
Sangli News : यंदा पावसाने हुलकावणी दिल्याने तलाव आणि विहिरीतील पाण्याने तळ गाठला आहे. त्यामुळे शेतातील फळपिकांसह अन्य पिकांना वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची कसरत सुरू आहे. पाण्यासाठी तलावात नवीन विहीर खोदाई, विहिरीत आडव्या बोअर घेणे आणि विहिरीतील गाळ काढण्याची कामे सुरू केली आहेत.
आटपाडी तालुक्यात फळपिकांसह अन्य पिकांच्या लागवडीखालील क्षेत्रात वाढ झालेली आहे. यामध्ये डाळिंब, आंबा, चिकू, सीताफळ, द्राक्ष यांचे चार वर्षांत लागवड क्षेत्र वाढले आहे. तसेच ऊस, मका, तेलबियांची पिके, कापूस, चारा आणि कडधान्य लागवडीच्या क्षेत्रातही वाढ झाली आहे. चार वर्षे अपेक्षित पाऊस होत होता.
समवेत ‘टेंभू’चे पाणी होते. त्यामुळे पाण्याची समस्या नव्हती. यंदा ‘टेंभू’चे उन्हाळी आवर्तन लवकर बंद झाले. अनेक भागांत मागणी करूनही पाणी मिळाले नाही. त्यात पावसानेही दडी मारली.
मे, जून आणि जुलैमध्ये तलावातील पाण्याचा मोठ्या प्रमाणावर उपसा केला. त्यामुळे शेटफळे, कचरेवस्ती, बनपुरी, अर्जुनवाडी, झरे, दिघंची, विभुतवाडी, महाडिकवाडी आदी तलावांतील पाण्याने तळ गाठला. तलावातील पाणी मृतसंचयाखाली गेले आहे.
आटपाडी, घाणंद आणि निंबवडे तलावात सरासरी २५ ते ३० टक्के पाणी आहे. तलावातील पाण्यावर अवलंबून असलेली पिके अडचणीत आली आहेत. विहिरीतूनही मोठ्या प्रमाणात उपसा केल्यामुळे पाण्याची पातळी झपाट्याने खाली गेली. तेव्हा शेतातील पिके जगवण्याचे शेतकऱ्यासमोर नवे संकट उभा ठाकले आहे.
पिकांना पाणी उपलब्ध करण्यासाठी शेतकऱ्यांनी वेगवेगळे उपाय सुरू केलेत. रिकामे पडलेल्या तलावातच विहीर खोदाई करून पाण्याचा शोध अनेक ठिकाणी सुरू केला आहे. काही ठिकाणी पाण्यासाठी विहिरीत आडव्या बोअर घेतल्या आहेत. अनेक शेतकऱ्यांच्या विहिरी गाळाने अर्धवट भरलेल्या आहेत.
‘टेंभू’च्या पाण्याला मागणी वाढली
जिथे पाणी उपलब्ध होईल, तेथून स्वतःच्या शेतात स्वतंत्र नवीन पाइपलाइन करून पाणी आणण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड चालली आहे. ‘टेंभू’चे नुकतेच खरीप आवर्तन सुरू केले असले तरी ते पूर्ण क्षमतेने सुरू नाही. पाच ते सात पंप सुरू असल्यामुळे पाणी कमी आणि मागणी अधिक, असे चित्र आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.