
अॅग्रोवन वृत्तसेवा
Pune : राज्यातील साखर कारखान्यांना (Sugar Factory) यंदाच्या हंगामात १३२ कोटी लिटर इथेनॉल (Ethanol) पुरविण्याचे खरेदी आदेश मिळाले आहेत. त्यापैकी आतापर्यंत ३६ कोटी लिटर्सपेक्षा जास्त म्हणजेच २८ टक्क्यांच्या आसपास पुरवठा झाला आहे.
‘दि इथेनॉल मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ इंडिया’ची बैठक अध्यक्ष विजयसिंह मोहिते पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत नुकतीच साखर आयुक्तालयात झाली.
त्यावेळी इथेनॉल निर्मिती उद्योगातील घडामोडींचा आढावा साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी घेतला. “ कारखान्यांमध्ये सध्या तयार होत असलेल्या इथेनॉलची वेळीच व पुरेशी उचल तेल विपणन कंपन्यांनी (ओएमसी) करायला हवी.
कंपन्यांकडे त्यासाठी पुरेशी साठवण व्यवस्था नसल्यास त्यांनी थेट कारखान्यांशी करार करावेत. कारखान्यांमधील उपलब्ध साठवण क्षमता अमलात आणावी,” अशी महत्त्वपूर्ण सूचना साखर आयुक्तांनी यावेळी केली.
२०२१-२२ मध्ये राज्यातील साखर कारखान्यांनी इथेनॉलची विक्रमी निर्मिती केली. देशात गेल्या हंगामात इथेनॉल तयार करण्यासाठी ३५ लाख टन साखर वळविण्यात आली.
त्यात महाराष्ट्रातील साखरेचा वाटा १५ लाख टनांचा होता. कारखान्यांना सध्या साखरेपेक्षाही इथेनॉल निर्मिती आर्थिकदृष्ट्या किफायतशीर ठरते आहे.
चालू २०२२-२३ इथेनॉल हंगामात राज्यातील साखर कारखान्यांना तेल कंपन्यांना ते सांगतील त्या राज्यात इथेनॉलचा पुरवठा करावा लागतो. राज्यात इथेनॉल पुरविणे कारखान्यांना परवडते. मात्र, परराज्यात पुरवठा करणे खर्चिक व वेळखाऊ असते.
थोडक्यात महत्त्वाचे...
- राज्यातील कारखान्यांना यंदा १३२ लाख लिटर इथेनॉल पुरविण्याचे काम
- यंदा पुरवठ्याचे उद्दिष्ट पूर्ण होण्याची चिन्हे
- राज्यातून यंदा ६९.३३ कोटी इथेनॉल पुरविले गेले
- ६२.७४ कोटी लिटरचा पुरवठा परराज्यात
- सर्व राज्यांचा मिळून आतापर्यंत १२७ कोटी लिटरचा इथेनॉल पुरवठा
- उसाचा रस व पाकापासून ७०.३६ कोटी लिटरचा इथेनॉल पुरवठा झाला. त्यासाठी ११.५१ लाख टन साखर वळविली.
- बी-हेव्ही मळीकडे ३.१० लाख टन साखर वळवून ३५.३३ कोटी लिटर इथेनॉल उत्पादन घेतले.
- देशभर एकूण १४.६१ लाख टन साखर इथेनॉल वळविण्यात कारखान्यांना यश
...असे असेल यंदा इथेनॉल उत्पादन
- देशात यंदा ५०१ कोटी लिटर इथेनॉल पुरविण्याची इरादापत्रे (एलओआय)
- जारी केलेल्या इरादापत्रांपैकी साखर कारखान्यांसोबत ४९३ कोटींचे करार केले आहेत
- कारखान्यांशी झालेल्या करारानुसार आतापर्यंत १२७ कोटीपेक्षा जास्त इथेनॉलचा पुरवठा झालेला आहे
“राज्याचे चालू इथेनॉल हंगाम वर्ष डिसेंबर २०२२ ते नोव्हेंबर २०२३ असे गृहित धरले जात आहे. आतापर्यंत कारखान्यांनी परिश्रमपूर्वक २७ ते २८ कोटी लिटरचा इथेनॉल पुरवठा पूर्ण केला आहे. अडचणी न आल्यास उद्दिष्टाप्रमाणे इथेनॉल निर्मिती होईल.” - शेखर गायकवाड, साखर आयुक्त.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.