
Nanded News : दोन वर्षांपूर्वी दीडशे कोटींचा शेतमाल खरेदी करून रक्कम न देणाऱ्या कृष्णूर (ता. नायगाव) येथील इंडिया मेगा ॲग्रो कंपनी विरोधात शेतकरी आक्रमक झाले आहेत. याबाबत १४ ऑगस्ट रोजी सामूहिक आत्मदहनाचा इशारा रयत क्रांती संघटनेचे युवा प्रदेशाध्यक्ष पांडुरंग शिंदे यांनी शेतकऱ्यांच्या वतीने जिल्हाधिकारी अभिजित राऊत आणि पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांना निवेदनाद्वारे दिला आहे.
नायगाव तालुक्यातील कृष्णूर एमआयडीसी येथील इंडिया मेगा ॲग्रो कंपनीने शेतकऱ्यांचा हरभरा, मका, सोयाबीन, हळद आदी शेतीमाल २०२०-२१ या काळात खरेदी केला होता. शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या रकमेची मुदत संपूनही दोन वर्षांपेक्षा जास्त काळ होत आहे.
जिल्ह्यातील ८०० ते ९०० शेतकऱ्यांचे अंदाजे १५० कोटी रुपये कंपनीने देणे आहे. या कंपनीच्या विरोधात रकमेसाठी अन्यायग्रस्त शेतकऱ्याने ता. ३ जून २०२१ रोजी कंपनीच्या गेट समोर जनआंदोलन केले होते. ७ जून २०२१ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अर्धनग्न आंदोलन शेतकऱ्यांनी केले होते.
माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये हा प्रश्न उपस्थित केला होता. परंतु अद्याप अन्यायग्रस्त शेतकऱ्यांना आपल्या हक्काचा पैसा मिळाला नाही. यामुळे शेतीमालाची रक्कम मिळाली नाही तर १४ ऑगस्ट रोजी आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.