Ethanol Blending : इथेनॉल मिश्रणातून झाली ४३३ कोटी लिटर पेट्रोल बचत

परकीय चलनात झाली २० हजार कोटींहून अधिकची बचत
Ethanol Blending
Ethanol BlendingAgrowon
Published on
Updated on

राजकुमार चौगुले : ॲग्रोवन वृत्तसेवा
कोल्हापूर : पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रणाचे (Ethanol Blending) प्रमाण वाढल्याने परकीय चलनात २० हजार कोटींहून अधिक बचत झाली आहे. इथेनॉल पुरवठा वर्ष २०२१-२२ (डिसेंबर २०२१ ते नोव्हेंबर २०२२) या कालावधीत सार्वजनिक क्षेत्रातील इंधन वितरण कंपन्यांनी इथेनॉल मिश्रणातून ४३३.६ कोटी लिटर पेट्रोलची बचत केली आहे.

केंद्राने वाहतूक क्षेत्राशी संलग्न पर्यावरणीय समस्या दूर करण्यासाठी, कच्च्या तेलाच्या आयातीवरील अवलंबित्व कमी करणे आणि कृषी क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी २००३ मध्ये इथेनॉलमिश्रित पेट्रोल कार्यक्रमाला सुरुवात केली.

Ethanol Blending
Ethanol Supply : राज्यातून ३६ कोटी लिटर इथेनॉलचा पुरवठा

त्याचे उद्दिष्ट ५ टक्के इथेनॉलसोबत पेट्रोल मिश्रण पुरवठा करण्याचे होते. केंद्र सरकारने राष्ट्रीय जैव इंधन धोरणाच्या माध्यमातून २०२५ पर्यंत पेट्रोलमध्ये २० टक्के इथेनॉल मिश्रण करण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे.

देशाने जून २०२२ मध्ये १० टक्के ईबीपी पुरवठ्याचे उद्दिष्ट निर्धारित वेळेपूर्वी पाच महिने मिळवले आहे. २०१२ मध्ये हे मिश्रण केवळ ०.६७ टक्के होते. केंद्रांने गेल्या नऊ वर्षांत इथेनॉलचे मिश्रण १.५ टक्क्यावरून १०.५ टक्क्यांपर्यंत वाढवले आहे.

येत्या काही वर्षांत ते २० टक्क्यांपर्यंत जाण्यासाठी केंद्राच्या वतीने आवश्यक ते प्रयत्न करण्यात येत आहेत. त्यात बहुतांश इथेनॉल हे साखर उद्योगातून येत आहे. पुढील काळात मक्यासारख्या पिकातूनही इथेनॉल तयार करण्याला प्राधान्य आहे.

उसाबरोबरच अन्य पिकापासून इथेनॉल तयार करण्यासाठीच्या प्रकल्पांनाही केंद्र जास्तीत जास्त संख्येने मान्यता देत आहे.

१७०० कोटी लिटर क्षमतेच्या प्रकल्पांची गरज
२०२५ पर्यंत २० टक्के इथेनॉल मिश्रणाचे लक्ष गाठण्यासाठी १०१६ कोटी लिटर इथेनॉलची आवश्यकता आहे. इतर वापरासाठी ३३४ कोटी लिटर इथेनॉलची गरज आहे.

प्रकल्प ८० टक्के कार्यक्षमतेने चालतो, असे गृहीत धरल्यास १७०० कोटी लिटर क्षमतेचे प्रकल्प तयार करण्याची गरज असल्याचे केंद्रीय सूत्रांनी संगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com