
Crop Damage : परभणी जिल्ह्यात यंदाच्या (२०२३) एप्रिल महिन्यात झालेला अवकाळी पाऊस, गारपीट, वादळी वारे यामुळे सेलू, मानवत, पाथरी, सोनपेठ, गंगाखेड, पूर्णा या ६ तालुक्यांतील २३७ शेतकऱ्यांच्या १८२.५४ हेक्टरवरील जिरायती, बागायती, फळ पिकांचे ३३ टक्के पेक्षा जास्त नुकसान झाले आहे.
बाधित शेतकऱ्यांच्या मदतीसाठी जिल्हाप्रशासनाने बुधवारी (ता. १०) एकूण ३२ लाख २५ हजार ५० रुपये एवढ्या निधीची मागणी शासनाकडे केली आहे अशी माहिती महसूल विभागाच्या सूत्रांनी दिली.
परभणी जिल्ह्यात एप्रिल महिन्यात अवकाळी पाऊस, गारपीट, वादळी वाऱ्यामुळे झालेल्या नुकसानीची पंचनामे पूर्ण झाल्यानंतर महसूल, कृषी, ग्रामविकास विभागातर्फे बुधवारी (ता.१०) अंतिम बाधित क्षेत्र निश्चित करण्यात आले.
त्यानुसार जिल्ह्यातील जिरायती पिके ३७ हेक्टर, बागायती पिके ६६.२० हेक्टर, फळपीके ७९.३४ हेक्टर असे एकूण १८२.५४ हेक्टरवरील पिकांचे ३३ टक्के पेक्षा जास्त नुकसान झाले आहे.
सेलू तालुक्यातील ४६ शेतकऱ्यांचे ११ हेक्टरवरील रब्बी ज्वारी, एकूण ८८ शेतकऱ्यांचे १४ हेक्टरवरील भाजीपाला व ३८ हेक्टरवरील कांदा पीक, एकूण ४१ शेतकऱ्यांचे २० हेक्टरवरील केळी, ४ हेक्टर पपई, १२ हेक्टर आंबा तसेच इतर १६ हेक्टर मिळून एकूण ५२ हेक्टरवरील फळपीकांचे ३३ टक्के पेक्षा जास्त नुकसान झाले आहे.
मानवत तालुक्यातील ३ शेतकऱ्यांचे २.४० हेक्टरवरील पपईचे नुकसान झाले. पाथरी तालुक्यातील २० शेतकऱ्यांचे एकूण ६.२० हेक्टरवरील केळी, ५.२० हेक्टरवरील पपई, १ शेतकऱ्याच्या १ हेक्टर कांदा मिळून एकूण १३ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले.
सोनपेठ तालुक्यातील १ शेतकऱ्याचे १ हेक्टरवरील केळीचे तर गंगाखेड तालुक्यातील १ शेतकऱ्याचे १ हेक्टर आंबा तर १ शेतकऱ्याचे १ हेक्टर टरबुजाचे नुकसान झाले.
पूर्णा तालुक्यातील ९ शेतकऱ्याचे ०.६० हेक्टर भाजीपाला, १.२० हेक्टर टरबूज, २७ शेतकऱ्यांचे १.२० हेक्टर पपई, ६.३० हेक्टर आंबा, ०.५० हेक्टर चिकू, इतर २.९४ हेक्टर असे एकूण १४.१४ हेक्टर पिकांचे नुकसान झाले.
बाधित शेतकऱ्यांना जिरायती पिकांसाठी प्रतिहेक्टरी ८ हजार ५०० रुपये नुसार एकूण ३ लाख १४ हजार ५०० रुपये, बागायती पिकांसाठी १७ हजार रुपयेनुसार एकूण ११ लाख २५ हजार ४०० रुपये, फळपीकांसाठी २२ हजार ५०० रुपयेनुसार १७ लाख ८५ हजार १५० रुपये आर्थिक मदत दिली जाईल. त्यासाठी एकूण ३२लाख २५ हजार ५० रुपये अपेक्षित निधीची मागणी जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आली आहे.
अवकाळी पाऊस नुकसान स्थिती (क्षेत्र हेक्टरमध्ये,निधी लाख रुपयात)
तालुका - बाधित शेतकरी - एकूण बाधित क्षेत्र- अपेक्षित निधी
सेलू - १७५ - १५०.०० - २५.२१५००
मानवत - ३ - २.४०- ०.५४०००
पाथरी- २०- १३.०० - २.८७०००
सोनपेठ - १- १.०० - ०.२२५००
गंगाखेड- २- २.०० - ०.३९५००
पूर्णा- ३६ - १४.१४ - ३.००५५०
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.