राजकुमार चौगुले : ॲग्रोवन वृत्तसेवा
कोल्हापूर : पेट्रोलियम मंत्रालय लवकरच खराब झालेल्या धान्यापासून बनवलेल्या इथेनॉलच्या (Ethanol) खरेदी दरात वाढ करण्याच्या तयारीत आहे. खराब धान्याच्या किंमतीत वाढ होत असल्याने इथेनॉलच्या खरेदी दरात किमान तीन रुपयांची वाढ अपेक्षित आहे.
देशात १२३ प्रकल्प धान्यावर आधारित आहेत. महाराष्ट्राबरोबरच अन्य राज्यांमध्येही ज्या भागात धान्याचे उत्पादन जास्त आहे. त्या भागात इथेनॉल प्रकल्प उभारण्याकडे सरकारचा कल राहिला आहे. खराब होणाऱ्या धान्यापासून इथेनॉल निर्मिती करणाऱ्या प्रकल्पाची संख्याही गेल्या वर्षभरात लक्षणीय वाढली आहे. धान्य आधारित डिस्टिलरीजची सध्याची क्षमता सुमारे ३०७ कोटी लिटर आहे.
गेल्या वर्षभरात वातावरणातील बदलामुळे धान्याच्या उत्पन्नात कमी जास्तपणा आहे. बहुतांशी धान्याचे दर वाढले आहेत. याचाच परिणाम खराब धान्याच्या दरावरही झाला आहे. खराब धान्याचे दरही वाढल्याने धान्यावर आधारित इथेनॉल प्रकल्पांना फायदेशीर दरात इथेनॉल निर्मिती करणे अशक्य बनत आहे. याचबरोबर खराब धान्याचा तुटवडा ही भासत आहे. खुल्या बाजारातून अपेक्षित पुरवठा होत नसल्याने इथेनॉल प्रकल्पधारकांनी धान्यासाठी फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाकडे धान्यासाठी धाव घेतली आहे.
पेट्रोलियम मंत्रालयाने नुकताच या बाबतचा आढावा घेऊन दरवाढीसाठी प्रयत्न सुरू केले असल्याची माहिती पेट्रोलियम मंत्रालयाच्या सूत्रांनी दिली. सरकारने २०२२-२३ मध्ये पेट्रोलसोबत १२ टक्के इथेनॉल मिश्रण करण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. या उद्दिष्टाची प्रगती तपासण्यासाठी अन्न, सार्वजनिक वितरण आणि पेट्रोलियम मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची नुकतीच एक आढावा बैठक झाली. या बैठकीत दोन्ही मंत्रालये, इंधन वितरण कंपन्यांचे सचिव आणि भारतीय अन्न महामंडळाचे अध्यक्षही उपस्थित होते. बैठकीत २०२२-२३ मध्ये १२ टक्के इथेनॉल मिश्रणाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी सर्व ती आवश्यक पावले उचलण्याचे निर्देश देण्यात आले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.