
Nashik News : ‘‘सात दिवसांत अवकाळीतील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याची घोषणा करणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सटाणा तालुका दौऱ्याला महिना पूर्ण झाला. मात्र अजूनही तालुक्यातील एकाही शेतकऱ्याला मदत मिळालेली नाही. त्यामुले हा दौरा म्हणजे निव्वळ फार्स ठरला आहे,’’ अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे बागलाणचे माजी आमदार संजय चव्हाण यांनी केली.
सटाणा तालुका राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे ‘एक तास राष्ट्रवादीसाठी’ या उपक्रमाअंतर्गत काकडगाव व मोराणे सांडस येथे गाव भेटीवेळी मेळावा झाला. त्यावेळी श्री. चव्हाण बोलत होते. तालुकाध्यक्ष केशव मांडवडे, तालुका कार्याध्यक्ष संजय पवार, सेवादलाचे तालुकाध्यक्ष यशवंत कात्रे, युवक तालुकाध्यक्ष सम्राट काकडे, काकडगाव सोसायटीचे संचालक विनोद पाटील, तंटामुक्त अध्यक्ष देवराव अहिरे आदी उपस्थित होते.
चव्हाण म्हणाले, ‘‘मार्च आणि एप्रिल महिन्यात वादळी पावसामुळे जिल्ह्यातील सटाणा तालुक्यात सर्वाधिक नुकसान झाले. हजारो हेक्टरवरील पिके उद्ध्वस्त झाली. त्या दरम्यान मुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्रिमंडळ अयोध्या दौऱ्यावर होते.
त्यामुळे शिंदे-फडणवीस सरकारवर चौफेर टीका होत होती. जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी तत्काळ अवकाळीग्रस्त भागाचा दौरा केला. त्यांच्या दौऱ्याला महिना पूर्ण होत आला, तरीही तालुक्यातील शेतकरी अद्यापही मदतीपासून वंचित आहेत.’’
‘शेतकऱ्यांनी एकजूट दाखवावी’
‘‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नेहमीच सर्वसामान्य जनता आणि शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला आहे. येत्या निवडणुकांमध्ये सध्याच्या शेतकरीविरोधी केंद्र व राज्यातील भाजप सरकारला घरी बसविण्याची वेळ आली आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी एकजूट दाखवावी,’’ असे आवाहन चव्हाण यांनी केले
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.