर आला. पुराचे पाणी शेतात शिरले. शेंगांना कोंब फुटले. उभ्या पिकांवर गाळ जमा झाला. धुरे बांध फुटले. जमिनी खरडून गेल्या. सोयाबीनच्या गंजी पुरामध्ये वाहून गेल्या.

Crop Damage
Crop Damage : नुकसानीचे क्षेत्र २० हजार हेक्टरवर जाण्याचा धोका

खुदनापूर (ता. वसमत) येथील ज्येष्ठ शेतकरी पिराजी चव्हाण यांना चिखलाने माखलेल्या सोयाबीनची मळणी करता येत नाही. त्यामुळे त्यांनी सोयाबीन बांधावर वाळवत घातले होते. त्याला लागून असलेल्या जमिनीवरील अर्धा एकरावरील लिंबांना यंदा अतिपाण्यामुळे फळधारणा झाली नाही. नदीकाठचे एक एकर सोयाबीन उभे आहे.

Crop Damage
Crop Damage Compensation : कळंब तालुक्यात ४८ गावांत मदतवाटप रखडले

पंधरा दिवस उघाड दिली, तर त्याची काढणी करता येईल. रामा चव्हाण, शोभाबाई चव्हाण हे दांपत्य बांधावरील झाडाच्या सावलीत बसून एका एकरातील सततच्या पावसामुळे नष्ट झाल्यामुळे रिकाम्या झालेल्या रानाकडे खिन्न मनाने पाहात होते. उर्वरित कपाशीमध्ये पाणी साचलेले आहे. बोंड फुटली आहेत. परंतु पाण्याचा निचरा होत नसल्याने वेचणी करता येईना.

कुरुंदा (ता. वसमत) येथील दाजीबा इंगोले यांची केळी बाग वादळात मोडून पडली. लाखो रुपयांचे उत्पन्न बुडाले. केळीच्या जागी त्यांनी सूर्यफूल पेरले आहे. कोर्टा येथील बाबूराव कदम यांची जमीन आसना नदीच्या दोन्ही काठावर आहे. उत्तरेकडील जमिनीवरील खरडून गेली आहे. हळदीचे कंद उघडले पडले आहेत.

सिरला (ता.औंढा नागनाथ) येथील बाबूराव चव्हाण यांच्या दोन एकर सोयाबीनमध्ये नाल्याच्या पुराचे पाणी शिरले. अनेक तास पाण्यात बुडाल्याने दाणे डागील झाले आहेत. सततच्या पावसामुळे पिकांपेक्षा तणांची वाढ अधिक झाली आहे. मशागतीसाठी मोठा खर्च येणार आहे. परंतु सोयाबीन, कपाशीचे खर्चाएवढेही उत्पन्न न मिळाल्यामुळे रब्बी पेरणीसाठी तजवीज करणे देखील कठीण झाले आहे.

रस्त्यावरील पाणी शेतात जाऊ नये म्हणून मोठा बांध टाकला. परंतु दुसऱ्या बाजूने आसना नदीच्या पुराचे पाणी शिरलेच. एकरभर सोयाबीनचा चिखल झाला. लिंबू बागेत झाडांच्या मुळ्या सडल्या आहेत.
पिराजी चव्हाण, खुदनापूर, ता. वसमत.
एक एकरवर दुबार पेरणी केलेल्या सोयाबीनचा एक दाणा सुद्धा हाती लागला नाही. एकरभर कापूस बोंडे लागण्यापूर्वीच वाहून गेलाय. सरकारी मदतबी नाही अन् रेशनवरील धान्यबी मिळत नाही.
शोभाबाई चव्हाण, खुदनापूर, ता. वसमत.
सततच्या पावसामुळे रानातून पाणी हटेना. एका एकरावरील हळदीला हुमणी लागली. कंद सड झाली आहे.
पांडुरंग वावरे, कुरुंद, ता. वसमत.
दोन एकरांवरील सोयाबीन ओढ्याच्या पाण्यात वाहून गेले. सरकारला काय अन् कसं मागावं ?
बाबूराव चव्हाण, सिरला, ता. औंढानागनाथ

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com