सांगली ः गेल्या आठवड्यात ढगाळ वातावरण (Cloudy Weather) आणि सध्या वाढती थंडी (Cold) याचा परिणाम द्राक्षांवर होत आहे. यामुळे द्राक्षाची गोडी आणि फुगवण होत नसल्याने द्राक्ष निर्यातीस (Grape Export) अडचणी येत आहे. त्यामुळे यंदा द्राक्ष निर्यात लांबणीवर पडण्याची शक्यता द्राक्ष उत्पादकांनी वर्तविली आहे.
जिल्ह्यातून युरोपसह आखाती देशात द्राक्षाची निर्यात केली जाते. दरवर्षी सुमारे १५ ते १९ हजार टन इतकी द्राक्षे सातासमुद्रापार जातात. दरवर्षी द्राक्ष निर्यातीचे प्रमाणही वाढत आहे. यंदाही द्राक्ष निर्यात करण्यासाठी शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. आतापर्यंत द्राक्ष निर्यातीसाठी सात हजार शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे.
गेल्या वर्षी द्राक्ष बागांवर मॉन्सूनोत्तर पावसामुळे संकट ओढावले होते. त्यामुळे द्राक्षाचे मोठे नुकसान झाले होते. यंदाही द्राक्ष उत्पादक पावसाचा अंदाज घेऊनच फळ छाटणीचे नियोजन करत होता. परंतु पाऊस लांबणीवर पडल्याने फळ छाटणीही थांबविली होती. परिणामी, फळछाटणी लांबणीवर पडली. त्यातूनही शेतकऱ्यांनी काटेकोर नियोजन करत द्राक्ष बागा साधल्या. सध्या द्राक्षाचा दर्जा चांगला आहे. द्राक्षाची निर्यात डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यापासून सुरू होईल, असा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे.
मण्यांत गोडी उतरेना, फुगवण होईना
दरवर्षी डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून द्राक्षाची निर्यात होण्यास प्रारंभ होतो. फळ छाटणीनंतर द्राक्ष बागांना काही प्रमाणात पोषक वातावरण असल्याने बागा चांगल्या फुलल्या आहेत. मात्र गेल्या पंधरा दिवसांपूर्वी ढगाळ वातावरण आणि हलका पाऊस यामुळे द्राक्ष बागांना काही प्रमामात फटका बसला आहे. तर गेल्या आठवड्यापासून थंडी वाढली आहे. यामुळे द्राक्षात गोडी उतरत नाही. मण्यांची अपेक्षित फुगवण होत नाही. यामुळे द्राक्ष उत्पादक संकटात सापडला आहे.
धुके आणि थंडी आहे, पण दिवसभर पोषक वातावरण आहे. त्यामुळे बागा चांगल्या आहेत. फळ छाटणीस विलंब झाल्याने निर्यात उशिरा होईल.
- काका पाटील, द्राक्ष उत्पादक, पळशी, ता. खानापूर, जि. सांगली
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.