Chhatrapati Sambhajinagar News : मराठवाड्यातील पाच जिल्ह्यांत ऑगस्ट अखेरच्या टप्प्यातही अपेक्षांवर पाणी फेरणाऱ्या पावसाने खरिपाच्या पिकांची स्थिती गंभीर करून टाकली आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर व धाराशिव जिल्ह्यांत ऑगस्ट महिन्यात अपेक्षेच्या ५० टक्केही पाऊस झालेला नाही.
हलक्या, मध्यम रानातील पीक वाळून गेल्यात जमा आहे. आता पाऊस आला तरी पिकांसाठी तो फारसा उपयोगाचा नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. शिवारात जाऊन करपणारी पिके पाहण्यापेक्षा तिकडे न जाणे शेतकरी पसंत करीत आहेत.
यंदाच्या खरिपात मराठवाड्यात सुरुवातीपासूनच पावसाचा लहरीपणा अनुभवला आला. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना दुबार, तिबार पेरणी करावी लागली. पावसाअभावी अपेक्षित ओल नसल्यामुळे आधीच उशिरा का होईना कशीबशी पेरणी झाली.
पाऊस नाही अन् तीव्र उन्हामुळे पिके करपून गेली आहेत. कपाशीने जमीनच सोडली नसल्याचे चित्र होते. विहिरींची आणि पाणीसाठ्याचीही स्थिती गंभीर असल्याने सिंचनावर मर्यादा आल्या आहेत. त्यात वीजपुरवठाच मिळत नसल्याने संकटात आणखी भर पडली आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर व धाराशिव जिल्ह्यांत यंदा ३१ लाख ६३ हजार ८४० हेक्टरवर खरिपाची पेरणी झाली आहे.
२९७ पैकी केवळ ६२ मंडलांत चांगला पाऊस
यंदा एक जून ते २४ ऑगस्ट दरम्यान छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर व धाराशिव जिल्ह्यांतील २९७ मंडलांपैकी केवळ ६२ मंडलांत अपवाद वगळता एक ते दोन वेळा अतिवृष्टी झाली. त्यामुळे शेत शिवारात कुठे पाणी तुंबले नाही. नदी, नाले, कोरडेच राहिले. यावरून यंदाचा पाऊस शेतीसाठी, पाणीसाठ्यासाठी किती अवसान घातकी ठरला याची प्रचिती येते.
वैजापूर, छत्रपती संभाजीनगर, बदनापूर, गेवराई, अंबाजोगाई, केज, धारूर, वडवणी, लातूर, औसा, निलंगा, चाकूर, रेनापूर, देवणी, शिरूर अनंतपाळ, धाराशिव, तुळजापूर, कळंब, उमरगा, लोहारा या तालुक्यांत ऑगस्टमध्ये अपेक्षित पावसाच्या २० टक्केही पाऊस झाला नाही.
तर पैठण, गंगापूर, खुलताबाद, जालना, अंबड, बीड, पाटोदा, आष्टी, अहमदपूर, उदगीर, जळकोट तसेच वाशी तालुक्यांत पावसाचे प्रमाण अपेक्षेच्या तुलनेत २५ टक्क्यांच्या आतच राहिले. लातूर, रेनापूर, चाकूर तालुक्यांत तर दहा टक्केच्या आतच पाऊस झाला आहे.
जिल्हानिहाय प्रत्यक्ष पेरणी (हेक्टरमध्ये)
छत्रपती संभाजीनगर...६४३१४८
जालना...६०२४९४
बीड...७६६६८०
लातूर...५९२८८३
धाराशिव...५५८६३४
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.