Dr. Pramod Chaudhari : कृषी उद्योगात यश प्राप्तीसाठी पर्यावरण, शाश्वतता महत्त्वाची

जगातील सर्व छोटेमोठे उद्योग आता ‘इएसजी’ (एन्व्हायरनमेंट, सस्टेनिबिलिटी, गव्हर्नन्स) म्हणजेच पर्यावरण, शाश्वतता आणि प्रशासन या तीन तत्त्वांचा आधार घेऊ लागले आहेत.
Dr. Pramod Chaudhari
Dr. Pramod ChaudhariAgrowon
Published on
Updated on

पुणे ः जगातील सर्व छोटेमोठे उद्योग आता ‘इएसजी’ (एन्व्हायरनमेंट, सस्टेनिबिलिटी, गव्हर्नन्स) म्हणजेच पर्यावरण (Environment), शाश्वतता (Sustainability) आणि प्रशासन या तीन तत्त्वांचा आधार घेऊ लागले आहेत. उद्योगाच्या यशाचे मूल्यमापन करताना भविष्यात ही मानके तपासली जातील.

मराठी मातीमधील कष्टाळू नवउद्योजक ध्येयवादी आहेत; त्यांनी या प्रणालीचा अभ्यास आणि अंगीकार केला तर त्यांचे कृषी उद्योग, व्यवसाय नफेशीर व शाश्वत मार्गाने जातील, असा बहुमोल सल्ला प्राज इंडस्ट्रीज लिमिटेडचे संस्थापक व कार्यकारी अध्यक्ष डॉ. प्रमोद चौधरी (Dr. Pramod Chaudhari) यांनी दिला.

निमित्त होते ‘अॅग्रोवन बिझनेस एक्सलन्स अॅवॉर्ड’साठी (Agrowon Exellence Award) आयोजिलेल्या शानदार सोहळ्याचे.

Dr. Pramod Chaudhari
Sugarcane Cultivation : ऊस लागवडीच्या क्षेत्रात वाढ

‘सकाळ अॅग्रोवन’च्या वतीने राज्यातील निवडक कर्तृत्ववान कृषी उद्योजकांना ‘अॅग्रोवन बिझनेस एक्सलन्स अॅवॉर्ड’ देऊन रविवारी (ता. ८) सन्मानित करण्यात आले. पुण्यात झालेल्या या शानदार सोहळ्यात व्यासपीठावर जागतिक पातळीवर ‘इथेनॉल मॅन’ म्हणून गौरविले जाणारे उद्योगपती डॉ. चौधरी यांच्यासह सकाळ माध्यम समूहाचे अध्यक्ष प्रतापराव पवार, ‘अॅग्रोवन’चे संपादक संचालक आदिनाथ चव्हाण होते.

भारावलेल्या वातावरणात टाळ्यांच्या गजरात उद्योजकांनी अॅवॉर्डस स्वीकारले. कृषी उद्योजकांना डॉ. चौधरी यांनी दिलेल्या मौल्यवान ‘बिझनेस टिप्स्’ या सोहळ्याचे वैशिष्ट्य ठरल्या.

Dr. Pramod Chaudhari
Ethanol GST : जीएसटी कपातीचा इथेनॉल निर्मितीला फायदा

डॉ. चौधरी म्हणाले, ‘‘जगातील सर्व छोटेमोठे उद्योग आता ‘इएसजी’चा म्हणजेच पर्यावरण, शाश्वतता आणि प्रशासन या तीन तत्त्वांचा आधार घेऊ लागले आहेत. याशिवाय संयुक्त राष्ट्रसंघाने एसडीजी (सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स्) अर्थात शाश्वत विकासाची १७ उद्दिष्ट्ये निश्चित केलेली आहेत.

त्यात तुमचा उद्योग पाण्याचा वापर, पर्यावरण या मुद्द्यांवर काय काम करतो हे पाहिले जाते. कृषी उद्योजकांनी आतापासूनच ‘एसडीजी’चा अभ्यास करायला हवा. त्याचा अंगीकार करणे ही तुमच्या व्यवसायाला समृद्धीकडे नेणारी बाब असेल.’’

श्री. पवार यांनीही उद्योजकांना सतत सुधारणा, अनावश्यक खर्च कपात आणि अधिकाधिक ग्राहकाभिमुख होण्याचा सल्ला दिला. उद्योग किंवा शेतीमधील अनावश्यक खर्च कमी करावेत. तसे केल्यास आपोआप उत्पादन वाढेल, गुणवत्ता येईल. त्यातून उद्योग किंवा शेतीमधील आर्थिक क्षमता वाढतील व त्याचे रूपांतर पुढे समृद्धीत होईल, असे ते म्हणाले.

Dr. Pramod Chaudhari
Ethanol : खराब धान्यावर आधारित इथेनॉलच्या खरेदी दरात वाढ होण्याची शक्यता

‘‘उद्योग व्यवसायात नफा, पैसा मिळवला जातोच; पण तुम्ही समाजाला काय देता हेदेखील खूप महत्त्वाचे असते. त्यामुळेच सकाळ माध्यम समुहाकडून शेतकऱ्यांसाठी ‘अॅग्रोवन’ सुरू करण्यात आला. त्यातून आम्ही शेतकऱ्यांना नफ्याची प्रयोगशील शेती करण्यासाठी प्रोत्साहन देत आहोत.

शेतकऱ्यांमध्ये नवे शिकण्याची प्रचंड उत्सुकता आहे. जगात काय चालू आहे हे त्यांना जाणून घ्यायचे आहे. त्यामुळे आम्ही यशोगाथा प्रसिद्ध करताच शेकडो फोन संबंधित प्रयोगशील शेतकऱ्याला जातात.

शेतकऱ्यांचा फायदा करून देणारी माहिती त्यात असते. ‘बारामती अॅग्रिकल्चर ट्रस्ट’ आणि ‘अॅग्रोवन’च्या माध्यमातून प्रयोगशीलतेला सतत प्रोत्साहन दिले जात आहे,’’ असेही श्री. पवार यांनी सांगितले.

श्री. चव्हाण यांनी प्रास्ताविकात सांगितले की, कृषी क्षेत्रात राज्यभर नवउद्योजक संघर्षाने वाटचाल करीत आहेत. ते यशस्वी होत असले तरी शेतीमधील दुय्यम वागणूक त्यांच्याही वाट्याला येते. त्यांच्या कष्टाचा सन्मान होत नाही. ग्रामीण भागात उद्योग उभारून रोजगार निर्मिती करीत देशविदेशात उत्पादने पोहचविणाऱ्या या जिद्दी उद्योजकांचा थाटामाटात सन्मान करावा, असे ‘अॅग्रोवन’ला वाटले. त्यामुळेच अतिशय दिमाखात ‘अॅग्रोवन बिझनेस एक्सलन्स अॅवॉर्डस’ दिले जात आहेत.

‘अॅग्रोवन’च्या माध्यमातून शेतकऱ्यांनाही प्रयोगशील, उद्यमशील केले जात आहे. विविध उपक्रमांद्वारे हजारो शेतकरी एकमेकांशी जोडले जात आहेत. राज्यातील चार शेतकऱ्यांनी त्यांच्या नव्या घरांना ‘अॅग्रोवन’ असे नाव ठेवले आहे. ही या दैनिकाच्या यशाची खरी पावती आहे. या सोहळ्याचे सूत्रसंचालन महेश गायकवाड यांनी केले. ‘ॲग्रोवन’चे उपसरव्यवस्थापक बाळासाहेब खवले यांनी आभार मानले.

समाधानी ग्राहक हीच यशाची गुरुकिल्ली

‘‘तुम्ही कष्टपूर्वक चांगले उद्योग व्यवसाय उभारले आहेत. त्यामुळेच ‘अॅग्रोवन’कडून एक्सलन्स अॅवॉर्डसनी तुमचा गौरव होतो आहे. पण, तुम्ही येथेच न थांबता उद्योग सर्वोत्तम म्हणजेच एक्सलन्स स्थितीत आणायला हवा. त्यासाठी उद्योगात आर्थिक तरलता आणा, त्याचा सतत विस्तार करायला हवा.

अडीअडचणीत तुम्ही कसे नियोजन करता यावर उद्योगाचे भवितव्य अवलंबून असते. सर्वांत महत्त्वाची बाब म्हणजे तुम्ही तुमचा ग्राहक किती समाधानी ठेवता ही असते. समाधानी ग्राहक, नावीन्यता आणि आधुनिकता ही आजची आव्हाने असून ती तुम्ही पेलायला हवीत,’’ असे डॉ. चौधरी यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com